ताज्या घडामोडी

श्री संत बहिणाबाई संगीत विद्यालय शिऊर ता.वैजापूर जि.औरंगाबाद यांचा सन २०२३चा ‘नादब्रम्ह पुरस्कार’ जाहीर

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

श्री संत बहिणाबाई संगीत विद्यालय शिऊर ता.वैजापूर जि.औरंगाबाद यांचा सन २०२३चा ‘नादब्रम्ह पुरस्कार’ हा खांदेशातील श्री ह. भ. प. भगवान महाराज माळी शहापूरकर, यांना जाहीर।।* त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याविषयी घेतलेला वेध…..
*अवलिया महात्मा*
श्री ह.भ.प.भगवान मला माळी (शहापूरकर) ता. अमळनेर जि. जळगाव (जन्म१९४८)
परम आदरणीय बाबांचा विद्यार्थी दशेनंतरचा काही काळ, दारुची दुकान चालवणे, जुगार, पत्ते,ऊसतोड कामगारांची मुकादमी करणे,नाटकातून काम करणे, आदि एकंदरीत व्यसनी व्यक्तिमत्व म्हणजे बाबा…..!
कालांतराने त्यांनी प्रारंभी आचार्य डॉ.श्री रामजी शर्मा यांच्याकडून ‘गायत्री परिवारा’ची दिक्षा घेतली;परंतु बाबा त्यात रमले नाहीत.
त्यानंतर वयाच्या २७व्या वर्षाच्या दरम्यान गुरूबंधू ह. भ. प. सखाराम बुवा यांनी प्रातःस्मरणीय बंकट स्वामींचे शिष्योत्तम श्री दिगंबर बुवा अमळनेरकर यांच्याशी संपर्क करून दिला. बाबांनी त्यांच्याकडे आपणाला अनेकदा शिष्य करून घेण्याची इच्छा व्यक्त केली; परंतु ते एक व्यसनी बदनाम व्यक्तिमत्व असल्याने तीन वर्षांपर्यंत दिगंबर बाबांनी त्यांच्या संदर्भात कुठलाच विचार केला नाही. शेवटी बाबांचा अनुताप अर्ततापूर्ण आर्जव लक्षात घेऊन अखेर श्रावण अमावस्येला पोळ्याच्या दिवशी शेगाव येथे बाबांना माळ घालून वारकरी संप्रदायाची दिक्षा दिली. त्यानंतर मात्र बाबांचा परमार्थिक प्रवास हा संसारक्षम वळणावरचा ठरला.
पुढे बाबांनी वयाच्या चाळीशीच्या दरम्यान *सवाईराम या महापुरुषासोबत एकही पैसा जवळ नसताना पायी भारत तीर्थयात्रा भ्रमंतीला सुरुवात केली. सतत सात वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने ते चारीधाम यात्रा करतच राहिले. तेव्हा बाबांच्या पत्नी जिजाबाई ह्या सहृदय अंतःकरणाने प्रवासाची सर्व तयारी करून प्रवासासाठी संमती देत असत.
मधल्या काळात आपणाला कीर्तन करता यावे यासाठी बाबांनी दिगंबर बुवांच्या मार्गदर्शनार्थ काही ग्रंथ खरेदी करून जन्म गावातील पांझरा नदी काठावरील प्राचीन गौरेश्वर महादेव मंदिरात अहोरात्र नऊ महिने कठोर अभ्यास साधना केली. सकाळी गंगेचे स्नान अभ्यास, दुपारी स्नान, अभ्यास- चिंतन, संध्याकाळी पुन्हा स्नान ,अभ्यास ,चिंतन आणि ध्यान निवास मात्र मंदिरातच .बाबांची कीर्तनाविषयीची कठोर साधना- जिज्ञासा पाहून गौरेश्वर महादेव मंदिरातील पुजारी सखाराम बुवा यांनी त्यांना कीर्तन करण्याची विनंती केली आणि अंदाजे वयाच्या ३८व्या वर्षी गोकुळाष्टमीच्या पर्वकाळावर सप्ताहात बाबांनी पहिले कीर्तन केले.
त्यानंतर बाबांनी पंचक्रोशी आणि पंचक्रोशी बाहेर जवळपास ३० गावांमधून अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. सप्ताहातून ३५ नवदांपत्यांचे विवाह लावून दिले.
वयाच्या पन्नाशी नंतर तापी पांझरा आणि गुप्त कपिलगंगा या त्रिवेणी संगम स्थळावरील प्राचीन कपिलेश्वर मंदिर क्षेत्रातून त्याला साक्षी मानून पैठणला षष्ठी साठी दिंडी सुरू केली तिचे हे २४ वे वर्षे आहे.
