महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीपर्यंत लांबणीवर.

निवडणूक आयोगाचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र.

Spread the love

मुंबईः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीपर्यंत लांबणीवर पडणार असून, निवडणूक आयोगानं तसा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला आहे. त्यामुळे राज्यातील मुदत संपलेल्या 22 महापालिकांसह , जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ओबीसी आरक्षणाची सुनावणी 25 एप्रिलला होणार होती, पण ती न झाल्याने राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जून आणि जुलैमध्ये घेण्याची तयारी केली होती. आता तीच सुनावणी 4 मे रोजी होणार असून, त्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. पावसाळ्यात निवडणुका घेण्यात अडचणी असल्याचे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीपर्यंत पुढे ढकला, असं राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे.

आतापर्यंत कोल्हापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, भिवंडी-निजामपूर, मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, वसई-विरार, पनवेल, मालेगाव, नागपूर, सोलापूर, अकोला, परभणी, लातूर, अमरावती, चंद्रपूर, नांदेड आणि औरंगाबाद यातील काही महापालिकांची मुदत संपलेली आहे, तर काहीची मुदत जूनपर्यंत संपणार आहे. न्यायालयाची सुनावणी 7 एप्रिलला झाली असती आणि निवडणुका घेण्याचे आदेश दिले असते तर जूनपर्यंत या निवडणुका घेणे शक्य होते. परंतु आता सुनावणीच मे मध्ये होत असल्याने त्यानंतर ऐन पावसाळ्यात या निवडणुका घेणे शक्य होणार नसल्याचंही आयोगानं स्पष्ट केलं आहे.

 

विशेष म्हणजे मनपा आणि जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेणे शक्य नसल्याचंही राज्य निवडणूक आयोगानं अधोरेखित केलंय. त्या निवडणुका दोन-तीन टप्प्यांत घ्याव्या लागणार असल्याचंही निवडणूक आयोगानं प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलं आहे. त्यामुळे 4 मे रोजी जरी सुनावणी झाली तरी जून-जुलैमध्ये किंवा पावसाळ्यापूर्वी या निवडणुका होण्याची शक्यता नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!