ताज्या घडामोडी

मराठा जातीचा OBC मध्ये समावेश करुन मराठ्यांना OBC कोट्यातून आरक्षण मिळावे

Spread the love

मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब,

महाराष्ट्र राज्य

विषय : मराठा जातीचा OBC मध्ये समावेश करुन मराठ्यांना OBC कोट्यातून आरक्षण मिळणेबाबत.

महोदय,

‘मराठा’ ही जात नसून तो वर्ग आहे किंवा तो प्रदेशवाचक शब्द आहे. महाराष्ट्रात मराठा जातीचे म्हणून जे लोक आहेत, ते सर्व ‘कुणबी’ आहेत. आमच्या वाडवडिलांच्या अज्ञानामुळे, मराठा राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे आम्हा मराठ्यांना / कुणब्यांना ‘कुणबी’ दाखले काढता आले नाहीत. त्यामुळे आमचा ‘कुणबी’ म्हणून OBC मध्ये समावेश होऊ शकला नाही.

महोदय, मराठा आणि OBC मध्ये समाविष्ट असलेल्या इतर जातींची वैशिष्ट्ये आणि आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती सारखीच आहे. किंबहुना त्यांच्यापेक्षा मराठा जातीची स्थिती आज खूपच दयनिय झाली आहे. मराठा प्रवर्गातील कुणब्यांचा समावेश OBC मध्ये केला आहे. आमचे काही बांधव कुणबी म्हणून OBC मध्ये समाविष्ट आहेत. परंतु सर्व मराठ्यांचे कुणबीकरण / OBC करण झाले नसल्याने मराठा म्हणवला जाणारा ‘कुणबी’ OBC प्रवर्गात दाखल होऊ शकला नाही. हा मराठ्यांवर / कुणब्यांवर फार मोठा अन्याय झाला आहे. OBC मध्ये समावेश असलेल्या कुणबी जातीची आणि मराठा जातीची वैशिष्ट्ये सारखीच आहेत आणि OBC मध्ये समाविष्ट असलेल्या इतर जातींची आणि मराठ्यांची वैशिष्ट्ये सारखीच असून या निकषावर मराठा जातीचा समावेश तातडीने OBC मध्ये करुन मराठ्यांना म्हणजेच कुणब्यांना OBC आरक्षण लागू करावे. मराठा हा कुणबी किंवा OBC असल्याने त्यांना OBC मध्ये आरक्षण • देणे नैसर्गिक न्यायाला धरुन होईल. तसेच हे आरक्षण कायदेशीर ठरेल.

भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४० नुसार OBC समाजाला आज आरक्षणाचा लाभ मिळत असून मराठा समाजाचा समावेश OBC मध्ये केल्यास मराठा आरक्षण घटनाबाह्य होणार नाही. मराठा जातीला OBC मध्येच आरक्षण द्यावे. OBC मध्येच मराठा जातीला ठेवावे. मराठ्यांना वेगळे आरक्षण दिले तर ते टिकण्याची खात्री वाटत नाही. OBC प्रवर्गाची सर्व वैशिष्ट्ये मराठा समाजाला लागू पडत नसल्याने सरकारने तात्काळ मराठा जातीचा OBC प्रवर्गात समावेश करावा. मराठ्यांना ‘कुणबी-मराठा’ किंवा ‘मराठा-कुणबी’ किंवा नुसते ‘कुणबी’ दाखले देण्याचे आदेश सरकारने तात्काळ काढावेत.

मराठा समाजाने आत्तापर्यंत SC, ST, NT,OBC इ. कोणत्याही आरक्षणाला विरोधाला विरोध
केलेला नाही. म्हणून मराठ्यांच्या आरक्षणाला/ त्यांच्या OBC मध्ये समावेश करण्याच्या मागणीला विरोध करण्याचे सामाजिक पाप कोणी करु नये. तसेच जर मराठ्यांना OBC मध्ये समावेश करण्यास कोणी विरोध केला तर त्या विरोधाला सरकारने जुमानू नये. त्यांचा विरोध मोडून काढून मराठा समाजाला OBC प्रवर्गात ‘कुणबी’ म्हणून समाविष्ट करावे, ही विनंती.

स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षात मराठ्यांना कसलेही आरक्षण, सोयी-सवलती मिळालेल्या नाहीत. ८० टक्केपेक्षा अधिक मराठा बांधव गरीबीचे जीवन जगत आहेत. ८० टक्केपेक्षा अधिक शेतकरी अल्पभूधारक व सीमांत शेतकरी असून हे सर्व कोरडवाहू शेतकरी आहेत. रोज शेकडो मराठा कुटुंबे जमिनी विकून परागंदा होत आहेत. आत्महत्या केलेल्या एकूण शेतकऱ्यांत मराठा जातीच्या शेतकऱ्यांचे प्रमाण ९५% पेक्षा जास्त आहे. रोज मराठा शेतकरी आत्महत्या करत आहे. मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण परवडत नाही. त्यांच्यात गळतीचे प्रमाण वाढत आहे. मराठा जातीत बेकारी प्रचंड आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या मराठ्यांचे प्रमाण प्रचंड घटले आहे. बहुसंख्य मराठ्यांना जगणे मुश्किल झाले आहे. गरीबी, कर्जबाजारीपणा, महागाई, बेरोजगारी, व्यसनाधिनता या समस्यांमुळे मराठा समाज मेटाकुटीस आला असून या समाजाला वर काढायचे असेल तर तात्काळ मराठ्यांना OBCआरक्षण लागू करावे आणि OBC ना मिळणाऱ्या सर्व सवलती मराठ्यांना द्याव्यात, अशी विनंती आहे. शिवपूर्वकाळापासून आजतागायत मराठा समाज राष्ट्रासाठी तळहातावर शीर घेऊन लढला आहे. महाराष्ट्र आणि देश घडवण्यात मराठ्यांचा वाटा लक्षणीय आहे. अशा त्यागी, धाडसी, शूर, बुध्दीमान मराठा जातीची अवस्था आज दयनिय झाली असून मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण दिले नाही तर ते एक फार मोठे सामाजिक पाप ठरेल आणि कदाचित क्रांतीला निमंत्रण दिल्यासारखेच होईल. हे टाळण्यासाठी मराठा जातीला तात्काळ आरक्षण मिळावे यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी विनंती केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!