आपला जिल्हामावळ

कौठळी शाळेतील शिक्षक भारत ननवरे यांचा गणपती विसर्जन विशेष लेख..

गणपती बाप्पा मोरया..

Spread the love

कौठळी शाळेतील शिक्षक भारत ननवरे यांचा गणपती विसर्जन विशेष लेख..भारत ननवरे.Ganapati Immersion Special Article by Bharat Nanvare, Teacher of Kauthali School..Bharat Nanvare

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत २८ सप्टेंबर ‌.

आमच्या लहानपणी आमचा सर्वात आवडता सण म्हणजे गणेश चतुर्थी(गणरायाचे आगमन).गणपती येण्याअगोदर दहा दिवस अगोदरच आमची तयारी मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू व्हायची. सार्वजनिक गणपती ज्या ठिकाणी बसवायचा त्या ठिकाणाची स्वच्छता, साफसफाई करणे, मंडपची व्यवस्था, मंदिर असेल तर मंदिराची साफसफाई सुरू असायची त्या कामाचा कंटाळा देखील येत नव्हता उलट उत्साह वाढायचा.साफसफाई झाली की गणरायाचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यासाठी सकाळ पासून मुहुर्त असेल त्या वेळेपर्यंत ठिकाण सोडत नसायचो.आरती करूनच घरी जायचो.

दुसऱ्या दिवशी सकाळीच मंदिरात उपस्थित राहायचो.मंदिर झाडून काढणे, साफसफाई करणे, रांगोळी काढणे मग आरती करणे असा दिनक्रम असायचा. मनोरंजन म्हणून एक मशीन त्याला साउंड नव्हता तर कर्णा असायचा त्यावर ताश्याचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नाचत आला…..या गीताने सुरुवात.. तीच तीच गाणी रोज तरी कंटाळा येत नव्हता.खूप प्रसन्न वाटायचे.

गणपती उत्सव म्हटलं की खर्च आला.आम्ही पण मोठ्या माणसांबरोबर वर्गणी गोळा करण्यासाठी पावती पुस्तक घेऊन जायचो. शंभर रुपये मागितले तरी त्यावेळी काही भाविक म्हणायचे अरे मुलांनो कशाला खर्च करता,वाईट दिवस आहेत.आम्ही निराश व्हायचो मग पुन्हा ते बोलवून म्हणायचे दोनशे रुपये मांडा मग मात्र आमची टीम खूषच. परिस्थिती नाजूक होती पण वर्गणी देणार नाही असे एकही कुटुंब नव्हते.त्या वर्गणीतून रोज संध्याकाळी संगीत खुर्ची,प्रश्नमंजुषा, भाषिक खेळ घेऊन विजेत्या मुलांना लगेच वही, पेन बक्षीस दिले जात होते.जमाखर्च एकाकडे असायचा पण कधी वादविवाद होत नव्हता.बाहेर कोठे ही गेलो तरी आरती चुकवायची नाही हा जणू मनाला लागलेला नियम होता.तो नियम आज ही लक्षात आहे.गणपती विसर्जन उद्या आहे हे लक्षात आले की डोळे भरून यायचे.आज सारखा मिरवणुकी साठी डी.जे. नव्हता पण ट्रॅक्टर मध्ये मशीन व एक भोंगा जोडून गाणी लावायची व डान्स करायचा. आम्ही त्यात एवढं रमून जायचो की कंटाळा, आळस येत नव्हता.मिरवणुकीत गुलाल व चुरमुरे असायचे. मिरवणूक झाल्यानंतर मात्र गणपती विसर्जन त्यावेळी मात्र सर्वजण शांत होऊन आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सरसावायचो.शेवटचा मोदक खाताना डोळे ओले व्हायचे.गणपती बाप्पा मोरया -पुढच्या वर्षी लवकर या,एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार असे म्हणत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला जात असे.

सार्वजनिक गणपती बरोबर सर्व जण आपापल्या घरचे गणपती देखील विसर्जन मिरवणुकीत आणायचे.मिरवणुकीत गावातील सर्व लहान थोर उपस्थित राहायचे. आज अनेक आधुनिक साधने ,सुखसोयी आल्या पण ती गणपती उत्सवाची आतुरता कमी झाल्याचे दिसून येते.
शेवटी घरी जाताना मात्र पाय निघत नाहीत , दहा बारा दिवस सर्व प्रसंग आठवून चर्चा होत असायची.खरच ते दिवस अविस्मरणीय होते.
शेवटी एवढेच म्हणायचो…
*चाललास का रे इतक्यात,नको ना रे जाऊ,माझ्या वाटणीचे मोदक देईल मी तुला खाऊ, नऊ दिवस तर झाले,इतकी कसली रे तुला घाई!थोडे दिवस थांब ना नंतर हट्ट करणार नाही… तुझी आई बोलवते का,खर खर सांग ना मला..मी तुझ्या आईला सांगेन थोडे दिवस राहू ध्या ना त्याला..काही तरी बोल ना बाप्पा… दरवेळेस असाच शांत राहतोस..या वेळी नको ना रे जाऊ……..बाप्पा!!*

शब्दांकन…. भारत ननवरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!