मध्यंतरीच्या काळात गौरेश्वर मंदिरात कीर्तनाची साधना करीत असताना सहा महिन्यानंतर शहापूर गावातील एक अत्यंत श्रीमंत सधन घरचा एकुलता एक युवक श्रीमान आधार बाबुराव पाटील हे बाबांच्या सानिध्यात राहून त्यांची सेवा करू लागले. पुढे बाबांनी त्यांना निवडणुकीत उभे केले ; निवडून आणून सरपंच ते चेअरमन या पदावर पंधरा वर्षेपर्यंत विराजमान केले. त्यांच्या करवी १९९० च्या आसपास गावात ‘एकात्मता माध्यमिक विद्यालयाची’ स्थापना केली त्यातील १६ कर्मचाऱ्यांपैकी ११ लोकांची नियुक्ती स्वतः बाबांनी केली. (बाबांचे चिरंजीव एकनाथ आन्ना ही तेथेच सेवेत आहेत.)
गावात, पंचक्रोशीत, परमार्थात आणि समाजकारणात बाबांचा शब्द लोकं प्रमाण मानतात. गावात ३० वर्षांपासून कुठल्याही प्रकारची निवडणूक न घेता एका प्रकारे शांतता प्रस्थापित करून त्याला स्थैर्य प्राप्त करून दिले.
बाबांना विवाहानंतर ४० ते ४२ वर्षांपर्यंत पत्नीचा सहवास लाभला. त्यांनी(जिजाबाईंनी) अकरा वर्ष दिंडी सोहळ्यात व्यवस्थापन, आदरातीथ्य करुन मनोभावे वारकऱ्यांची व संतांची सेवा केली.
बाबांसह सहा बहिण भावंडांचे संगोपन सावत्र आईने केले. बाबांच्या आधीच्या लहरी वागण्यामुळे त्यांनी बाबांवर कधीच विश्वास ठेवला नाही. परंतु सुनेला मात्र लेकीप्रमाणे वागवत. पत्नीच्या दुर्धर आजारात सर्व जमीन तर गेलीच परंतु पत्नीही गेली! बाबा विदुर झाले!!
बाबांचा पिंड उदार आहे. पंधरा- सोळा वर्षांतील दिंडीतून मिळालेली मिळकत खर्च वजा जाता शिल्लक राहिलेल्या एक ते दीड लाख रकमेतून आपल्या गुरुच्या नावाने गावातील मुख्य प्रवेशद्वार उभारले. काही वेळेस शिल्लक राहिलेल्या पैशातून दिंडीतल्या वारकऱ्यांना कपडे घेऊन शिवून दिले. महिलांना साड्या दिल्या तसेच दिंडीतून वापस जाताना गरीब लोकांच्या तिकिटाची व्यवस्था पण ते करतात. त्यांच्या दिंडी सोबत मुस्लिम बांधव व भगिनीसुद्धा असतात आणि विशेष सेवा ही देतात.
बाबांच्या प्रेरणेने अमळनेर तालुक्यात निमगाव, पढावद, ब्राह्मणे या तीन गावातून विठ्ठल रुक्मिणी मंदिर तर एकतास गावातून राम मंदिर उभारले. विशेष म्हणजे सुमारे २५ वर्षांपूर्वी सुरतमधील उधना उपनगरात संजयनगर भागात तेथील लोकांनी पर प्रांतात बाबांच्या प्रेरणेने विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारले.
महदाश्चर्याची गोष्ट म्हणजे गंगासागरच्या मेळ्यात नागा साधूंमध्ये बाबा हे पाच दिवस ‘नागासाधू’ होऊन राहिले. साधू संतांचा संग बाबांना फार प्रिय आहे.
आजही या वयात श्री संत बहिणाबाई महाराज शिऊरकर यांच्या प्रथम जन्मस्थानावरील बेटावद तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे श्री संत बहिणाबाई महाराजांचे मंदिर उभारण्याचा बाबांचा संकल्प आहे. *पुण्यवंत व्हावे l घेता सज्जानाचि नावे l* या न्यायाने ही प्रस्तुती!
असो, जीवन कृतकृत्य व्हावं आणि आयुष्य शिल्लक असावं असं बाबांचे जीवन आहे. असे अवलिया महात्मा असणाऱ्या बाबांना दीर्घायुष्य लाभो हीच बहिणाबाई चरणी प्रार्थना!! शहापुर ते पैठण पायी वारी नेणारे उत्तर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार गुरुवर्य, ह भ प श्री भगवान महाराज यांना मिळणाऱ्या “नादब्रह्म पुरस्कार” चे आम्ही श्री साई गजानन सेवा मंडळचे एस एम पाटील व भक्त गण समर्थन करतो व त्यांचे अभिनंदन .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!