महाराष्ट्र

गोरगरीब आणि गरजुंची मदत हीच खरी देशसेवा: पोलीस महानिरीक्षक रणदीप दत्ता

Spread the love

 

तळेगाव दाभाडे, 20 जुलै (आ.प्र.)

पॅरा मिलिटरीचे प्रशिक्षण घेताना शिस्त, कठोर परिश्रम, सुरक्षितता पाळून स्वत:ला सक्षम करा. जवान म्हणून कर्तव्य बजावताना आई-वडील, भाऊ-बहिण यांना आधार द्या तसेच गोरगरीब गरजुंच्या मदतीसाठी सतत प्राधान्य देणे ही सर्वात मोठी देशसेवा आहे, असे आवाहन सीआरपीएफचे पोलिस महानिरीक्षक रणदीप दत्ता यांनी केले.

 

येथील सीआरपीएफ ग्रुप सेंटर मध्ये आसाम राज्यातील युवकांच्या प्रशिक्षणासत्रास प्रारंभ झाला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमाचे मुख्यअतिथी रणदीप दत्ता यांनी मार्गदर्शन केले. देशभरातील 5 लाख उमेदवारांमधून निवडलेल्या 18 ते 30 वयोगटातील 390 आसामी युवकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळीकेंद्राचे उपमहानिरीक्षक बिरेन्द्र टोप्पो, उपमहानिरीक्षक धीरज कुमार, बटालियन कमाडन्ट पारस नाथ, डॉ. मनिष कुमार तिवारी आणि वरिष्ठतम अधिकारी उपस्थित होते.

देशाची अंतर्गत सुरक्षा राखण्यासाठी निवड झालेल्या युवकांना आवश्यक ते कठीण प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यात शस्त्रविद्या, फायरिंग, आपत्कालीन मदतीसाठी कौशल्ये, व्हीआयपी सुरक्षा, मॉब व दंगल नियंत्रण, बॉम्ब डिस्पोजल, मॅप रिडिंग, फिल्ड क्राफ्ट टॅक्टिस तसेच जंगल वॉर फेअर अशा विविध प्रकारांचा समावेश असल्याचे प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बिरेन्द्र टोप्पो यांनी यावेळी सांगितले.

रणदीप दत्ता पुढे म्हणाले, की संतांच्या आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या भूमीत असे प्रशिक्षण घेण्याचे भाग्य आसामी युवकांना भारत सरकारच्या माध्यमातून मिळाले आहे. त्यामुळे त्याच तोडीने स्वतःला सिद्ध करण्यासाठी जवानांनी प्रयत्न केले पाहिजेत. उपेक्षितांच्या मदतीसाठी सतत सज्ज राहावे आणि पगारातील रकमेचा काही भाग गरजुंसाठी खर्च करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थी युवकांशी संवाद साधला. त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमातही ते सहभागी झाले.

उप कमान्डट राकेश कुमार यांनी आभार प्रदर्शित केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!