ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने किल्ले पन्हाळा येथे संपन्न

Spread the love

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने किल्ले पन्हाळा येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

त्यावेळी बोलताना ते म्हणाले, आज देश पातळीवर कामगारांविषयी आखल्या जाणाऱ्या धोरणांमुळे कामगारांचे संरक्षण टिकणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे. देशाच्या कामगार कायद्यात सुधारणा करण्याच्या नावावर केल्या जाणाऱ्या बदलांमुळे कामगारांचे हक्क कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे कामगार बांधवांचे नुकसान होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवताना फार विचारपूर्वक काही तरतुदी केल्या होत्या. ज्यामुळे कामगार वर्गाला भरपूर सवलती होत्या. मात्र ही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सध्या केले जात आहे. त्यांचे हक्क मर्यादित केले जात आहे.

मागच्या काळात शेतकऱ्यांसाठी चुकीची धोरणे स्वीकारत शेतकऱ्यांविरोधी तीन कृषी कायदे आणले गेले होते. शेतकऱ्यांनी या विरोधात मोठे आंदोलन उभारले आणि राज्यकर्त्यांना झुकवले. कामगारांच्या हितासाठीही देशव्यापी आंदोलन पुकारले पाहिजे. तेव्हाच कष्टकरी बांधवांचे हक्क आपल्याला अबाधित ठेवता येईल.

कंत्राटी कामगारांचे प्रमाण वाढत आहे. या कंत्राटी कामगारांना कोणताही न्याय दिला जात नाही. खाजगी कारखान्यांमध्ये कामगार बांधवांकडून कमी पगारात जास्त तास काम करून घेतले जात आहे. कामगार चळवळीने याकडे लक्ष द्यायला हवे.

साखर कारखाना चळवळीशी माझे ४० वर्षांपेक्षा अधिक काळापासून संबंध आहेत. मी अनेक जुन्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. या चळवळीला मोठी परंपरा आहे. आदरणीय पवार साहेबांनी या चळवळीची नेहमीच जपणूक केली. ही चळवळ टिकावी म्हणून अनेक धोरणे आणली आणि कष्टकरी बांधव समाधानी राहील याची खबरदारी घेतली. मात्र या चळवळीला धक्का लावण्याचे काम सध्या होत आहे. ही चळवळ स्वाभिमानाने उभी राहिली पाहिजे, चांगले नेते तयार झाले पाहिजे, त्या नेतृत्वाच्या माध्यमातून कामगारांच्या पदरात न्याय पडला पाहिजे.

विविध कारणांनी अनेक कर्मचाऱ्यांना आयुष्यात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. यावरही आपल्याला लक्ष दिले पाहिजे. संकटाच्या काळात कामगार बांधवाला मदत होईल अशी व्यवस्था निर्माण करायला हवी. यामुळे कष्टकरी वर्गाला मोठा दिलासा मिळेल.

देशात सर्वात जास्त औद्योगिकीकरण महाराष्ट्रात आहे. देशाची प्रगती करायची असेल तर महाराष्ट्रात आर्थिक गुंतवणूक वाढली पाहिजे. आपल्या राज्यात गुंतवणूक कशी वाढेल या गोष्टीकडे आपल्या राज्यकर्त्यांनी भर द्यायला हवा.

यावेळी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार के. पी पाटील, साखर कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष तात्यासाहेब काळे,शंकरराव भोसले, राऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!