ताज्या घडामोडी

दिव्यांग हा समाजाती अत्यंत महत्त्वाचा घटक, खासदार राजेंद्र गावित

Spread the love

जागतिक अपंग दिनी पालघर मध्ये तीन दिव्यांग जोडपी विवाहाच्या बंधनात

पालघर जिल्हा प्रतिनिधी
दिव्यांग हा समाजातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील घटक असून या घटकाला स्वयंरोजगाराबरोबरच समानतेचीही वागणूक देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी केले.

जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून वंदे मातरम अंध अपंग सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शनिवारी (ता. ३) पालघर येथील विठ्ठल मंदिर सभागृहामध्ये दिव्यांगांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात विवाहाच्या बंधनात अडकलेल्या दिव्यांगांना शुभेच्छा देण्यासाठी पालघर चे खासदार राजेंद्र गावित उपस्थित होते. यावेळी बोलताना गावित यांनी सांगितले की, विवाह हा एक पवित्र संस्कार असून वंदे मातरम संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांना विवाहाच्या बंधनात अडकवण्याचे पवित्र काम संस्था करत आहे. या संस्थेच्या कार्यासाठी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत असे सांगून विवाहबद्ध झालेल्या नवदांपत्यास आशीर्वाद दिले.

तर या सामुदायिक विवाह सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी सांगितले की, दिव्यांगांना विवाहाच्या बंधनात अडकविणे हे अत्यंत कठीण काम आहे. गेल्या काही वर्षापासून आम्ही हा सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होत असून मनाला सुखद आनंद देणारा हा सोहळा आहे. तर आंतरराष्ट्रीय ॲथलीट स्नेहल राजपूत यांनी, वंदे मातरम संस्थेचे कार्यालय सध्या सफाळे येथील एका पडक्या वास्तूत असून दिव्यांगांच्या विविध समस्या सोडविणाऱ्या या संस्थेला स्वतंत्र कार्यालयाची गरज आहे. शासनाने त्यांना कार्यालय उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली. तसेच पालघर मधील दिव्यांगांनी खेळामध्ये दाखवलेले कौशल्य हे उल्लेखनीय असून अशा दिव्यांगांना मार्गदर्शन करतांना मला खूप आनंद होत आहे असे सांगितले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंदे मातरम संस्थेचे अध्यक्ष विनोद राऊत होते. राऊत यांनी विविध दात्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने संस्थेला विविध उपक्रम यशस्वीपणे करता येत असल्याचे सांगितले. संस्थेचे सल्लागार प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की गेल्या आठ-दहा वर्षात वंदे मातरम संस्थेच्या माध्यमातून ३५ दिव्यांग सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह बद्ध झाले आहेत. संस्थेतर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना शाला उपयोगी वस्तू, निसर्गदर्शन सहल, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे, दिव्यांगांच्या स्पर्धा, गोड दिवाळी आदी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.याप्रसंगी संस्थेचे सल्लागार डॉ. राजेंद्र चव्हाण, सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळाचे माजी अध्यक्ष तथा शाहीर गंगाराम घरत, रोटरी क्लब ऑफ पालघर चे सेक्रेटरी संजय महाजन तसेच संस्थेच्या सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये तीन दिव्यांग जोडपी विवाहबद्ध झाली. विविध संस्थां व दात्यांच्या माध्यमातून विवाहित जोडप्यांना मंगलसूत्र, संसारोपयोगी भांडी, भेटवस्तू देण्यात आल्या.

यावेळी विधाता ग्राफिक्स चे सुरेश सावला व त्यांचे सहकारी, योगेश पालेकर, आनंद राऊत, विशाल साखरे, संस्थेच्या सचिव नीता तामोरे, गीतेश्री तरे, दीपा घाटाळ, वनिता माळी, महेंद्र भिडे व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

विवाह सोहळ्यास वर्हाडी मंडळींनी मोठी गर्दी केली होती. सोहळ्याचे सुत्रसंचालन दीपेश मोरे यांनी केले. तर विरार येथील विवा महाविद्यालयातील एन. एस. एस.च्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!