ताज्या घडामोडी

जोतिराव फुले विज्ञानाचे पुरस्कर्ते; आजच्या काळातही समाजाच्या उभारीसाठी महात्मा फुले यांचे विचार अतिशय उपयुक्त – खा.शरदचंद्र पवार

Spread the love

सत्यशोधक चळवळ पुढे घेऊन जावीच लागेल, पुण्यातील भिडे वाड्यासाठी आता रस्त्यावर उतरावेच लागेल – छगन भुजबळ

पुणे :-* महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले हे विज्ञानाचे, आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते होते. त्याचं हे काम पुढे नेन्याचे काम हे अतिशय चिकाटीचं आहे, गरजेचे आहे. कारण महात्मा महात्मा फुले यांचा विचार हा परिवर्तनाचा, विज्ञानाचा पुरस्कार करणारा, समाजातील शेवटच्या माणसाचे हित जोपासणारा व त्यांच्या दु:खांची मांडणी करणारा विचार आहे तो वाढविला पाहिजे, अधिक वृद्धिंगत करायला हवा. महात्मा फुले यांचे हे विचार आजच्या काळातही समाजाच्या उभारणीसाठी अत्यंत उपयुक्त असून त्यांचे हे विचार देशातील शेवटच्या तरुणाच्या मनात रुजविण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांनी केले.
महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला १५० वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे राज्यातील सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांचा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे,सदानंद मंडलिक, प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खा.शरदचंद्र पवार साहेब म्हणाले की, सबंध समाजामध्ये अवैज्ञानिक परंपरा, अंधश्रद्धा, स्त्रीदास्य पद्धती, ब्राह्मण्य, अमानवी व माणुसकीला काळिमा फासणारे प्रकार देशात सुरु होते. यावेळी भगवान गौतम बुद्धांनी याला विरोध करून सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले यांनी याच सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जातीभेद आणि अन्याय याची परिसीमा त्या काळी गाठली गेली होती अशावेळी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा असा दुहेरी भाव सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून मांडला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महात्मा फुले यांनी गुलामगिरी, अस्पृश्यता, स्त्री दास्य, जनावरांच्या हत्या याला विरोध केला. व्यसनापासून दूर रहावे अशी शिकवण त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून दिली. सत्यशोधक समाजाचा केवळ आणि सामाजिक सुधारणा हा हेतू नव्हता तर लोकप्रबोधन, शिक्षण सुधारणा, शेतकरी हित, सावकारी उच्चाटन यासह अनेक प्रश्नांवर काम केले असल्याचे सांगत महात्मा फुले यांनी मांडलेला शेती विज्ञानवादी विचार हा अतिशय महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले कि, महात्मा फुले यांचे हे विचार पुढे छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भावराव पाटील यांच्यसह अनेक समाजसुधारकांनी रुजविले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून त्याचा जीर्नोधार केला. तसेच त्यांच्यावर पोवाडा तयार करून सत्य जगासमोर मांडले असे खा. शरदचंद्र पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, देशात अद्यापही अंधश्रद्धा दूर झालेली नाही. ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी काही प्रामाणिक प्रयत्न देखील सुरु आहे. मात्र अनेक लोक देशांमध्ये अंधश्रद्धा वाढीला लागली पाहिजे म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी धर्माधर्मात जातीजातीत भांडणे लावण्यात आहे. अन्याय अत्याचार होत आहे. हे सर्व थांबविण्यासाठी सत्यशोधक समाजाचे महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.आंबेडकरांचे विचार प्रेरक असून हेच विचार देशाला या यादवीतून वाचवू शकतात असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
ते म्हणाले की, महात्मा फुले यांनी बहुजन समाजासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाची ही चळवळ ब्राम्हणांच्या विरोधात नव्हती तर ब्राम्ह्ण्यवादाच्या विरोधात होती. या सत्यशोधक चळवळीत आजही देशभरात अनेक लोक काम करत आहे. आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने या विचारांना चालना देणाऱ्या समाजसेवकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान व्हावा म्हणून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यसह अनेक समाजसेवकांनी बहुजन समाजाला शिक्षण देण्यासाठी आपलं बलिदान दिल. ज्यांनी आपल्याला शिक्षण दिल या फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रतिमांची तसेच त्यांच्या विचारांची पूजा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरु करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असून भिडे वाड्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना समाजसेवक बाबा आढाव म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच अतिशय म्हत्वाच काम केलं आहे. पुण्यात ज्यांनी ज्या भिडे वाड्यात शाळा सुरु केली. त्या वाड्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून याठिकाणी पुन्हा मुलींची शाळा सुरु करण्यासाठी सर्वांनी लढा उभारावा असे सांगितले. देशामध्ये समाजात द्वेष निर्माण करण्याच काम केलं जात आहे. यासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे काम सर्वांसमोर मांडण्याची आपली सर्वांची जबाबदारी असून त्यांचे विचारच देशातील ही विखारी लाट परतवू शकतात असे डॉ.आ.ह साळुंखे यांनी व्यक्त केले.
या मान्यवरांचा करण्यात आला सन्मान
या सत्यशोधक समाज गौरव सोहळ्यामध्ये ज्येष्ठ लेखक डॉ.आ.ह साळुंखे, संशोधक लेखक व ज्येष्ठ विचारवंत प्रा.रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.भारत पाटणकर आणि स्व.गेल ऑम्वेट, ज्येष्ठ संशोधक विचारवंत प्रा.हरी नरके यांचा एक लक्ष रुपये, शाल, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तर ज्येष्ठ समाजसेविका कमलताई विचारे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव तसेच प्रज्ञावंत साहित्यिक उत्तम कांबळे हे नियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित न राहू शकल्याने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच या प्रसंगी महाराष्ट्र व महारष्ट्राचे बाहेर सत्यशोधक विवाहाचे मोफत काम करणारे सत्यशोधक रघुनाथ ढोक व सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रभर एकांकिका सादर करणाऱ्या प्रा.कविता म्हेत्रे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आभार कार्याध्यक्ष बापू भुजबळ यांनी आभार तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.नागेश गवळी यांनी केले.या कार्यक्रमास राज्यभरातून महिला व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!