ताज्या घडामोडी

भक्तिभावाचा -कोंकणातील शिमगा

Spread the love

गाव तरवळ ता.जि.रत्नागिरी येथील शिमगोत्सव साजरा करण्यासाठी गावातील लहानथोर मंडळी, पाहुणे मंडळी, गावातील मानकरी, कारभारी,गावप्रमुख आणि मुंबईकर चाकरमानी आपल्या कुटुंबासह आवर्जून हजर असतात.
खास करून पुण्या – मुंबईतील चाकरमानी दोन ते तीन महिने आधीपासून तयारी करत असतात.मग रेल्वेची तिकीट असूद्या किवा महत्वाची खरेदी सुद्धा करून ठेवत असतात. गावातील बरीच कुटुंब मुंबईत स्थायिक झाली असल्यामुळे त्यांचे घर बंद करून ठेवलेले असते. त्यामुळे शिमग्यानंतर ग्रामदैवत घरी येणार असल्यामुळे आधीच तयारी करावी लागते. म्हणूनच दोन,चार दिवस आधीच गावाला येवून घराची साफसफाई, अंगण सारवण करून त्यावर रांगोळी काढून आजूबाजूचा परिसर सजवून ठेवलेला असतो.गावातील मंडळी त्याचबरोबर नातेवाईक आणि पाहुणे घरी येणार असल्याने त्यांचेही स्वागत केले जाते.कोंकणातील शिमगा फाग पंचमी पासून पुढे दहा दिवस होळी उत्सव साजरा केला जातो. रोज संध्याकाळी बालगोपाळ एकत्र जमून होळीच्या ठिकाणी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. मुंबईतील चाकरमानी व ग्रामस्थ एकत्रितपणे स्पर्धा खेळतात.

त्यात प्रामुख्याने, कब्बडी, खो खो, महिलांसाठी लंगडी,आबाधुबी,धावण्याची शर्यत, रस्सीखेच अशा विविध प्रकारच्या स्पर्धा होत असतात.
तरवळ गावच्या शिमग्याचे एक वेगळेपण आहे ते म्हणजे तेरसेला शिमगे होतात. म्हणजेच इतर शिमग्यांच्या तीन दिवस आधी शिमगे होतात. दहाव्या दिवशी जत्रोत्सव असतो त्या दिवशी सान भरते.सानेवर पालखी सजवून अलंकार व भरजारी वस्त्र नेसवून गावातील गुरवांकडून देवींची पूजाअर्चा केल्यावर गावप्रमुख, कारभारी, मानकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने पुढील कार्यक्रमाला सुरुवात होते. दिवसभराच्या कार्यक्रमाचे नियोजन वरील मंडळी करीत असते. त्याप्रमाणे माड (आंब्याचे किंवा सुडमाड) वाजत गाजत आणतात.जत्रेच्या ठिकाणी होळीची(होलिका) तयारी होते. एकडे माड उभा केला जातो तर दुसऱ्या बाजूला होळीची पूजा व उपस्थित ग्रामस्थ मंडळींकडून पाच फेरे मारून होळीला अग्नी दिला जातो.पेटत्या होळीतून नारळ काढून प्रसादी करण्याची प्रथा आहे.देवीला नैवद्य दाखवून झाल्यावर दुसरीकडे जत्रा सुरू होऊन लहान थोरांपासून खरेदीची लगबग सुरू झालेली असते. इकडे ग्रामस्थांच्या वतीने पालखी नाचविण्यात येते, व पुढील कार्यक्रम कोकणचे नमन दाखविले जाते.अशाप्रकारे दिवसभराचे कार्यक्रम आटोपून पालखी सायंकाळी मूळ ठिकाणी नेवून दुसऱ्या दिवशी पासून पालखी गावातील वाडीमध्ये प्रत्येकाच्या घरी दर्शनाला नेण्यात येते. घरी देवीच्या आगमनाची तयारी केलेली असते. येणाऱ्या ग्रामस्थांना चहापाणी, नाष्टा दिला जातो.गुरव पूजा करून घंटा नाद करतो . याच घंटा नादच्या आवाजाने बाहेर ढोल वाजविले जातात.गावप्रमुख देवीला गाऱ्हाणे घालतात व सर्वाँना सुखी ठेवण्याचे व काम धंद्यात यश मिळावे अशी देवीला आर्जव करतात. परंपरेप्रमाणे घरामध्ये माहेरवाशिणी देवीची हळद कुंकू लावून पूजा करून देवीची ओटभरणी केली जाते.घरातील कुटुंब प्रमुख देवीच्या चरणी नतमस्तक होऊन सगळ्यांना सुख समृद्धी मिळावी अशी देवीला प्रार्थना करून गुरुवांच्या घंटा नादाने वाजत गाजत पालखी दुसऱ्या घराच्या दिशेने मार्गस्थ होते. हे सर्व होत असताना बाहेर अंगणात नमन नाचविले जाते यात शंकासुर, गोमू आणि कुचे वाल्यांचा नाच होतो.काही कलाकार मंडळी आपली कला सादर करतात. यामध्ये जुनी नवी गाणी गाऊन मनोरंजन केले जाते. सदर वरील संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कारभारी श्री प्रदीप पांडुरंग कुळये, गावप्रामुख श्री भिकाजी गंगाराम कुळये, श्री बाळासाहेब मायंगडे,श्री वसंत गंगाराम कुळये,श्री रवींद्र लक्ष्मण कुळये,श्री महादेव देमाजी मायंगडे,श्री महादेव धाकू माचिवले,श्री तानाजी गोविंद माचिवले,श्री बंडू गोविंद माचिवले, कला शिक्षक श्री अर्जुन धाकू माचिवले, सर्व गावातील अधिकारी, मानकरी आणि समस्त तरवळ ग्रामस्थ मंडळी यांचे मोलाचे योगदान आणि सहकार्य या शिमग्यानिमित्त गावातील जनतेला लाभते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!