ताज्या घडामोडी

वैज्ञानिक दृष्टिकोनच भारतास जागतिक महासत्ता बनवेल. -संजय बनसोडे

Spread the love

इस्लामपूर दि. वार्ताहर: अंधश्रद्धा सोडा, बुद्धिप्रामाण्यवादी व्हा. धर्म संस्कृतीची चिकित्सा करा. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करा. तरच भारत जागतिक महासत्ता बनेल असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी केले.

 

ते येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या “वैज्ञानिक जाणीवा” एकदिवशीय कार्यशाळेमधील द्वितीय सत्रात बोलत होते. मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालय व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या एम ओ यु कराराअंतर्गत, संयुक्त विद्यमाने आयोजित,महाविद्यालयाच्या ‘विवेक प्रबोधिनी’ विभाग आणि अग्रणी महाविद्यालय प्रायोजित एकदिवसीय कार्यशाळेमध्ये बोलताना ते पुढे म्हणाले,”वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे जेवढा पुरावात तेवढाच विश्वास. वैज्ञानिक दृष्टिकोन विचार पद्धतीमध्ये स्वायत्तता, निर्भयता व नम्रता विकसित झाली पाहिजे. श्रद्धा व अंधश्रद्धा वैज्ञानिक कसोटीवर तपासून पाहिल्या पाहिजेत. आजही गुप्तधनापोटी नरबळी देण्याचे अघोरी प्रकार घडत आहेत. बुवा-बाबा भटजींचे अमाप पीक आले आहे. अशा परिस्थितीत आपणास डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांची गरज आहे.”
प्रथम सत्रमध्ये संत-समाज सुधारक व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरती बोलताना प्रा. डॉ.राम घुले म्हणाले,”9 ऑगस्ट 1989 रोजी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पुणे येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे स्थापना केली. अंधश्रद्धामुक्त विवेकी समाजाच्या निर्मितीसाठी बांधिलकी असलेल्या या संघटनेस धर्माची कालसुसंगत चिकित्सा करणारा, संत-समाजसुधारकांचा वारसा जपणारा समाज निर्माण करणे तसेच भारतीय संविधानाचा मूल्यआशय कृतिशील करणे अभिप्रेत आहे.अश्या वैचारिक भूमिकेतून संघटनेची वाटचाल सुरू आहे. समितीचा देव, धर्म व श्रद्धेला विरोध नसून त्या नावाखाली केल्या जाणाऱ्या शोषणाला विरोध आहे, अशी समितीची भूमिका आहे.भारतीय जीवन बहुदेवतावाद, चमत्कार व अधिभौतिक कल्पनांनी व्यापलेले आहे. गौतम बुद्धांच्यापासून मध्ययुगातील संतपरंपरेने अंधश्रद्धा, बहुदेवता, पाखंडीपणा, भोंदूगिरी, तांत्रिक-मांत्रिकतेला अभंग व भारुडातून प्रखर विरोध केला. संत नामदेव, संत ज्ञानदेव, संत तुकाराम महाराजांनी भोंदू, बुवा, मांत्रिक, पुरोहित व भटजी यांच्या शोषणातून बहुजन समाजाला मुक्त केले. संतांनी जंतर-मंतर,चेटूक-मेटूक, करणी-मारणी या अघोरी प्रथा तसेच यज्ञ-याग जप-तप तीर्थक्षेत्र,व्रतवैकल्य, जत्रा-यात्रा-फित्रा यावर टीका करून समाजाचे प्रबोधन केले. महाराष्ट्रातील बाळशास्त्री जांभेकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,लोकहितवादी, आगरकर, महर्षी शिंदे, राजर्षी शाहू, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, प्रबोधनकार ठाकरे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देवधर्माची चिकित्सा करून अनिष्ट रूढी प्रथेतून समाजास मुक्त केले. समाजधारकांनी अंगारे -धुपारे, भानामती, गंडदोरे,ताईत, वाघ्या मुरळी पशुबळी अशा अनेक अनिष्ट रूढीतून समाज मुक्त करून तो अधिक निर्भय, शोषणमुक्त नीतिमान व विवेकशील बनविला.”
