आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जून महिना म्हणजे आळंदी देहू ते पंढरपूर अशी चालत यात्रा करणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या श्रध्दा अभिव्यक्तीचा महिना. पंढरपुरला जाणाऱ्या या वारीला जवळपास सातशे वर्षांची परंपरा

निर्मल वारीच्या यशस्वीतेसाठी सरकार सोबतच 'सेवा सहयोग' संस्था,राष्ट्रीय सेवा योजना,  संतोष दाभाडे,  संदीप जाधव, नरेंद्र वैशंपायन,  राजेश पांडे,  सुदर्शन चौधरी, माऊली कुडले, वसंत अमराळे आदी मंडळी विशेष परिश्रम घेत आहेत.

Spread the love

निर्मलवारीअभियान”  जून महिना म्हणजे आळंदी देहू ते पंढरपूर अशी चालत यात्रा करणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या श्रध्दा अभिव्यक्तीचा महिना. पंढरपुरला जाणाऱ्या या वारीला जवळपास सातशे वर्षांची परंपरा” आहे याची आपल्याला कल्पना असेलच.

आवाज न्यूज:  गेली शेकडो वर्षे जसजशी या वारीत माणसांची गर्दी वाढू लागली तसतसे स्वच्छतेचा मुद्दा गंभीर होत गेला ही एक दुर्लक्षित बाजू होती. पाचशे हजार उंबरठा असलेल्या गावात पालखी सोबत चालणाऱ्या लाखो लोकांच्या शौचविधीचा गंभीर प्रश्न त्या त्या वेळच्या शासन,सामाजिक स्तरावर न हाताळला गेल्याने गावात पालखी येऊन गेल्यानंतर महिनाभर दुर्गंधी याशिवाय शाळा,कॉलेज,बाजारपेठ आदी दैनंदिन कामकाज बंद व गावात रोगराई पसरल्याचे चित्र असे. नेहमीप्रमाणे हिंदू धर्मावर खार खाऊन असलेल्या काही विघ्नसंतोषी मंडळींनी तर वारी वर बंदी घालावी यासाठी कायदेशीर प्रयत्न सुरू केले.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या स्वच्छ भारत संकल्पात आपण कुठल्या प्रकारे सहभाग देऊ शकतो याचा खल राष्ट्रीय विचारसरणीच्या काही मंडळींमध्ये सुरू झाला. यातूनच मग आपला धर्म, आपली संस्कृती, आपली परंपरा व आपली ओळख असलेल्या या पंढरपूर वारीला शक्य तेवढं स्वच्छ करण्याचा विडा  प्रदीप रावत, शिवाजी महाराज मोरे, नरेंद्र वैश्यपायन, संदीप जाधव, संतोष दाभाडे आदी मंडळींनी उचलला. या सामाजिक कार्यासाठी काही व्यक्तींनी स्वतःच्या खिशातून वीस लाख रुपये निधी म्हणून दिले. (त्या व्यक्तींच्या विनंतीमुळे नावांचा उल्लेख केला नाही ) अर्थात लाखो लोक एकत्र येणाऱ्या या वारीसाठी काही लाख रुपये गोळा झाले म्हणजे सर्व समस्या सुटली असे निश्चित होणार नव्हते.

वारी बद्दल माहिती असलेल्या प्रत्येकाला कल्पना असेल की पालखी सोबत चालणारे हजारो वारकरी हौस म्हणून रस्त्यावर शौचाला बसत नाहीत. नजर जाईल तिकडे माणसेच माणसे असलेल्या या वारीत उघड्यावर शौच करणे हा त्यांचा नाईलाज होता. मग उपाय म्हणून तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही प्रमुख पालखी मार्गावर संडास करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘सेवा सहयोग’ या संस्थेच्या माध्यमातून ‘निर्मल वारी’ या बॅनरखाली पोर्टेबल टॉयलेट उपलब्ध करून द्यावेत अशी कल्पना पुढे आली.

२०१५ साली लोणी आणि यवत या गावांत सुरू झालेल्या या प्रकल्पाचा प्राथमिक टप्पा म्हणजे जमा झालेली मानवी विष्ठा सदर मुक्कामाच्या ठिकाणीच रिकामी करण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांचे प्रबोधन सुरू करणे हा होता. सदर मानवी विष्ठा मातीमध्ये व्यवस्थित जिरवल्यावर तेच सोनखत म्हणून शेतीसाठी वापरता येणार होते व सोबतच गाव देखील स्वच्छ राहणार होते हे गावकऱ्यांच्या लक्षात आणून दिले गेले व त्यांनी देखील मोठ्या आनंदाने यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी राजीव व रणजित खेर यांच्या टीमने जी मदत केली ती अफलातून म्हणावी अशी होती.

या दोन गावांत हा प्रयोग यशस्वी झाल्यावर पंढरपूरचे तत्कालीन सीईओ श्री तुकाराम मुंढे यांनी ताबडतोब ‘निर्मल वारी’ या संकल्पनेच्या सदस्यांना बोलावून चर्चा केली व पंढरपूर येथे सदर प्रकल्प राबवण्यासाठी शक्य ती सर्व मदत शीघ्रतेने पुरवली व त्यावर्षी पंढरपूर येथे देखील हा प्रयोग राबवला गेला. फक्त ३ गावांत सुरू झालेला हा महत्वाचा प्रकल्प पुढच्याच वर्षी ३० गावांमध्ये सुरू करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकार तर्फे तात्काळ निधी उपलब्ध करून दिला.

