ताज्या घडामोडी

आजचे बालवैज्ञानिकच भारताचे भविष्यातील थोर शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर घाग यांचे प्रतिपादन

Spread the love

अभिनव विद्यालयामध्ये लायन्स क्लब तर्फे जलशुद्धीकरण यंत्राचे उद्घाटन

पालघर जिल्हा प्रतिनिधी ता.९

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे विज्ञान प्रदर्शन हे एक सुंदर व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे काम विज्ञान प्रदर्शनातून होते. अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनातूनच भविष्यात थोर शास्त्रज्ञ तयार होऊन ते राज्य व देशपातळीवर पालघर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील असे प्रतिपादन पास्ट मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन चंद्रशेखर घाग यांनी केले.

पालघर जिल्ह्यातील मेघराज शिक्षण संस्था संचालित अभिनव विद्यालय विराथन बुद्रुक येथे शालेय विज्ञान, चित्रकला आणि रांगोळी प्रदर्शन तसेच लायन्स क्लब ऑफ सफाळे आणि मालाड मार्वे यांच्यातर्फे बसविण्यात आलेल्या जलशुद्धीकरण यंत्राचा उद्घाटन समारंभ गुरुवारी (ता. ८ ) अभिनव विद्यालय विराथन येथे मोठ्या उत्साहाने पार पडला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी घाग यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी मांडलेले विविध प्रयोग मनाला विचार करणारे असून त्यांनी साकारलेल्या रांगोळ्या आणि रेखाटलेली चित्रे ही अद्वितीय आहेत. अशा प्रकारच्या प्रदर्शनातूनच विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने व्यक्त होता येते. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून लायन्स क्लब ऑफ सफाळे आणि मालाड मार्वे यांच्या मार्फत विद्यालयाला बसविण्यात आलेल्या जलशुद्धीकरण यंत्राचा योग्य वापर करावा असे आवाहन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेघराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती दामोदर पाटील होते. पाटील यांनी तळागाळातील विद्यार्थ्यांना विद्यादानाचे पवित्र काम ही संस्था करत असून संस्थेच्या दोन्ही विद्यालयात शिक्षण आज शेकडो विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी उच्चपदस्थ कार्यरत आहेत. तसेच ज्या मेघराज मंदिराच्या नावाने संस्थेची स्थापना केली आहे त्या मेघराज मंदिराला पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाला असला तरी शासनाकडून अपेक्षित निधी प्राप्त होत नसल्याने हे तीर्थक्षेत्र अजूनही उपेक्षितच राहिले आहे असे सांगितले.

या विज्ञान प्रदर्शनामध्ये लहान गटामध्ये ९ तर मोठ्या गटामध्ये १७ असे एकूण २६ प्रयोग मांडले होते. तसेच एका दालनामध्ये चित्रकला आणि हस्तकलेच्या सुरेख वस्तू व सुंदर रेखाटलेली चित्रे लावण्यात आली होती. तर एका दालनामध्ये विद्यार्थ्याने मनोवेधक अशा रांगोळ्या साकारल्या होत्या.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळावा म्हणून लायन्स क्लब ऑफ सफाळे व लायन्स क्लब ऑफ मालाड मार्वे यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे २ लाख ८० हजार रुपये खर्चून हा प्रोजेक्ट उभारला आहे.

यावेळी विशेष अतिथी म्हणून मेघराज शिक्षण संस्थेचे कार्यवाह चंदुलाल घरत, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर मनोज बाबुर, तस्नीम हरियानवाला, विकास पाटोळे, रवी निगम तसेच सफाळे लायन्स क्लबचे अध्यक्ष विकास वर्तक, मालाड मार्वे क्लबचे अध्यक्ष अशोक सावलानी,अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नेहा किणी, अनार्डे फाउंडेशनचे राजेश नायक यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी व्यासपीठावर मेघराज शिक्षण संस्थेचे सदस्य माधवराव पाटील, चंद्रकांत किणी, लायन्स क्लब सफाळेचे सचिव मनोज म्हात्रे, खजिनदार राजय चौधरी, उपाध्यक्ष दिनकर वर्तक, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी अध्यक्ष नितीन वर्तक, भालचंद्र चौधरी तसेच इतर आजी-माजी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लब ऑफ सफाळेचे उपाध्यक्ष तथा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील यांनी करतांना सांगितले की, विद्यालयातील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून लायन्स क्लब सफाळे आणि मालाड मार्वे यांनी विजेशिवाय चालणारी जलशुद्धीकरण यंत्रणा बसवून दिली आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून विज्ञान व चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचा लाभ या विद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सुद्धा होणार आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी तर आभार प्रदर्शन वैभव पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!