आरोग्य व शिक्षण

शहिद जनरल बिपीन रावत यांच्या जीवनाचा आदर्श युवा पिढीने घ्यावा – किशोर आवारे

Spread the love

तळेगाव : हेलिकॉप्टर दुर्घटनेतील भारतमातेच्या वीर सुपुत्रांना तळेगावकरांनी कॅन्डल मार्च काढत श्रध्दांजली  वाहिली. हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या देशाचे संरक्षणदल प्रमुख ‘चीफ ऑफ डिफेन्स’ जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांचे कुटुंबिय व वरिष्ठ लष्करी अधिकारी या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना तळेगावकरांनी कॅन्डल मार्च काढत श्रध्दांजली वाहिली.

तळेगावात काल (रविवार) सायंकाळी कॅन्डल मार्च व श्रध्दांजली सभेचे जनसेवा विकास समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या मार्च व श्रध्दांजली सभेसाठी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, ज्येष्ठ नेते, नगरसेवक गणेश खांडगे, माजी नगराध्यक्षा विद्यमान नगरसेविका सुलोचनाताई आवारे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरसेवक निखिल भगत, जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांच्यासह तळेगावकर नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हा कॅन्डल मार्च यशवंत नगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मार्च मराठा क्रांती चौकात आला. या ठिकाणी श्रध्दांजली सभा झाली.

यावेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे म्हणाले”देशाच्या सीमेवर आपले जवान अहोरात्र खडा पहारा देत असतात. त्यामुळेच आपण आज शांत झोपू शकतो. जनरल बिपीन रावत यांनी त्यांच्या लष्करीसेवेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत गाजवलेलं शौर्य, पराक्रम, त्यांची देशभक्ती देशवासियांच्या कायम स्मरणात राहील. युवकांना सैन्यदलात दाखल होण्यासाठी प्रेरणा देईल. जनरल बिपीन रावत यांनी भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणून देशाची संरक्षणसिद्धता, गौरव वाढवण्यात त्यांनी योगदान दिलं. लष्करप्रमुखपदानंतर तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची, संरक्षणदलप्रमुख पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली”.

ज्येष्ठ नेते, नगरसेवक गणेश खांडगे म्हणाले” जनरल बिपीन रावत यांनी पहिले संरक्षणदलप्रमुख म्हणून तिन्ही सैन्यदलांमध्ये सहकार्य, समन्वय वाढवण्याचं काम केलं. प्रदीर्घ लष्करी सेवेत असंख्य लढाया, मोहिमा यशस्वी केल्या. युद्धात आघाडीवर राहून सैन्याचं नेतृत्वं केलं. सहकारी अधिकारी, जवानांचं मनोबल कायम उंच ठेवण्यासाठी प्रयत्नशील त्यांचं नेतृत्वं होतं. त्यांच्यासारख्या भारतमातेच्या वीर सुपुत्राचं झालेलं अपघाती निधन ही देशवासियांच्या मनाला चटका लावणारी घटना आहे.”

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!