सुरवातीच्या वर्षी ‘निर्मल वारी’ हा प्रयोग राबवताना ज्या त्रुटी लक्षात आल्या त्या नोंदवून घेत त्यावर काय काय उपाय करावेत याचा एक पक्का आराखडा उभा राहू लागला. उदाहरणार्थ टॉयलेट मध्ये जमा होणारी मानवी विष्ठा आधीच खड्डा करून ठेवलेल्या शोष खड्ड्यात रिकामी करून तेच टॉयलेट पुन्हा स्वच्छ करून पुढच्या मुक्कामी पोहोच करत करत शेवटपर्यंत जाणे हा पैसे वाचवणारा उत्तम पर्याय आहे हे लक्षात आले. तसेच कुठेतरी एकाच ठिकाणी मोठा लाईट बसवल्याने दरवाजा लावल्यावर टॉयलेट मध्ये अंधार होतो किंवा टॉयलेट मध्ये पाणी नसेल तर माणसं ते टॉयलेट वापरण्यास नकार देतात अशा एकेक गोष्टी लक्षात येऊ लागल्या. मग याची नोंद घेत पुढील वर्षी प्रत्येक टॉयलेट मध्ये वीज व्यवस्था, पुरेसे पाणी पुरवले गेले. एवढेच काय पण या प्रयोगात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी ग्रामीण भागातून आलेल्या वारकऱ्यांना संडासात कसे बसायचे याचे देखील वेळप्रसंगी प्रबोधन केले आहे.

२०१५ साली फक्त ३ गावं,अडीचशे पोर्टेबल संडास आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व खाजगी १५०० स्वयंसेवक इथपासून सुरू झालेला हा प्रवास त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे २०१६ साली रोटेशन पध्दतीने मोजल्यावर २१ हजार पोर्टेबल संडास, ९ हजार स्वयंसेवक (यात ४०० विद्यार्थी) आणि ३० गावं इथपर्यंत पोहचला. तर २०१९ साली रोटेशन पध्दतीने मोजल्यावर २८ हजार पोर्टेबल संडास, साडे बारा हजार स्वयंसेवक (यात ४८५० विद्यार्थी) इथपर्यंत पोहचला आहे. यासाठी जवळपास सहा महिने आधी नियोजन केले जाते, प्रत्यक्ष वारीत रोजच्या रोज कामाचा आढावा घेतला जातो.

हाच यशस्वी प्रयोग आता महाराष्ट्रात धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कारणामुळे ज्या ज्या ठिकाणी सोशल गॅदरिंग होते त्या प्रत्येक ठिकाणी राबवला जात आहे हे निर्मल वारी योजनेचे महत्वाचे फलित आहे.

निर्मल वारीच्या यशस्वीतेसाठी सरकार सोबतच ‘सेवा सहयोग’ संस्था,राष्ट्रीय सेवा योजना,  संतोष दाभाडे,  संदीप जाधव, नरेंद्र वैशंपायन,  राजेश पांडे,  सुदर्शन चौधरी, माऊली कुडले, वसंत अमराळे आदी मंडळी राबत असतात. याशिवाय हजारो स्वयंसेवक या कार्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करून रात्र रात्रभर पावसात उभे असतात.

हे सगळे लोक करत असलेल्या कामाची तुम्हाला व्याप्ती लक्षात यावी म्हणून सांगतो, गेल्या चार वर्षात या अभियाना अंतर्गत चार कोटी लिटर मानवी विष्टेची विल्हेवाट योग्य ठिकाणी लावण्यात आली आहे. कल्पना करा हि एवढी घाण आपल्या रस्त्यांवर पसरली असती तर किती समस्या उभ्या राहिल्या असत्या?

हा आपल्या देशाचा, आपल्या समाजाचा, आपल्या धर्माचा प्रश्न नाही काय ? आपल्याला आपल्या परंपरांकडे फक्त भाबड्या व उदासीन दृष्टिकोनातुन बघून चालणार आहे का? आपल्या समस्या सोडवण्यासाठी कुणी परग्रहावरील लोक येणार आहेत काय? आपल्या धर्म व संस्कृतीला पाण्यात पाहणारे लोक वगळता ‘अमुक झाले पाहिजे, तमुकला काय कळते’ आदी उंटावरून शेळ्या हाकणारे व सोशल मीडियावरील ट्रोलिंग म्हणजेच धर्म व समाजकार्य समजणारे हायपर ऍक्टिव्ह तथाकथित हिंदुत्ववादी देखील प्रत्यक्षात काहीही न करता फक्त निराशा, नकारात्मकता व अस्वस्थता पसरवू शकतात हे लक्षात ठेवून त्यांच्यापासून अंतर ठेवून राहिले पाहिजे.

बाकी, एवढं सगळं करूनही अद्याप संपूर्ण वारी स्वच्छ झाली आहे काय ? अद्याप डोळ्यांसमोर असलेले लक्ष्य प्राप्त झाले आहे काय ? तर नाही. निश्चितच नाही. पण एक दिवस नक्कीच १००% पंढरपूर वारी निर्मल होणार याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. ते प्रत्यक्षात येण्यासाठी जिथं योग्य तिथं आपण लेखन व इतर माध्यमं वापरुच पण कधीकधी आपल्याच समाज व धर्मातील समस्या आपल्यालाच प्रत्यक्षात हात घालून त्या रस्त्यावर देखील सोडवाव्या लागतील हे लक्षात ठेवले पाहिजे. हेच आपले कर्तव्य आहे आणि यातच आपल्या समाजाचे व राष्ट्राचे हित आहे. तुम्हाला शक्य झाल्यास ‘निर्मल वारी’  २०२२ अभियानामध्ये सामील होण्याची  विनंती,                           “निर्मलवारीअभियान” मार्फत करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!