ताज्या घडामोडी

आता एकच मिशन जुनी पेन्शन ! – सागर पाटील * अध्यापक संघाच्या धरणे आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपला उमेदीचा कालखंड शिक्षण सेवेमध्ये व्यतीत करतात.असे असतानाही शासन यांना उतारवयामध्ये वाऱ्यावर सोडून देत आहे.पाच वर्षांसाठी निवडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधींना जुनी पेन्शन योजना लागू केली जाते परंतु आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा काळ शासन सेवेत घालविणार्या शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी, शासकीय निमशासकीय कर्मचार्यांना मात्र सक्तीनं एनपीएस योजना स्विकारावी लागत आहे. ही बाब अन्यायकारक आहे. आता अध्यापक संघाचं केवळ एकच मिशन असून सर्वांना सरसकट जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे असा विश्वास रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी व्यक्त केला. ते धरणे आंदोलनासाठी उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरण हा बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कुटिल डाव आहे. वाडी – वस्तीवरील शाळा बंद करण्याच्या अविचारी निर्णयाचा शासनाने पुनर्विचार करणे आवश्यक आहे. शिक्षक व शिक्षण क्षेत्राबद्दल शासनामध्ये मोठ्या प्रमाणात अनास्था पाहायला मिळत असून शिक्षण क्षेत्रातील समस्यांबाबत झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला जागे करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.
अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष संभाजी देवकते यांनी आपल्या मनोगतातून शासनानं शिक्षकाच्या जाती निर्माण केले असल्याचे मत व्यक्त करत शासकिय धोरणावर कडाडून टिका केली.जिल्हा सचिव रोहित जाधव यांच्यासह अनेक एनपीएस धारक कर्मचार्यांनी आपली सडेतोड भूमिका व्यक्त केली. यावेळी अध्यापक संघाच्यावतीने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुवर्णा सावंत यांच्यामार्फत शिक्षणमंत्री दीपक केसरकर व राज्याचे अव्वर सचिव शालेय शिक्षण यांना निवेदन देण्यात आले.
जुनी पेन्शन योजना सर्वांना सरसकट लागू करा या प्रमुख मागणीसह कोरोना काळात दिवंगत झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वारसांना तात्काळ अनुकंपा तत्त्वानुसार नोकरीत सामावून घ्या,सर्व विनाअनुदानित तत्त्वावरील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तात्काळ अनुदान लागू करा,वरिष्ठ व निवड श्रेणी मधील त्रुटी दूर करा,अर्धवेळ सेवा पेन्शनसाठी ग्राह्य धरण्यात यावी,शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत ,शिक्षकेतर चतुर्थश्रेणी प्रवर्गातील भरती प्रचलित धोरणानुसारच करा, ठोक मानधन रद्द करा,कार्यभारानुसार प्रत्येक शाळेत कला व क्रीडा शिक्षकांची विशेष पद तात्काळ भरा,वादग्रस्त संस्थांमधील मुख्याध्यापक व सर्व प्रकारच्या मान्यतेची अधिका शिक्षणाधिकाऱ्यांना द्या , वैद्यकीय प्रतिपूर्ती मध्ये चिकन गुनिया, स्वाइन फ्ल्यू ,डेंग्यू ,कोरोना व पोस्ट कोरोणा या आजारांचा समावेश करा, कोरोना काळातील रजा विशेष रजा म्हणून मंजूर करा , राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची शासनाकडे थकीत असणारी वेतन फरकाची बिले, वैद्यकीय प्रतिपूर्ती, वेतन आयोग फरकाची बिले तात्काळ अदा करा या महत्त्वपूर्ण मागण्यांचा निवेदनामध्ये समावेश करण्यात आला आहे.
या धरणे आंदोलनासाठी जिल्ह्यातून शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हा सचिव रोहित जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!