महाराष्ट्र

किर्तीवंत शिवराज्य उभं केलतं तुम्ही..!–माँसाहेब जिजाऊ

Spread the love

राष्ट्रमाता-राजमाता,माँसाहेब जिजाऊ,झाशीची राणी लक्ष्मीबाई,अहिल्याबाई होळकर,मदर तेरेसा, सावित्रीबाई फुले,सरोजिनी नायडू,भगिनी निवेदिता अशा कर्तृत्वसंपन्न आयुष्याच्या वेगवान उभारणीतून ‘स्री जातीचा’ सन्मान शतकोटीने वाढविला. आपली लाडकी लेक भविष्यात जगाची माता होणार आहे, मानवतेचे कल्याण करणार आहे,हा शुद्ध अंतकरणातला समृद्ध विचार संपन्न राष्ट्राची निर्मिती करतो, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आणि सत्य आहे हे नाकारुन चालायचे नाही.
राष्ट्रमाता,राजमाता माँसाहेब जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजे लखोजीराव जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला. इ.स.१६०५ साली जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथे झाला.जिजामातेला एकूण आठ अपत्ये झाली त्यामध्ये सहा मुली आणि दोन मुले होती.मोठ्या मुलाचे नाव संभाजी महाराज ठेवले ते कर्नाटकात शहाजी राजांजवळच वाढले आणि पुढे १९ फेब्रुवारी १६३० ला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. माँसाहेब जिजाऊँच्या जन्माअगोदर आणि त्यानंतरही या देशातल्या स्त्रियांवर अनन्वित अन्याय,अत्याचार,जुलूम व्हायचे आणि त्या जुलूम सहन करत आमच्या आया-बहिणी जगत होत्या. जगत नव्हत्याच मुळी…तर त्या जिवंतपणी मरणयातना भोगत होत्या..! एक नाही,दोन नाही,तीन नाही,पाच-पाच सुलतानशाही सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थयाथया नाचत होत्या. त्यांना सुरुंग लावून पाताळात गाडणारी एक ‘पोलादी मानसिकतेची स्री’ ज्यानी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत अंधकारमय भूतकाळाच्या मुसक्या आवळून उज्ज्वल भविष्याचा वेध घेणारा युगंधर, रणधूरंदर,यशवंत, किर्तीवंत, वरदवंत,सामर्थ्यवंत असे महापुरुष राजे शिवछत्रपती आपल्या कर्तृत्वाने याच भूमीवर घडविले..!
माँसाहेबांनी त्यांच्या आयुष्यात असे प्रसंग बघितले की,कोणीही यावे आणि आमच्या आया-बहिणींना उचलून न्यावं, तेव्हा ही परिस्थिती थांबवणारा आणि स्री जातीला सन्मान देणारा राजा, स्री ही मातेसमान आहे ती आमच्या घरातील देवता आहे, तिच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्याचे हात-पाय कलम केले जायचे! असे आदर्श,रयतेचे, बहुजनांचे,अठरापगड जातीचे स्वराज्य माँसाहेब जिजाऊँनी राजे शिवछत्रपतींच्या हातून याच मातीवर घडविले आणि स्त्रियांचा सन्मान करणारा राजा म्हणून शिवछत्रपतींची जगभर कीर्ती पसरली.
जिजाऊंनी रयतेला सुरक्षितता दिली,इथली अस्पृश्यता, विषमता संपविली. इथला समाजवाद,दहशतवाद, जातीवाद मोडीत काढला. आणि आमच्या आया-बहिणींना वाचविण्यासाठी शत्रूवर तुटून पडण्याचे बळ माँसाहेब जिजाऊनीच आम्हाला दिले.शहाजीराजे निजामशाहीत सरदार असल्यामुळे त्यांच्या घरी-दारी धन-दौलत,नोकर-चाकर, सोन्या-चांदीचे दागिने,भव्य राजवाडा असे शाही इतमामात वैभव नांदत होते. मनात आणलं असतं तर, जिजाऊंना मोठ्या थाटामाटात एखाद्या राणी प्रमाणे मिरवणं शक्य झालं असतं,पण जिजाऊंना ओढ लागली होती “स्वराज्याची!” आणि ते स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजीराजे यांनी सत्यात उतरवून दाखवले.जिजाऊंनी शिवबांना युद्धाचे धडे दिले, राजकारणाचे धडे दिले,खलबते, मुत्सद्देगिरी, गनिमीकावा,माणसे कशी जमवावी, माणसे कशी जोडावीत याचे धडे दिलेत, राज्य कसे असावे, राज्यकारभार कसा करावा,अशा सर्व गोष्टींमध्ये तरबेज केलं, अफजलखान प्रसंग असेल,आग्रा-भेट असेल, गड-किल्ले संवर्धन, राज्यकारभाराची जबाबदारी,शेतकऱ्यांना मदत करणे,भांडण-तंटे सोडविणे,यांसारख्या जबाबदाऱ्या पार पाडताना मासाहेबांनी स्वतः स्वराज्याची जबाबदारी समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलली,म्हणून हे हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात या भूमीवर अवतरलं..!
