ताज्या घडामोडी

श्री विठ्ठल मंडळ-ठाणे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा शिवशंकर, छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना विजेतेपद.

Spread the love

जयंत काळे, साधना यादव ठरले मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू.

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

ठाणे :- कल्याणच्या शिवशंकर मंडळाने पुरुषांत, तर नवी मुंबईच्या छत्रपती राजश्री शाहू महाराज संघाने महिलांत विजेतेपद मिळविले. ओम कबड्डी संघाचा जयंत काळे पुरुषांत, तर छत्रपती राजश्री शाहू संघाची साधना यादव महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. त्यांना आकर्षक चषक भेट देऊन गौरविण्यात आले. श्री विठ्ठल क्रीडा मंडळाच्यावतीने प्रथम श्रेणी स्थानिक पुरुष व महिला गट स्पर्धेचे ठाण्यातील लोकमान्य नगर येथे आयोजन करण्यात आले होते. पुरुषांच्या अंतिम सामन्यात शिवशंकर मंडळाने ओम कबड्डी संघाचा प्रतिकार ३०-२७ असा मोडून काढत विजेतेपदाचा चषक व रोख रु. अकरा हजार(₹११,०००/-) आपल्या नावे केले. उपविजेत्या ओम कबड्डी संघाला चषक व रोख रु. सात हजार(₹७,०००/-) वर समाधान मानावे लागले. जयंत काळे, रक्षित कुंदले यांनी आक्रमक सुरुवात करीत भराभर गुण घेत तर प्रो-कबड्डी स्टार गिरीश इरणाक यांनी भक्कम पकडी करीत ओम कबड्डी संघाला पहिल्या डावात १८-०८ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली होती. दुसऱ्या डावात मात्र तो खेळ व जोश दाखविण्या ते कमी पडले. त्याचा फायदा शिवशंकर संघाने घेतला. शिवशंकरच्या सुमित साळुंखेने तुफानी चढाया करीत गुण वसुल केले. त्याला सूरज बनसोडे यांनी उत्कृष्ट पकडी करीत मोलाची साथ दिली. या दोघांच्या नेत्रदीपक खेळाने शिवशंकरने पहिल्या डावातील १०गुणांची पिछाडी भरून काढत ३गुणांनी आपला विजय साकारला.

महिलांच्या अंतिम सामन्यात छत्रपती राजश्री शाहू महाराज संघाने संघर्ष क्रीडा मंडळाचा विरोध ४१-३७ असा मोडून काढत विजेतेपदाचा चषक व रोख रु.अकरा हजार (₹११,०००/-) आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या संघर्षला चषक व रोख रु. सात हजार(₹७,०००/-) वर समाधान मानावे लागले. सुरुवात जोशपूर्ण करीत छत्रपती राजश्री शाहूने पूर्वार्धात २१-१६ अशी आघाडी मिळविण्यात यश मिळविले. उत्तरार्धात हीच आघाडी टिकविण्यावर भर देत सावध खेळ केला आणि विजय आपल्या हातून निसटू दिला नाही. उत्तरार्धात संघर्ष मंडळाने  विजयासाठी कडवा संघर्ष केला. त्यामुळे या डावात उत्तम झटापटीचा खेळ पहावयास मिळाल्याने कबड्डी रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. पण शेवटी पहिल्या डावातील आघाडीमुळे छत्रपती राजश्री शाहू संघाने ४गुणांनी सामना जिंकला. हनुमान संघाचा साईराज साळवी पुरुषांत, तर छत्रपती राजश्री शाहू संघाची निशा सिंग महिलांत स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू ठरले. शिवशंकरचा सुमित साळुंखे पुरुषांत, तर संघर्षाची रिंकू पाटील महिलात स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचे आणि ओम कबड्डीचा शरद काळे पुरुषांत, तर ज्ञानशक्ती युवाची निधी रांजणे महिलात स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीचे खेळाडू ठरले. या सर्व सहाही खेळाडूंना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या अगोदर झालेल्या पुरुषांच्या उपांत्य सामन्यात शिवशंकरने उजाळा मंडळाचा (२६-२०) असा आणि ओम कबड्डी संघाने हनुमान मंडळाचा (४६-१८) असा पाडाव करीत अंतिम फेरी गाठली. महिलांत छत्रपती राजश्री शाहू महाराज संघाने ज्ञानशक्ती युवा संघाचा (३३-३१)असा आणि संघर्ष मंडळाने छत्रपती शिवाजी मंडळाचा (३९-३८) असा पाडाव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण स्थानिक नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत  जगदाळे साहेब,स्थानिक नगरसेविका-माजी सभापती महिला व बाल कल्याण ठाणे महानगरपालिका राधाबाई सुभाष  जाधवर मंडळाचे अध्यक्ष किरण जाधव ,युवा नेते प्रशांत जाधवर, मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील सचिव संतोष पाटील विश्वस्त विक्रम पाथरे कृष्णा मनवे आदींच्या उपस्थितीत पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!