ताज्या घडामोडी

आजचे सानेगुरुजी ~प्राचार्य बी. एस. जाधव बांबवडे ता पलूस जि सांगली

Spread the love

ही गोष्ट आहे आहे एका वृत्तस्त समाजसेवकाची,ही गोष्ट आहे एकापुस्तक वेड्या माणसाची,ही गोष्ट आहे एका ध्येयवेड्या शिक्षकाची,ही गोष्ट आहे एका तत्वज्ञाची,ही गोष्ट आहे एका आनंदयात्रीची,ही गोष्ट आहे एका कृतार्थ जीवनाची.ही गोष्ट आहे मांगल्यांचा ध्यास घेतलेल्या एका ध्येयपुरुषाची,ही गोष्ट आहे एका कारुण्यमूर्तीची,ही गोष्ट आहे एका निर्मळ जीवन प्रवाहाची,ही गोष्ट आहे एका सरस्वती पुत्राची.ही गोष्ट आहे आजच्या एका सानेगुरुजींची.ही गोष्ट आहे श्री.लालासाहेब मोहिते या एका रयतसेवकाची.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील “सोहोली”हे एक छोटेसे गाव.या गावात पंच्चाहात्तर वर्षाचे श्री.एल.सी.तथा लालासाहेब मोहिते राहतात.त्यांनी रयत शिक्षण संस्थेत प्रदीर्घ सेवा केली आहे.पती-पत्नी दोघेही शिक्षक.पंधरा वर्षापूर्वी पत्नी पद्मावती अर्ध्यावरती डाव मोडून गेली.
मोहितेसर कवलापूरला खूप वर्षे होते.शाळा सुटल्यानंतर ते घरी जात नव्हते.मुलांना वक्तृत्वाचे धडे देत होते.संस्काराचे पाठ देत होते.मुले घडवीत होते.ते निवृत्त झाले पण केवळ चारभिंतीची शाळा त्यांना मान्य नव्हती.त्यांनी सोहोली गाव हीच एक शाळा केली.गावाच्या रस्त्याकडेला सुंदर सुंदर सुविचाराच्या पाट्या खांब ऊभे करुन लावल्या.स्वःताच्या खिशातून अडीच लाख रुपये खर्च केले.ते पाहून लोक थांबू लागले.लोक वाचू लागले.लोकांच्या कानी सुवचने पडू लागली.सुविचार लोकांच्या ओठावर रेंगाळू लागले.ओठावरच्या शिव्या गायब झाल्या.ओठावर ओव्या शोभू लागल्या.सारे गाव सुंदरतेचे,संस्काराचे लेणे घेऊन ऊभे आहे.महाराष्ट्रातील सुविचार असलेले हे एकमेव गाव झाले.मोहितेसरांनी लोकांचे जगणेच तेवढे सुंदर केले असे नव्हे तर मरणेही सुंदर केले आहे.स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुध्दा अनेक संताच्या वचनाने अध्यात्मिक केला आहे.अवघा रस्ता सुशोभित केला आहे.
कसल्यातरी आंतरिक ओढीने आम्ही त्यांच्या घरी गेलो.ते घर कसले ! ते एखाद्या प्राचीन ऋषीचा आश्रमच ! घराची प्रत्येक खोली सुविचाराने मंडीत झालेली होती.पुस्तकांनी कपाटे भरलेली होती.पुस्तकातले विचार भिंतीवर आले होते.पांढऱ्या शुभ्र वस्त्रातले मोहितेसर एक एक खोली फिरवून दाखवत होते.बाहेर “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” निस्तब्ध होऊन ऊभे होते.आणि अत्यंत नम्र,विनयशील आणि हृदयात चिंब भिजलेल्या शब्दाने ते आमच्याशी सुखसंवाद करीत होते.तो सुखसंवाद कसला ! ते या हृदयीचे त्या हृदयी घालणे होते.सानेगुरुजींचा कुळीतल्या या रयतसेवकाने सारी माणसे,सारा गाव बदलण्याचा ध्यास घेतला आहे.ते ही प्रेमाने,तेही अपार वात्सल्याने !
