ताज्या घडामोडी

पालघर तालुक्यातील शालेय स्पर्धा दिवाळीनंतर होणार सुरू, तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची सभा संपन्न

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी
कोरोना काळात गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शालेय स्तरावरील स्पर्धा सुरू होत असून पालघर तालुक्यातील शालेय स्पर्धा दिवाळीनंतर सुरू होतील. बोईसर येथील डॉन बॉस्को विद्यालयाच्या सभागृहामध्ये पालघर तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची सभा सोमवारी (तारीख ३) पार पडली.

या सभेला पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, स्पर्धांमध्ये तालुकास्तरीय १० स्पर्धा होणार असून बाकीच्या स्पर्धा ह्या जिल्हा, विभाग व राज्यस्तरापर्यंत होणार आहेत. यावर्षी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होणार नाहीत. राज्यस्तरावरील काही स्पर्धांचे नियोजन जिल्ह्यामध्ये केले जाणार असून त्यासाठी पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांची सभा आयोजित केली आहे.

यावेळी पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष डेरेल डिमेलो यांनी शालेय स्पर्धा आयोजित करतांना केंद्रप्रमुखांना खर्च करावा लागत असल्याने शासनाने अशा स्पर्धांच्या आधी निधी उपलब्ध करून द्यावा, पालघर तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढून शालेय स्पर्धांचे आयोजन तालुक्याच्या क्रीडा संकुलामध्ये करण्यात यावे अशी मागणी केली. तर पालघर तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी आता दोन दिवसांमध्ये शाळांच्या सहामाही परीक्षा सुरू होत असून तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात शिक्षक वर्ग काढला आहे. म्हणूनच तालुक्याच्या क्रीडा स्पर्धा दिवाळीच्या सुट्टीनंतर घेतल्या जातील असे जाहीर केले.

या सभेमध्ये पालघर तालुका स्तरावरील कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, ॲथलेटिक, योगा, कॅरम, बुद्धिबळ, कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट या स्पर्धा दिनांक १५ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहेत. येत्या काही दिवसात स्पर्धेसाठी ऑनलाईन लिंक दिली जाणार असून ती भरून शाळांनी आपला प्रवेश निश्चित करावा असे ठरले. तसेच क्रीडा केंद्रप्रमुख म्हणून राम पाटील यांना कायम ठेवून सह क्रीडा केंद्रप्रमुख म्हणून कमलाकर पाटील, आशिष पाटील आणि पराग पाटील यांची निवड करण्यात आली.

पालघर तालुका केंद्रप्रमुख राम पाटील यांनी या सभेचे प्रास्ताविक केले. प्रकाश पळसुळे यांनी या सभेचे सूत्रसंचालन केले. या सभेसाठी पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष डेरेल डिमेलो, पालघर तालुका शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष विलास पाटील, केंद्रप्रमुख राम पाटील, माजी केंद्रप्रमुख अशोक चौधरी, उपकेंद्र प्रमुख कमलाकर पाटील, आशिष पाटील, पराग पाटील तसेच तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!