ताज्या घडामोडी

४ थी आशियाई खो-खो स्पर्धा

Spread the love

महाराष्ट्राचा अक्षय भांगरे भारतीय पुरुष संघाचा कर्णधार तर भारतीय विमान प्राधिकरणची नसरीन शेख महिला संघाची कर्णधार

यजमान भारताचा श्रीलंकेवर मोठा विजय

क्रीडा प्रतिनिधी: बाळ तोरसकर

मुंबई, २० मार्च (क्री. प्र.): ४ थी आशियाई खो-खो स्पर्धा तामूलपूर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गुवाहाटी (आसाम) येथे होत असून यामध्ये पुरुष आणि महिलांमध्ये प्रत्येकी आठ देशांचे संघ सहभागी झाले आहे. अ गटात समाविष्ट असलेल्या भारतीय संघाला प्रत्येकी तिन सामने गटात खेळावे लागणार आहेत. भारतीय पुरुष संघाचे कर्णधारपद भुषवण्याचा मान महाराष्ट्राच्या अक्षय भांगरेला मिळाला असून महिला संघाचे कर्णधारपद भारतीय विमान प्राधिकरणाची नसरीन शेख हिच्याकडे सोपवण्यात आले आहे.

हि स्पर्धा सुरवातील साखळी पध्दतीने व नंतर बाद पध्दतीने खेळवली जाणार आहे. पुरुषांमध्ये अ गटात भारत, नेपाळ, इराण, भुतान व ब गटात बांग्लादेश, श्रीलंका, इंडोनेशिआ, कोरिआ यांचा समावेश आहे. तर महिलांमध्ये अ गटात भारत, श्रीलंका, भुतान, मलेशिया आणि व ब गटात बांग्लादेश, नेपाळ, कोरिआ, इंडिनेशिआ यांचा समावेश आहे.

आशियाई खो-खो स्पर्धेचे उद्घाटन झाले असून त्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी हातमाग आणि वस्त्रोद्योग मंत्री उरखाओ ग्वरा ब्रम्हा, उर्जा मंत्री श्रीमती नंदिता गोर्लोसा, लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता, आशियाई खो-खो फेडरेशनचे अध्यक्ष राजीव मेहता, खो-खो फेडरेशनचे अध्यक्ष सुधांशू मित्तल, आसाम खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद बोरो यांच्यासह महाराष्ट्रातून खो-खो फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, राज्य असोसिएशनचे सरचिटणीस अ‍ॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले उपस्थित होते.

पहिल्याच दिवशी यजमान भारताच्या महिला संघाने श्रीलंकेचा ५५ गुणांनी (६८-१३) पराभव केला. भारतीय संघातर्फे प्रियांका इंगळे (२.१० मिनीटे संरक्षण व ४ गुण), रंजना (२.२० मि. संरक्षण व २ गुण), गौरी शिंदे (५ गुण), अपेक्षा सुतार (४ गुण) यांनी चांगला खेळ करत विजयात मोलाची भुमिका बजावली. श्रीलंका संघातर्फे प्रियादार (२ गुण), उदोगौडा (६ गुण) यांनी चांगला खेळ केला. पुरुषांच्या सामन्यात बांग्लादेशने कोरीयाचा ४३-१३ असा ३० गुणांनी पराभव केला.

भारतीय सामान्यांचे वेळापत्रक

साखळी सामने ः
२१ मार्च महिला गट भारत विरुध्द मलेशिया दुपारी ४ वा.
२१ मार्च पुरुष गट भारत विरुध्द इराण सायंकाळी ६ वा.
२२ मार्च पुुरुष गट भारत विरुध्द नेपाळ दुपारी ३ वा.
२२ मार्च महिला गट भारत विरुध्द भुतान सायंकाळी ५ वा.

उपांत्य फेरीचे सामने
२३ मार्च महिला गट दुपारी २ वा.
२३ मार्च पुरुष गट दुपारी २.४५ वा.

अंतिम सामना
२३ मार्च महिला गट सायंकाळी ५ वा.
२३ मार्च पुरुष गट सायंकाळी ५.४५ वा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!