क्रीडा व मनोरंजन

जिजाऊ चषक व्यावसायिक पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा-वाडा-पालघर – २०२२. आय.एस.पी.एल.ने “जिजाऊ चषक” पटकाविला

Spread the love

आयएसपीएलचा आकाश शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू.

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

वाडा-पालघर :- मुंबईच्या आय.एस.पी.एल.ने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था-महाराष्ट्र आयोजित व्यावसायिक पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. यंदाचे त्यांचे हे सलग दुसरे जेतेपद. आयएसपीएल.चा आकाश शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला मोटर-बाईक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. संस्थापक-अध्यक्ष निलेशजी सांबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाडा-पालघर येथील नाना थोरात क्रीडांगणावरील मॅटवर हे सामने खेळविण्यात आले. अंतिम सामन्यात आय.एस.पी.एल.ने सी.जी.एस.टी.-कस्टमचा प्रतिकार ४३-२६ असा सहज मोडून काढत “जिजाऊ चषकासह” रोख रु. एक लाख एकावन्न हजार(₹१,५१,०००/-) आपल्या खात्यात डिपॉझिट केले. उपविजेत्या कस्टमला चषक व रोख रु. एक लाख अकरा हजार(₹१,११,०००/-)वर समाधान मानावे लागले. आय.एस.पी.एल. ने आक्रमक सुरुवात करीत पहिला लोण कस्टमवर चढवित आघाडी घेतली. विश्रांतीला २४-१६अशी विजयी संघाकडे आघाडी होती. उत्तरार्धात आक्रमतेला संयमाची जोड देत आयएसपीएलने कास्टमवर आणखी एक लोण दिला. शेवटी आपल्या लौकिकेला साजेसा खेळ करीत हा आपला विजय सोपा केला. आकाश शिंदे, प्रतिक दाहिया यांच्या दमदार चढाया त्याला संकेत सावंत, बाबू यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळेच आय.एस.पी.एल. ने १७ गुणांच्या मोठ्या फरकाने विजय मिळविला.

उत्तरार्धात कस्टमच्या उमेश म्हात्रे, सुनील नवाले यांच्या चढाई, तर ऋतुराज कोरवी, विकास काळे यांच्या पकडीच्या खेळाने सामन्यात रंगत आणत लोणाची परतफेड केली.पण आयएसपीएलने उत्तरार्धात आणखी एक लोण देत सामना आपल्या हातून निसटणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. पूर्ण डावात विजयी संघाने ६, तर कास्टमने ४ बोनस गुणांची नोंद केली. वाडा परिसरात महिला कबड्डीचा प्रसार व्हावा म्हणून महिलांचा प्रेक्षणीय सामना खेळविण्यात आला. त्यात मुंबईच्या शिवशक्तीने उपनगरच्या संघर्षाचा संघर्ष ४२-३९ असा संपविला. या अगोदर झालेल्या पुरुषांच्या उपांत्य सामन्यात आयएसपीएलने संजय घोडावत उद्योग समूहाला ५३-२३ असे, तर कस्टमने आयकरला ४१-३७ असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना चषक व रोख रु. तेहत्तीस हजार तीनशे तेहत्तीस(₹३३,३३३/-) देऊन गौरविण्यात आले. आयएसपीएलच्याच प्रतिक दाहिया याला आणि कस्टमच्या विकास काळे याला अनुक्रमे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई आणि पकडीचे खेळाडू म्हणून निवडण्यात आले. प्रतिकला फ्रीज, तर विकासाला वॉशिंग मशीन देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार किसन कथोरिया, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार रवींद्र फाटक, आमदार दौलत दरोडा, हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील, पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा वैद्येही वाढणं, ज्ञानेश्वर सांबरे, पंडित पाटील आदी मान्यवरांनी स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी आपली उपस्थिती राखली होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!