क्रीडा व मनोरंजन

महाराष्ट्र महिला, पुरुष संघांची विजयी सलामी! यजमान गुजरातला नमवले.

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी: बाळ तोरसकर

अहमदाबाद, (क्री. प्र. ) : ३६ व्या नॅशनल गेम्स, संस्कारधाम अहमदाबाद, गुजरात येथे सुरू झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला खोखो संघांकडून पदकांची अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या महिला व पुरुष संघांनी अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी दिली. पुरुष व महिला गटात महाराष्ट्राने यजमान गुजरात संघाला पराभूत केले.

महिला गटात महाराष्ट्र संघाने यजमान गुजरात संघाला एक डाव आणि सहा गुणांनी पराभूत करुन दणदणीत विजयी सलामी दिली. मध्यंतराला महाराष्ट्र संघ २२-१६ असा आघाडीवर होता.

महाराष्ट्र संघातील सर्वच खेळाडूंनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करुन सामना गाजवला. आक्रमक डावपेच हे महाराष्ट्र संघाच्या पथ्यावर पडले. प्रियांका भोपी, सोमेश सुतार, रेश्मा राठोड, प्रियांका इंगळे, शीतल भोरे, ऋतुजा खरे, दीपाली राठोड, संपदा मोरे या खेळाडूंनी आक्रमण व संरक्षणात अफलातून खेळ करत गुजरात संघावर कायम दबाव ठेवला. या दबावापुढे गुजरातचा संघ सपशेल पराभूत झाला.

प्रियांका भोपी हिने ३:५० मिनीटे पळतीचा खेळ करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अपेक्षा सुतारने २:५० मिनीटे पळतीचा सुरेख खेळ केला. प्रियांका इंगळे हिची अष्टपैलू कामगिरी मोलाची ठरली. प्रियांकाने २:४० मिनीटे पळतीचा खेळ केला आणि आक्रमणात सहा गुण देखील मिळवले. शीतल भोरे व ऋतुजा खरे या दोघींनी प्रत्येकी चार गुण संपादन करुन संघाच्या मोठ्या विजयात मोलाचा वाटा उचलला. संपदा मोरे हिने २:१० मिनीटे पळतीचा खेळ केला.

गुजरात संघाकडून निकीता सोळंकी हिने १:२० मिनीटे पळतीचा खेळ केला. शिवाय तिने दोन गुण मिळवले. प्रिया चौधरी हिने १:१० मिनीटे पळतीचा खेळ केला. निकीता व प्रिया यांचा अपवाद वगळता गुजरात संघ महाराष्ट्र संघाच्या आक्रमक खेळासमोर टिकाव धरू शकला नाही.

आता महाराष्ट्र महिला संघाचा पुढील सामना शनिवारी सकाळी साडेदहा वाजता ओडीशी संघाविरुद्ध होणार आहे.

पुरुष गटात महाराष्ट्र संघास गुजरात संघाने चांगलेच झुंजवले. महाराष्ट्र संघाने गुजरात संघाची कडवी झुंज मोडून काढत दोन गुण व सहा मिनीटे राखून सलामीची लढत जिंकत आगेकूच केली. आता शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता महाराष्ट्र संघाचा दुसरा सामना दिल्ली संघाविरुद्ध होणार आहे.

महाराष्ट्र संघाकडून अक्षय भांगरे याने अष्टपैलू खेळ केला. त्याने १:४० मिनीटे पळतीचा खेळ केला. तसेच दोन गुण मिळवले. ह्रषिकेश मुर्चावडे याने १:५० मिनीटे पळतीचा खेळ केला. लक्ष्मण गावस याने १:५० मिनीटे संरक्षण व दोन गुण टिपत अष्टपैलू कामगिरी नोंदवली. अविनाश देसाई याने ८ गुण टिपत शानदार कामगिरी बजावली. सुयश गारगाटे याने २:२० मिनीटे संरक्षण केले व आठ गुण मिळवून देत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रतिक वाईकरने १:२० मिनीटे पळतीचा खेळ केला व सहा गुण मिळवत सामना गाजवला. रामजी कश्यप याने १:२० मिनीटे संरक्षण केले.गुजरात संघाकडून विजय वेगास व रितेश बरडे यांनी अष्टपैलू कामगिरी केली. महाराष्ट्राने गुजरातची कडवी झुंज मोडून काढत विजयी सलामी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!