महाराष्ट्राच्या मातीवरची पहार काढून गुलामगिरीच्या छाताडावर पाय ठेवणाऱ्या त्या माँसाहेब जिजाऊ होत्या..!माँसाहेब जिजाऊ जन्माला आल्या म्हणून राजे शिवछत्रपती,राजे संभाजी आम्हाला दिसले, स्वराज्याची संकल्पना मांडताना फार मोठा विचार त्यांनी मांडला, आपल्यासारखी जर एखादी स्त्री असती तर,कशाला या फंदात पडते, पोराला तर उगीच नादी लावू नकोस,असं म्हटली असती! शहाजी राजांकडे जहागिरी होती अजून थोडीशी वाढवून घेऊ आणि आरामात राहू..! पण त्यांनी असं नाही केलं.
मासाहेब जिजाऊनी छत्रपती शिवाजी राजे,संभाजी राजांना फार मोठा विचार देऊन घडवलं!तेव्हा त्यांनी मोठा विचार पाहि ला नसता तर हे स्वराज्य आज निर्माण झालं नसतं! या अशा विचारांनी आपण आपल्या राष्ट्राला समृद्ध करणार आहोत. मासाहेब खरं तर तुमचं आयुष्य आमच्यासाठी फार,प्रचंड प्रेरणादायी आहे.मासाहेब इतिहासाचं ज्ञान आम्हाला नसलं तरी, इतिहासाची जाण मात्र तुमच्यामुळेच आम्हाला झाली..! मासाहेब कर्तुत्व मनगटात उतरण्यापूर्वी ते मनात उतरावं लागतं..!बालमनातच त्याला वाघ दिसला की,झेप घेऊन त्याच्याशी,त्याच्याच त्वेषानं लढावं लागतं, ही शिकवण दिलीत तुम्ही! राजे शिवबा अफझलखानाच्या भेटीला निघाले तेव्हा,तुम्ही त्यांना पाठवलं..!तुम्ही असं नाही म्हणाल्यात की, राजं पाठवा की,तानाजी,येसाजी,जिवाजी,बाजी, मुरारबाजी ला, कोणालातरी..! पण तुम्हीच म्हणालात की, नाही राजं, तुम्हाला जावेच लागेल अन् ,तुमचं काही बरं वाईट झालचं तर मी निपुत्रिक होते असं समजेल..! मग मासाहेब तुम्ही नात्यांना,भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कुठल्याही बाबतीत कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आलेल्या संकटाला सामोरं जाण्याचं तुमचं हे कित्ती अलौकिक धैर्य.! शिवाबाराजे पन्हाळगडच्या वेढ्यात असताना तुम्ही हातात तलवार घेऊन निघालात पण, त्याच वेळी नेताजी पालकरांनी आम्ही जिवंत असेपर्यंत आपण तसदी न घ्यावी म्हणून तुम्हाला साकडं घातलं..!म्हणजे तुम्ही लढवय्या होता! हा या मातीचा इतिहासच आहे मासाहेब! शिवरायांच्या मातृत्वाबरोबरच त्यांचे “गुरुत्व”ही तुम्ही स्वीकारलंत पण आम्ही अजूनही वाद घालतो की,शिवरायांच्या पहिल्या गुरु नक्की कोण? पण प्रत्येक मुलाची पहिली गुरु ही त्याची आईच असते हे आम्ही विसरतो.!मासाहेब तुम्हाला आम्ही राष्ट्रमाता म्हणतो त्याचं कारण असं आहे की,तुम्ही जाधव-भोसले कुटुंबाच्या पलीकडे जाऊन खुप प्रेम केलंत इथल्या मावळ्यांवर! अन् इथल्या माणसांवर! खऱ्या अर्थाने शिवरायांच्या कर्तृत्वाचं सगळं श्रेय तुमचंच आहे कारण,तुम्ही स्वराज्यमाता म्हणून सगळं काही शिकवलंत शिवबाराजेंना..!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई साहेब!स्वराज्याचा रक्षक ज्यांनी जन्माला घातला,त्यांच्या अंगी स्वराज्य रक्षणाचे बाळकडू,त्यांना सक्षम करण्यात मासाहेब जिजाऊंचे हे अतुलनीय असे योगदान हा महाराष्ट्र, हा भारत देश कधी विसरणार नाही.शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी म्हणजे १७ जून १६७४ ला रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी त्यांचे देहावसान झाले..! महाराष्ट्र ही जशी वीरपुत्रांची भूमी आहे,तशीच ती वीरमातांची देखील पवित्र अशी भूमी आहे हे, राजमाता जिजाऊंना पाहून आमच्या लक्षात येते..! त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना,त्यांच्या विचारांना कोटी-कोटी प्रणाम! विनम्र अभिवादन!
जय जिजाऊ-जय शिवराय
*———-शब्दांकन———*-
*प्रा.सतिष उखर्डे*
*(प्रसिद्ध शिवव्याख्याते- प्रबोधनकार)*
*मो.नं.-९४२२९९२३१०*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!