क्रीडा व मनोरंजन

महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची विजयी सलामी ५५ वी पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा

Spread the love

उस्मानाबाद २० नोव्हें. (क्री. प्र.) महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघानी ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष महिला खो खो स्पर्धेत विजयी सलामी देताना डावाने विजय मिळवले.

भारतीय खोखो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खोखो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धा तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात रविवारी सुरू झाली. आज झालेल्या सामन्यांमध्ये महाराष्ट्राचे दोन्ही सामने मॅटवर झाले.

पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने मध्यप्रदेशवर २०-८ असा डावाने विजय मिळविला. यात सुयश गरगटे २:२० मिनिटे संरक्षण व ५ गुण मिळवत अष्टपैलू खेळी केली. रामजी कश्यपने ३:२० मिनिटे संरक्षण करताना महाराष्ट्राची बाजू
भक्कमपणे सांभाळली. निहार दुबळेने आपल्या धारदार आक्रमणात ४ गुण मिळवले. मध्यप्रदेश कडून विवेक यादव व सागर यांनी प्रत्येकी २-२ गुण मिळवत एकाकी लढत दिली.

महिलांच्या सामन्यात महाराष्ट्रने तेलंगणाचा १९-६ असा डावाने धुवा उडवला. महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळेने तेलंगणा विरुद्ध ७ गुण मिळवताना विजयाची पायाभरणी केली. रेश्मा राठोडने (२:१० मि. संरक्षण व ४ गुण) अष्टपैलू खेळ केला तर रूपाली बडे व दिपाली राठोड ( प्रत्येकी २:५० मि. संरक्षण) व अपेक्षा सुतार ( २:४० मि. संरक्षण) यांनी महाराष्ट्राला मोठा विजय मिळेल याची काळजी घेतली. तेलंगणाच्या कृष्णम्माने दिलेली अष्टपैलू लढत अपुरी पडली.

——-
कोल्हापूर व गतविजेत्या रेल्वेचे शानदार विजय

अन्य एका मराठी खेळाडूंचा भरणा असलेल्या पुरुषांच्या सामन्यात गतविजेत्या रेल्वेने मणिपूरला १३-११ असे डावाने पराभूत केले.

कोल्हापूरच्या पुरुष संघाने सुद्धा उत्तर प्रदेशवर १५-१० असा डावाने विजय मिळविला. कोल्हापूरच्या आदर्श मोहितेने आपल्या धारदार आक्रमणात आठ गुण मिळवत १:३० मिनिटे सरक्षणाची खेळी केली, अविनाश देसाईने (२:१० मि. संरक्षण व २ गुण) अष्टपैलू खेळी केली. रामेश्वर यादवने १ मि. संरक्षण करताना २ गुण मिळवले.

अन्य निकाल : महिला : तामिळनाडू वि.वि. पुदूचेरी १३-५, पश्चिम बंगाल वि.वि. झारखंड १८-८ डावाने, गुजरात वि.वि. मध्यभारत १०-५ डावाने, केरळ वि. वि. दादरा नगर हवेली २६-१ डावाने, मणिपूर वि.वि. इंडियन तीबेट बॉर्डर पोलिस १०-७ डावाने, भारतीय विमान प्राधिकरण वि.वि.मध्य प्रदेश १७-१४, कर्नाटक वि.वि. छत्तीसगड ११-५ डावाने, हरियाणा वि.वि. हिमाचल प्रदेश २४-४ डावाने.

पुरुष : कर्नाटक वि.वि. झारखंड १२-७ डावाने, दादरा नगर हवेली वि.वि.अरुणाचल प्रदेश १७-१४, जम्मू काश्मीर वि.वि. इंडियन तीबेट बॉर्डर पोलिस २५-७ डावाने, तेलंगणा वि.वि. गोवा १७-८ डावाने, तामिळनाडू वि.वि. पंजाब १५-१३ डावाने, आंध्र प्रदेश वि.वि. राजस्थान १२-११ (७.२० मिनिटे राखून), ओरिसा वि.वि. सीमा सुरक्षा बल १३-१२ (६.३० मिनिटे राखून).
———–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!