आरोग्य व शिक्षण

वेळेत वीजपंप दुरुस्त न केल्याने स्टेशन परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत

Spread the love

तळेगाव : तळेगाव दाभाडे शहरात स्टेशन विभागातील नागरिक दोन दिवसांपासून होत असलेल्या अनियमित व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. इंद्रायणी पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील दोन्ही पंप नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. येथील पंपांची दुरुस्ती वेळेत न झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या ठिकाणी 120 एचपी चे दोन वीज पंप आहेत. एक पंप नांदूरूस्त झाल्यावर दुसऱ्या पंपाचा वापर केला जातो. मात्र या जलशुद्धीकरण केंद्रातील दोन्ही पंप नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. 17 डिसेंबर रोजी एक पंप खराब झाल्याने दुसऱ्या पंपाने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र 22 डिसेंबर रोजी दुसरा पंपही खराब झाला त्यामुळे पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.

या 120 एचपी च्या पंपाचा वापर जलशुद्धीकरण केंद्रात आलेले पाणी उंच टाकी चढविण्यासाठी होतो व तेथून स्टेशन भागात पाणीपुरवठा केला जातो. परंतु दोन्ही पंप नादुरुस्त झाल्याने 10 एचपी 15 एचपी च्या पंपाद्वारे पाणी सोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे टाकी लवकर भरतच नाही. पर्यायाने पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. तर काही भागात पाणीपुरवठा बंद आहे.

दोन्ही पंप बंद झाल्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. असे प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिक मेटाकुटीस आले आहे. पाणीपुरवठा सारख्या अत्यावश्यक विभागात असा हलगर्जीपणा का ?असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

पाणीपुरवठा सभापती सुशील सैंदाणे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ही प्रशासकीय बाब आहे.कामगारांनी संबंधित अधिकाऱ्यांना पंप नादुरुस्त झाल्याचे कळविले. परंतु अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला वेळेत सूचना दिल्या नाहीत. प्रशासनाने पाणीपुरवठ्या बाबत अधिक जागरूकतेने काम करणे गरजेचे असून या विभागासाठी स्वतंत्र इंजिनियर असण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!