ताज्या घडामोडी

शिट्टी वादक : रुपेश मुरुडकर

Spread the love

शिट्टी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे दोन ओठांचा चंबू करायचा आणि तोंडातील हवा बाहेर काढायची. शिट्टी वर काही जण अगदी सहजपणे वेगवेगळ्या पक्षांचे आवाज काढण्यात तरबेज असतात. जवळ ८० ते ९0 टक्के लोक शिट्टी वाजवू शकतात. काहीजण छंद म्हणून शिट्टीवर गाणे गुणगुणत असतात परंतु आपल्याकडे असेच एक कलाकार आहेत जे फक्त शिट्टी वाजवत नाहीत तर ते शिट्टीला गाण्याचा आकार देतात, अगदी कोणतंही गाणं सहजपणे मधुर आवाजात गाण्याच्या आलापासह गातात.
ही व्यक्ती आहे जिल्हा रत्नागिरी मधील दापोली तालुक्यातील इळणे गावचे सुपुत्र रुपेश मुरुडकर. त्यांना अगदी
लहानपणापासूनच शिट्टी वाजवण्याची प्रचंड आवड.त्यांचे वडील स्व.हरिश्चंद्र गोविंद मुरुडकर हे स्वतः अतिशय सुंदर शिट्टी वादन करायचे.शेतात नांगर धरताना, किंवा घराच्या आवारात काम करताना, जंगलात गायी, गुरे राखताना त्यांच्या ओठातून आपसूकच शिट्टीचे सूर निघायचे. वडिलांची ही आगळी वेगळी कला मात्र रुपेश मुरुडकर यांनी अगदी लहानपणापासून जीवापाड जपली आहे. अगदी सुरुवातीला त्यांना गाणे गाण्यास त्रास व्हायचा. मात्र मुळातच त्यांच्या वडिलांमध्ये हे गुण असल्याकारणाने त्यांनी ही कला लवकरच आत्मसात केली. अगदी प्राथमिक शाळेपासून ते कॉलेजपर्यंत त्यांना शिट्टीचे प्रचंड वेड. रेल्वेच्या डब्यात खिडकीच्या बाजूला बसून हळू आवाजात शिट्टी वाजवून ते आनंद घेत असत. बाजूला बसलेल्या प्रवाशांना मात्र त्यांची शिट्टी खूप आवडायची. त्यामुळे रुपेशजींचा आपल्या कलेवरचा विश्वास वाढू लागला.
हळूहळू त्यांनी ओमकाराचा आधार घेऊन शिट्टीचे सुर वाढवण्यास सुरुवात केली. हिंदी, मराठी चित्रपट गीते, कोळी गीते, भक्ती गीते, भावगीते, गझल, भजने, मंगलाष्टके, अशी अनेक गीते अगदी सहजपणे ते सुमधुर शिट्टीच्या आवाजात गायला लागले. रोटरी क्लब पार्लेश्वर (कला दर्पण फेस्टिवल )च्या माध्यमातून सौ. स्मिता दत्तात्रय पुराणिक यांच्या प्रयत्नाने त्यांना या कार्यक्रमाद्वारे रोटरी क्लब ऑफ पार्लेश्वर (कला दर्पण फेस्टिवल ) या कार्यक्रमात पहिला ब्रेक मिळाला . त्यांच्या शिट्टीच्या सुमधुर आवाजातील अनेक अल्बम्स यू ट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध झाले आहेत.त्यांनी अनेक गाणी रेकॉर्डिंग केली आहेत. या कलाकाराची सह्याद्री दूरदर्शन वाहिनीने दखल घेऊन ‘ ”विचारांच्या पलीकडले” या कार्यक्रमात त्यांची प्रसिद्ध अभिनेते रोहन गुजर यांनी दिलखुलास मुलाखत घेतली, त्यामुळे हा गुणी कलाकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला. अनेक स्वप्न उराशी बाळगून रुपेश आपली अनोखी कला अगदी प्रामाणिकपणे जीवापाड जपत आहेत.
सामना, पुढारी, चौफेर संघर्ष, रत्नभूमी, लोकनिर्माण वृत्तपत्र अशा अनेक वृत्तपत्रातून त्यांना प्रसिध्दी मिळाली .अनेक यू ट्युब चॅनेल द्वारे त्यांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. त्यांनी शिट्टीच्या आवाजात गायलेले ए मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गीत अनेक पोलिस स्थानकात सादर केले आहे. नुकतेच त्यांना दापोली येथील नवभारत छात्रालय कुणबी सेवा संस्थेच्या वतीने 75 व्या सुवर्ण सोहळ्यात केंद्रीय मंत्री आणि कोकणचे शिवसेनेचे लाडके खासदार श्री. अनंतजी गीते यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. तसेच मे २०२२ रोजी श्रमजीवी संस्था माणगाव (कुणबी भवन ) येथे “श्रमजीवी भूषण” पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.”आर्ट बिट्स फाउंडेशन” या संस्थेच्या वतीने नुकतीच त्यांची “कला सन्मान” या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.आपल्या आगळ्या वेगळ्या कलेमुळे या कलाकाराची शिट्टी वादक रुपेश मुरुडकर या नावाने ओळख निर्माण झाली असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
त्यांची गाणी यू ट्यूब चॅनेलवर Rupesh Murudkar या नावाने उपलब्ध असून त्यावर त्यांचे व्हिडिओज आपण पाहू शकता.ह्या गुणी कलाकाराचे गुण हेरून जन संपर्क अधिकारी श्री विलास कुलकर्णी यांनी त्याला कलाकारांचा मंच असलेल्या जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच समूहात सामील करून घेतले आहे.त्याला पुढील वाटचालीसाठी जागतिक साहित्य कला व्यक्तित्व मंचाचे अध्यक्ष श्री पांडुरंग कुलकर्णी यांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा.

विलास कुलकर्णी
मीरा रोड
7506848664

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!