क्रीडा व मनोरंजन

पुरुषांमध्ये सरस्वती वि. सह्याद्रि व विद्यार्थी वि. महात्मा गांधी तर महिलांमध्ये सरस्वती वि. दत्तसेवा व शिवनेरी वि. महात्मा गांधी उपांत्य फेरीत लढणार

Spread the love

अमरहिंद चषक पुरुष-महिला निमंत्रित जोडजिल्हा खो खो स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई, २१ मार्च (क्री. प्र.), महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व मुंबई खो-खो संघटनेच्या सहकार्याने अमरहिंद मंडळाने पुरुष महिला निमंत्रित जोडजिल्हा (मुंबई व मुंबई उपनगर) खो खो स्पर्धा २२ मार्च २०२२ पर्यंत मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त कै. रमेश वरळीकर क्रीडानगरी, अमरहिंद मंडळ, अमर वाडी, गोखले रोड, दादर (प.) मुंबई येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेत पुरुषांमध्ये सरस्वती वि. सह्याद्रि व विद्यार्थी वि. महात्मा गांधी तर महिलांमध्ये सरस्वती वि. दत्तसेवा व शिवनेरी वि. महात्मा गांधी उपांत्य फेरीत लढणार. एकेकाळी संपूर्ण भारतात बलाढ्य असलेल्या श्री समर्थ व्या. मंदिर व ओम समर्थ भा. व्या. मंदिर या दोन्ही संघांना पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ राखून पराभूत व्हावे लागले याची सल मात्र तमाम प्रेक्षकांना चटका लावून गेली.

पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात सरस्वती स्पो. क्लबने यजमान अमरहिंद मंडळावर १६-१४ (८-८ व ८-६) असा चुरशीच्या सामन्यात २ गुणांनी विजय संपादन केला. मध्यंतराला बरोबरीत असलेला हा सामना शेवटपर्यंत रंगतदार झाला होता. सरस्वतीच्या श्रीकांत वल्लाकाठी (१:५०, १:४० मि. संरक्षण व ३ गडी), श्रेयस राऊळ (१:५०, १:४० मि. संरक्षण व २ गडी), करण गरोळे (१:००, १:५० मि. संरक्षण व ३ गडी) व सुशील दहींबेकर (१:३०, २:०० मि. संरक्षण व १ गडी) यांनी अष्टपैलू खेळ करत विजयश्री खेचून आणली तर पराभूत यजमान अमरहिंदच्या प्रसाद राडीये (१: १०, २:४० मि. संरक्षण व १ गडी), निरव पाटील (२:२० मि. संरक्षण), किरण कर्णवार (१: ००, १:४० मि. संरक्षण व ३ गडी) व सिद्धेश चोरगे (३ गडी) यांनी जोरदार लढत दिली मात्र ते आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.

पुरुषांच्या दुसर्‍या उपांत्यपूर्व सामन्यात उपनगरच्या श्री सह्याद्रि संघाने ओम समर्थ भा. व्या. मंदिरवर ५:४० मि. राखून १४-१३ असा एक गाणाने दणदणीत विजय साकार केला. सह्याद्रिच्या कौशिक जोईल (१:५०, १:३० मि. संरक्षण व ३ गडी), अक्षय भांगारे (१:३०, २:०० मि. संरक्षण व १ गडी) व अनिकेत चेंदवणकर (१:००, १:१० मि. संरक्षण व ३ गडी) यांनी तर ओम समर्थच्या शुभम शिगवण (२:१०, १:४० मि. संरक्षण व २ गडी) व निहार पाष्टे (१:१०, १:१० मि. संरक्षण) यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईच्या सरस्वती स्पो. क्लबने उपनगरच्या ओम युवा स्पो. क्लबचा १८-६ असा १२ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात सरस्वतीच्या खुशबू सुतार (३:५० मि. संरक्षण व ६ बळी), सेजल यादव (२:२० मि. संरक्षण व ३ बळी), संस्कृती भुजबळ (२:३० मि. संरक्षण) यांनी विजयात मोठा वाटा उचलला तर ओम युवाच्या आकांक्षा त्रिभुवन व आर्या तळेकर यांनी चांगला खेळ केला.

इतर सामन्यात पुरुषांमध्ये उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. क्लबने मुंबईच्या श्री समर्थ व्या. मंदिरचा ५:१० मि. राखून १४-१२ असा पराभव केला. तर महिलांमध्ये उपनगरच्या दत्तसेवा क्रीडा मंडळाने वैभव स्पो. क्लबचा १८-०६ असा पराभव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!