ताज्या घडामोडी

मॉडेल स्कुल बाबत जनजागृती करा– जितेंद्र डुड्डी.

Spread the love

शिराळा येथे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक कार्यशाळा संपन्न.
शिराळा प्रतिनिधी
मॉडेल स्कुल अर्थात माझी शाळा- आदर्श शाळा या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त नागरिकांना देऊन याबाबत जनजागृती करा व जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी केले. शिराळा येथे दिनांक तीन मार्च रोजी सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक कार्यशाळा संपन्न झाली. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, माझी शाळा आदर्श शाळा हा जिल्हा परिषदेचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. मागील अडीच वर्षांपासून यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमाचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हायचा असेल तर या उपक्रमाची माहिती सामान्य नागरिकांना तसेच पालकांना होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा व जनजागृती करावी. ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन कटिबद्ध असून यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मॉडेल स्कुल सोबतच मॉडेल पीएचसी, आरोग्याचे अभा कार्ड व गोल्डन कार्ड याबाबत माहिती देऊन जास्तीत जास्त नागरिकांचे अभा कार्ड व गोल्डन कार्ड काढून घेण्याचे आवाहन केले. त्यांनी जल जीवन मिशनच्या कामांना सुद्धा जिल्हा परिषदेचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन केले. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व घनकचऱ्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन उपस्थित सरपंच व ग्रामसेवकांना केले. शिराळा तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेच्या घरकुलांच्या प्रगती बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले व उर्वरित घरकुले मार्च अखेर पूर्ण करण्याचे आवाहन केले.

कार्यशाळेच्या सुरुवातीला कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दीपक चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक करताना गट विकास अधिकारी संतोष राऊत यांनी विविध योजनांमध्ये शिराळा तालुक्याच्या प्रगतीचा आढावा थोडक्यात सादर केला. त्यानंतर दीपक चव्हाण यांनी आवास योजनेची सविस्तर माहिती उपस्थित सरपंच व उपसरपंच यांना दिली व घरकुले वेळेत पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे आवाहन केले.
त्यानंतर ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ तानाजी लोखंडे यांनी माझी वसुंधरा, नॅशनल पंचायत अवॉर्ड, पंधरावा वित्त आयोग, जन सुविधा, नागरी सुविधा, करवसुली तसेच ग्रामपंचायत विभागाच्या इतर योजनांबाबत सविस्तर माहिती देऊन ग्रामपंचायत अधिनियमाबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप माने यांनी मॉडेल पीएचसी तसेच इतर आरोग्यविषयक योजनांची सविस्तर माहिती दिली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी जल जीवन मिशनच्या कामाबाबत सविस्तर माहिती देऊन सदर कामे वेळेत पूर्ण करून घेण्याचे आवाहन केले. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव यांनी शौचालय बांधकाम, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन तसेच घरगुती नळ कनेक्शन जोडणी याबाबत सविस्तर माहिती देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी मॉडेल स्कुल व शिक्षण विभागाच्या इतर योजनांची सविस्तर माहिती दिली. अंतिमतः मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. गट विकास अधिकारी संतोष राऊत यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्र संचालन कृषी अधिकारी धनाजीराव थोरात यांनी केले.
सदर कार्यशाळेस पंचायत समितीचे सर्व विभाग प्रमुख, विस्तार अधिकारी, सर्व अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवक तसेच तालुक्यातील बहुतांश सरपंच व उपसरपंच उपस्थित होते.

कार्यशाळा समाप्तीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी पंचायत समितीला भेट देऊन पाहणी केली. पंचायत समिती सुसज्ज इमारत, डेमो हाऊस, वृक्षारोपण यांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल गटविकास अधिकारी संतोष राऊत यांचे अभिनंदन केले.

पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामसेवक हे एकच ड्रेसकोड परिधान करून व ओळखपत्र घालून कार्यशाळेस उपस्थित राहिले होते. त्यांच्या या शिस्तबद्धतेचे व एकजुटीचे सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच सरपंच, उपसरपंच यांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!