तृतीय सत्रामध्ये प्रसिद्ध वक्ते व संशोधक डॉ नितीन शिंदे म्हणाले,”अनादी कालापासून आकाशातील ग्रह ताऱ्यांचे मानवास आकर्षण राहिले आहे. आकाशातील तारकापुंजाच्या समूहास मानवाने नक्षत्र कल्पिले. ग्रहगोलांचे मानवी जीवनावर परिणाम होतात, असा भ्रम निर्माण करून विशिष्ट वर्गाने समाजाचे शोषण चालविले. राहू- केतू,कडक मंगळ, गुरु, शनि ग्रहांचा अरिष्ठ व भीती दाखवली. शेकडो प्रकाश वर्षे दूर असलेल्या ग्रहताऱ्यांचा धाक दाखवून आणि खगोलीय घटनांचा गैरफायदा घेऊन जन्मपत्रिका, लग्न कुंडली, शनीची साडेसाती, कालसर्पयोग व गुरुपुष्यामृत योग या नावाखाली समाजाला ठकविले व लुटले. गुणमिलनाचे गौडबंगाल सुरू केले. फल ज्योतिष्य, राशीचे खडे व वास्तुशास्त्र हा फसवणुकीचा फंडा आहे. जाती-वर्ण व्यवस्थेला पूरक असणारी ही थोतांडे टाकून समाजाने बंधुभाव जोपासून एक व्हावे. मानवतावादी-विज्ञानवादी जीवन जगावे.”
कार्यशाळेच्या चौथ्या सत्रामध्ये भास्कर सदाकळे यांनी बुवा-बाबा हातचलाखी करून समाजाला कसे फसवितात, याची प्रात्यक्षिके करून दाखविली. तांत्रिक -मांत्रिक हे चमत्कार करताना विज्ञान, तंत्रज्ञान आणि हातचालाखी करून भक्तांना फसवतात. शारीरिक मानसिक व आर्थिक शोषण करतात. भूतबाधा-करणी-मुंज्या उतरविण्याच्या नावाखाली शारीरिक शोषण करतात. गुप्तधनाचे आमिष दाखवून नरबळी देतात. फसवणूक झाली तर लोकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्याकडे यावे किंवा पोलीस स्टेशनला दाद मागावी. भारतीय समाजात असलेल्या अनिष्ट, अमानुष रूढी, अंधश्रद्धेतून होणारे शोषण व छळ थांबविण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणाविरोधी कायदा 2013 साली अस्तित्वात आला. भूतबाधा काढणारे, भानामती उतरविणारे, चेटूक देणारे,करणी करणारे अनेक देवऋषी-भोंदू समाजात आहेत.अज्ञ लोकांचा छळ-कपट करून त्यांना आपले बळी बनवितात. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा.”
कार्यशाळेचे समन्वयक भूगोल विभाग प्रमुख प्रा. के. बी. पाटील यांनी कार्यशाळेचे उत्कृष्ट संयोजन-सूत्रसंचालन केले. कार्यशाळेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले.कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक करताना ते म्हणाले,”अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजातील दुष्ट रूढी-अंधश्रद्धा निर्मूलन, जातीअंत संकल्प, महिला सक्षमीकरण, जोडीदाराची विवेकी निवड, विज्ञान बोधवाहिनी व कार्यकर्ता प्रशिक्षण इत्यादी द्वारे समाज पुरोगामी बनविण्याचा प्रयत्न करते.” कार्यशाळेच्या सत्रअध्यक्षपदी प्रा बी.डी. खामकर व प्रा. शेखर खोत हे होते. प्रा. डॉ. अशोक मरळे व प्रा. निलेश डामसे हे उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये ६० विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती क्रियाशील सभासदत्वाचे फॉर्म भरून घेण्यात आले. विद्यार्थिनींना कार्यशाळेची प्रमाणपत्रे वाटण्यात आली. कु. नेहा पाटील व वैष्णवी औंधकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यशाळेची समाप्ती झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!