महाराष्ट्र

मराठी पत्रकार परिषद लोणावळा शाखेकडून सातारा पूरग्रस्तांना मदत

Spread the love

लोणावळा : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जोर जांभळी भागात पुराने प्रचंड हानी झाली. या भागातील गोळेगाव गोळेवाडी गावाला मदत करण्यासाठी मराठी पत्रकार परिषद धावली. परिषदेच्या पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या लोणावळा शाखेच्या वतीने सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वाई तालुका मराठी पत्रकार संघाच्या सहकार्याने या भागातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.

वाई तालुक्यातील जोर जांभळी खोऱ्यात अतिवृष्टीमुळे दाणादाण उडाली. गरीब माणसांचे हाल झाले. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस .एम. देशमुख व किरण नाईक यांनी नेहमीच पत्रकारांसोबत सामाजिक बांधिलकी म्हणून गरजूना मदत करण्याचे व्रत हाती घेतले आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या लोणावळा शाखेने पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता. सातारा जिल्ह्यातील पूर परिस्थितीची माहिती देशमुख यांनी सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्याकडून घेतली होती. पाटणे यांनीही वाई चे तहसीलदार रणजित भोसले यांच्याकडून खऱ्या अर्थाने जिथे मदत पोहचली नाही ती यादी मागवली. त्यानुसार वाई तालुक्यातील गोळेवाडी व गोळेगाव येथे जाऊन पूरग्रस्तांना मदत करण्याची सूचना एस. एम. देशमुख यांनी लोणावळा पत्रकार संघाला दिली.

लोणावळा पत्रकार संघाच्या महिला संघटक श्रावणी कामत व त्याच्या सहकारी यांनी ब्लॅंकेट, सॅनिटरी नॅपकिन, अन्न धान्य व वस्तूंचे किट गोळेवाडी येथे नेले. यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, उप अभियंता श्रीपाद जाधव, वाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वास पवार, उपाध्यक्ष धंनजय घोडके, सचिव पी. एस. भिलारे, तलाठी विना. पुंडे, विठ्ठल हेंद्रे, साई सावंत, नंदिका कामत, मंगेश गमरे उपस्थित होते.

गोळेगाव व गोळेवाडीच्या पूरग्रस्तांना मराठी पत्रकार परिषदेने पाठवलेली मदत पाहून पूरग्रस्त भारावून गेले. माय माऊली गहिवरून गेले. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी दाखवलेली माणुसकी गोळेगावकरांसाठी दिलासा देणारी होती. गोळेगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यांच्या उपस्थित ऊबदार ब्लाँकेट वाटप होत असताना माय माउलीच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.

यावेळी बोलताना हरीष पाटणे म्हणाले, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख व किरण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जोर भागात मदतीचे वाटत होत आहे. एकमेकांच्या जिल्ह्यात एकमेकांना मदत करण्यासाठी धावून जाण्याची पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या लोणावळा शाखेने दाखवलेली माणुसकी अभिनंदनिय आहे. पूरग्रस्तांसाठी परिषदेने दाखवलेली माणुसकी कायम स्मरणात ठेऊ. मराठी पत्रकार परिषद प्रमाणे महाराष्ट्रातील अन्य सामाजिक संघटनांनी मदत करावी असे आवाहन हरीष पाटणे यांनी केले.

यावेळी गोळेगावचे सुनील गोळे, जितेंद्र गोळे, वाडकर यांनी धन्यवाद दिले. यावेळी गोळेगाव व गोळेवाडी ग्रामस्थनी रस्ते, पूल याची झालेली दुर्दशा दाखवली.दत्ता मर्ढेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!