क्रीडा व मनोरंजन

महाराष्ट्राचे दोन्ही संघ सुवर्ण पदकापासून एक पाऊल दूर उपांत्य फेरीत दिल्ली, कर्नाटकला नमवले. आज अंतिम फेरी

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी: बाळ तोरसकर

अहमदाबाद, २ ऑक्टोबर, (क्री. प्र. ) : महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खोखो संघांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारुन सुवर्णपदक जिंकण्याच्या निर्धारावर शिक्कामोर्तब केले. दोन्ही संघ अंतिम फेरीत दाखल झाल्यामुळे दोन्ही संघ सुवर्ण पदकापासून एक पाऊल दूर असल्याची भावना खो-खो क्षेत्रात उमटली आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेत निविर्वाद वर्चस्व गाजवले असल्याने दोन सुवर्ण पदक जिंकण्याच्या आशा व्यवस्थापनाला वाटत आहेत. दोन्ही गटातील अंतिम सामना मंगळवारी होणार आहे.

संस्कारधाम इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या खोखो स्पर्धेत महिला गटातील पहिल्या उपांत्य लढतीत महाराष्ट्राने दिल्लीचा २२-१४ (२२-६) असा एक डाव ८ गुणांनी धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली. सुरवातीलच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दिल्लीविरुद्ध २२ गुणांची कमाई करत सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. तब्बल २२ गुणांची आघाडी घेतल्याचा फायदा महाराष्ट्र संघाला झाला. दिल्ली संघ दबावात आला. त्यांना पहिल्या आक्रमणात अवघे सहा गुण मिळवण्यात यश मिळाले. महाराष्ट्र संघाने १६ गुणांची आघाडी घेतल्यामुळे दिल्ली संघावर फॉलोऑन लादण्यात आला. फॉलोऑन मिळाल्यानेतर दिल्ली संघाचा खेळ अधिकच ढेपाळला. दिल्लीला केवळ ८ गुण मिळवता आले. महाराष्ट्र संघाने एक डाव आणि ८ गुणांनी बाजी जिंकत अंतिम फेरीत धडक मारली.

महाराष्ट्राच्या महिला संघाकडून प्रियांका भोपी (३:२० मि. संरक्षण), प्रियांका इंगळे (३:५० मि. संरक्षण व ८ गुण ), रेश्मा राठोड (२ मि. संरक्षण व ६ गुण) व अपेक्षा सुतार (२ मि. संरक्षण व २ गुण) या खेळाडूंनी अफलातून खेळ करताना दिल्लीच्या आक्रमणातील धार बोथट केली. महाराष्ट्राच्या या खेळाडूंनी केलेल्या चौफेर कामगिरीने त्यांनी अंतिम रुबाबात प्रवेश केला. दिल्लीकडून परवीन निशा, मधू या खेळाडूंनी झुंज दिली.

दुस-या उपांत्य लढतीत ओडिशाने कर्नाटकचा १२ गुणांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत महाराष्ट्राचा सामना ओडिशा बरोबर होणार आहे. साखळी फेरीत महाराष्ट्र संघाने ओडिशा संघाला नमवले आहे. साहजिकच महाराष्ट्र महिला संघाकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा बाळगली जात आहे.

पुरुष गटातील पहिल्या उपांत्य लढतीत महाराष्ट्राने कर्नाटकवर २६-१० असा एक डाव आणि ४ गुणांनी विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात महाराष्ट्राने वर्चस्व गाजवले. महाराष्ट्राच्या अविनाश देसाईने ८ गुणांची कमाई करुन संघाला सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले. प्रतिक वाईकरने अष्टपैलू कामगिरी नोंदवताना २ मि. पळतीचा खेळ केला व २ गुणांची कमाई केली. लक्ष्मण गावसने १ मिनीटे संरक्षण केले व २ गुण संपादन केले. अक्षय भांगारेने १:३० मिनीटे पळतीचा खेळ केला. निहार दुबळेने १:२० मिनीटे संरक्षण केले व ४ गुण मिळवत संघाची स्थिती भक्कम केली. दिलराज सेनगरने २:१० मिनीटे पळतीचा खेळ केला आणि २ गुण मिळवले. राजमी कश्यपने २ मिनीटे व १:४० मिनीटे संरक्षण करुन सर्वांचीच मने जिंकली. कर्नाटककडून महेश, सुदर्शन व शशीकुमार यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतु, महाराष्ट्र संघाने सामन्यावरील पकड कायम ठेवत अंतिम फेरी गाठली.

महिला व पुरुष गटात महाराष्ट्राचे संघ अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. दोन्ही संघांकडून सुवर्णपदकाची खात्री आहे, असा विश्वास भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खोखो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा, संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले, कमलाकर कोळी, प्रवीण बागल यांनी व्यक्त करुन अंतिम फेरीसाठी दोन्ही संघांतील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!