महाराष्ट्रसामाजिक

मुंबई ते शिर्डीचा प्रवास फक्त ६० मिनिटात !

या’ मार्गांवरील बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डीपीआर तयार, कसा असणार मार्ग ? 

Spread the love

मुंबई ते शिर्डीचा प्रवास फक्त ६० मिनिटात ! ‘या’ मार्गांवरील बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डीपीआर तयार, कसा असणार मार्ग ? Travel from Mumbai to Shirdi in just 60 minutes! DPR ready for bullet train project on ‘these’ lines, how will the route be?

आवाज न्यूज : विशेष वार्ताहर, शिर्डी, १६ सप्टेंबर.

कोणत्याही विकसित राष्ट्रांच्या, प्रदेशाच्या किंवा शहराच्या विकासात तेथील दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावत असते. ज्या भागात दळणवळण व्यवस्था मजबूत असते त्या भागाचा विकास सुनिश्चित होतो. त्यामुळे विकसनशील भारताला वेगाने विकसित करण्यासाठी देशातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून भारतातील लोहमार्ग मजबूत केले जात आहेत. वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हायस्पीड ट्रेन देखील सुरू केल्या जात आहेत. याशिवाय देशात बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू झाले आहेत. भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार देशात एकूण सात महत्त्वाच्या मार्गावर बुलेट ट्रेन चालवल्या जाणार आहेत.यासाठी सात मार्ग रेल्वे मंत्रालयाने निश्चित केले आहेत. मुंबई ते अहमदाबाद, दिल्ली ते वाराणसी, दिल्ली ते अहमदाबाद, मुंबई ते नागपूर, मुंबई ते हैदराबाद, चेन्नई ते म्हैसूर आणि दिल्ली ते अमृतसर या सात मार्गांवर बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे. यापैकी मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.याशिवाय मुंबई ते हैदराबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला असून यावर सध्या वेगाने काम सुरू आहे. अशातच आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डीपीआर देखील रेल्वे मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे.

या प्रकल्पाच्या कामासाठी हालचाली वाढल्या आहेत. यामुळे आता रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाकडून या डीपीआरचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. यानंतर मग या प्रकल्पासाठी एक ॲक्शन प्लॅन तयार केला जाईल आणि त्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. हा बुलेट ट्रेन प्रकल्प समृद्धी महामार्गाला समांतर राहणार आहे.

समृद्धी महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून बांधला जात आहे. मार्गाचे आत्तापर्यंत ६०० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. हा एकूण ७०१ किलोमीटर लांबीचा मार्ग असून उर्वरित १०१ किलोमीटर लांबीचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. सध्यास्थितीला समृद्धी महामार्गाचा नागपूर ते भरवीर पर्यंतचा टप्पा बांधून तयार झाला असून या मार्गावर सर्वसामान्यांना वाहतूक करता येत आहे.

भरवीर पासून ते मुंबईपर्यंतचा टप्पा देखील लवकरच पूर्ण होणार आहे. दरम्यान मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प ७६६ किलोमीटर लांबीचा असेल. परंतु या बुलेट ट्रेनचा बहुतांशी भाग हा समृद्धी महामार्गाशी समांतर असल्याने या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी केवळ १२७० हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे.

 

या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीपैकी ७० टक्के जमीन आधीच उपलब्ध आहे. रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, जर या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने चांगला पाठिंबा दिला आणि प्रकल्पासाठी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासारखी कोणतीच समस्या उद्भवली नाही तर या प्रकल्पाचे काम २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच सुरू होऊ शकते.या प्रस्तावित मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा कमाल ताशी वेग ३५० किलोमीटर राहणार आहे. पण या ट्रेनचा ऑपरेशनल स्पीड हा २५० किलोमीटर प्रतितास एवढा असेल. त्यामुळे मुंबई ते शिर्डी हे अंतर फक्त एक तासात पूर्ण होणार आहे. सध्या वंदे भारत एक्सप्रेसने मुंबई ते शिर्डीचा प्रवास करण्यासाठी सहा तासांचा वेळ लागतो.

बुलेट ट्रेनमुळे हा वेळ एका तासावर येणार आहे म्हणजेच प्रवासाच्या वेळेत तब्बल पाच तासाची बचत होणार आहे. तसेच मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास केवळ तीन तास आणि तीस मिनिटात पूर्ण होणार असल्याचा दावा केला जात आहे. सध्या मुंबई ते नागपूर हा प्रवास ट्रेनने करण्यासाठी १४ ते १५ तासाचा वेळ लागतो.

अर्थातच या संपूर्ण प्रवासाच्या वेळेत १० ते ११ तासांपर्यंतची बचत होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १.४८ लाख कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. म्हणजेच एका किलोमीटरसाठी जवळपास २०० कोटी रुपयांपर्यंतचा खर्च होणार आहे. निश्चितच हा केंद्र शासनाचा एक महत्त्वाकांशी प्रकल्प असून या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन राजधान्या रेल्वे मार्गाने जवळ येणार आहेत.

मुंबई नागपूर बुलेट ट्रेनसाठीची स्थानके कोणती राहणार?

या बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत १५ स्थानके तयार केली जाणार आहे. यात मुंबई, ठाणे, शहापूर, घोटी, नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगाव, कारंजा लाड, पुलगाव, वर्धा, खापरी आणि अजनी या महत्त्वाच्या स्थानकांचा राहणार समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!