स्वतःचा प्रपंचही नेटका केला आहे.एक पुत्र दोन कन्या.सारेच प्रचंड बुद्धिमत्तेचे धनी आहेत.ती संस्काररत्नेच.चिरंजीव लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात नववे आले आहेत.बारामतीला अॕडिशनल एस.पी.या पदावर आहेत.सूनबाई वर्ग १ च्या अधिकारी आहेत.एक कन्या डेप्युटी कमिशनर आहे.जावई IRS
आहेत.दुसरी कन्या एम.डी.डाॕक्टर आहे.
त्यांना पाहून आम्हाला जीवित साफल्याचे नवे दर्शन घडले.अवघ्या अवघ्यांना सुंदर करण्याचा ध्यास घेतलेले मोहितेसर स्वतःच एक सुंदरतेचे अभिजात लेणे आहेत.सारे जग सुंदर झाले पाहिजे.सारे मंगल झाले पाहिजे,सर्वजण सुखी झाले पाहिजेत.यासाठी वय विसरुन तरुणालाही लाजवेल असा हा लोकशिक्षक समाजसेवा करत आहेत.गावाने त्यांना बिनविरोध एका सहकारी संस्थेचे चेअरमन केले आहे
त्यांच्या घरी माणसांची सतत वर्दळ चालू असते.न थकता न कंटाळता ते हसमुखाने लोकांचे स्वागत करत असतात.दाट वृक्षराईत वेढलेले त्यांचे घर आता समाजसेवेचे मंदिर झाले आहे.दारातील वृक्षापेक्षा ते आता ऊंच वाटू लागले आहेत.मोहितेसरांच्यातील शिक्षकाचे वर्तुळ आता खूपच विस्तारले आहे.ते लोकशिक्षक झाले आहेत.अखंड वाचन,सतत व्याख्याने आणि माणसांच्या कायम गर्दीत राहूनही त्यांनी मनाचा ताजेपणा जपला आहे.गावात विविध ऊपक्रम राबवत आहे.वाचन संस्कृती रुजवीत आहेत.गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.सुविचाराचे सुसंस्कृत गाव म्हणून सोहोलीचे नाव सर्वोतोमुखी झाले आहे.
अजून दूरचा टप्पा गाठायचा मनोदय आहे.आकाशाला गवसणी घालण्याची ईर्षा मनात आहे.आभाळाचे प्रेम घेऊन मांगल्याचा वर्षाव करणारे मोहितेसर ” हे विश्वचि माझे घर | ऐसी मती जयाची जयाचि स्थिर |किंबहुना चराचर आपणचि झाला |” या पराकोटीच्या अवस्थेला पोहचले आहेत.त्यांना भेटायला दूरवरुन लोक येत आहेत.विद्यार्थी येत आहेत.टि.व्ही.वाले येत आहेत.आपणही धावपळीच्या जीवनात वेळ काढून अवश्य एकदा या समाजव्रतीला भेटा.सरस्वतीच्या या ऊपासकाला पाहून,लोककल्याणाची कळकळ असणाऱ्या या समाजपुरुषाला भेटून,आपला अहंकार गळून पडेल.बुध्दीवरची,हृदयावरची जळमटे झडून जातील,प्रतिष्ठेचा,ज्ञानाचा डौल ऊतरुन जाईल.मन प्रसन्न होईल.सोहोलीचा हा लाल, ऊमद्या मनाचा हा समाजसेवक,ऊदार अंतकरणाचा हा पुरुषोत्तम,सरस्वतीचा हा ऊपासक,लक्ष्मीमातेचा हा सुपुत्र, श्री.लालासाहेब मोहिते हे आजचे सानेगुरुजी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!