ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रेरणा – एक दृष्टिकोन.लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी

प्रेरणा हिची सुद्धा अनेक रूप आहेत. उगमस्थान सुद्धा भिन्न भिन्न आहेत.

Spread the love

प्रेरणा – एक दृष्टिकोन.लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी.

आवाज न्यूज : विशेष लेख, तळेगाव दाभाडे,२४ नोव्हेंबर.

प्रेरणा हिची सुद्धा अनेक रूप आहेत.
उगमस्थान सुद्धा भिन्न भिन्न आहेत.
एखाद्याच्या उत्कर्षासाठी, ध्येय गाठण्यासाठी त्याची प्रतिमा आणि प्रतिष्ठा उंचावण्यासाठी त्याला प्रेरित करणारी ही अत्यंत आवश्यक असते.अर्थात मित्रांनो कोणाला कशापासून प्रेरणा मिळेल हे सांगता येत नाही.
कधी जन्मदात्या माता पित्यापासून किंवा आयुष्याच्या वळणा- वळणावर भेटलेल्या गुरूकडून, मित्र-मैत्रिणी, यशस्वी महापुरुषांची जीवन चरित्र वाचून किंवा अतिशय साध्या वाटणाऱ्या प्रसंगातून ही तिचा उगम होऊ शकतो म्हणून कुठल्याही यशस्वी पुरूषाच्या आयुष्याचा आपण मागोवा घेतला तर मित्रांनो आपल्याला या प्रेरणेचे विविध रुपात तीच दर्शन निश्चित घडतं.

मित्रांनो कोणतेही ध्येय गाठताना त्या ध्येयापर्यंत पोहोचणारा मार्ग कधीच सोपा नसतो.प्रत्येकाला त्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.काहीवेळा हे अडथळे मानवनिर्मित असतात, काही परिस्थितीमुळे निर्माण होतात, तर काही त्याच्या मनोवृत्ती दडलेले असतात या सर्व त्यांच्यावरती मात करायची, त्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते.
मला आठवतंय की लहानपणी किर्तन ऐकायचं कीर्तनकार शिव चरित्र, प्रभु चरित्र अत्यंत तन्मयतेने रंगून सांगायचे.
त्या कीर्तनकार यांचे सादरीकरण त्यांचा अभिनय त्यांना गावात गावात मिळणारा मान सन्मान हे सर्व मी मनातच साठवून ठेवायचो, त्याचा परिणाम असा झाला कि, त्यांची नक्कल मी शाळेत करायला लागलो त्यात मला आनंद वाटायचा आणि त्या काळापुरता का होईना ही कीर्तनकार मंडळी माझी प्रेरणा स्थान बनले होते.

आज मित्रांनो या प्रसंगामुळे वक्तृत्व कलेची आवड व त्या कलेतील प्रगती या दोन्ही गोष्टींचा पाया कीर्तनाच्या माध्यमातून माझ्या मनात भक्कम झाला असे मला वाटते.
मित्रांनो पुढे थोडा मोठा झालो गावातले नावाजलेले प्रतिष्ठित प्रसिद्ध अशा डॉक्टरकडे बघायचो त्यांच्या हातून होणारी गोरगरिबांच्या रुग्नसेवा बघितल्यानंतर रुग्णांच्या आणि डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे’ समाधान मला खूप काही प्रेरणा देऊन जायचे आणि नकळत मी हा डॉक्‍टरी पेशा का पत्करू नये असा विचार करायला लागलो.
त्यासाठी रात्रंदिवस मेहनत का करू नये?
हा विचार माझ्या मनात रुजला आणि ही सर्व डॉक्टर मंडळी माझी प्रेरणास्थान बनली आणि त्यामुळेच मी डॉक्टर होऊ शकलो हे निर्विवाद सत्य आहे.

मित्रांनो पुढे मी वैद्यकीय व्यवसायात स्थिर झाल्यानंतर ज्या समाजाने मला प्रतिष्ठा दिली आहे, सन्मान दिला आहे, समृद्धी दिली आहे, त्याचं उत्तरदायित्व होण्यासाठी मी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या शोधात निघालो आणि मला शोध लागला तो अंतराष्ट्रीय लायन्स या संस्थेचा आणि लगेच मी त्याच्या सभासद झालो.त्यामुळे अनेक सभासदांशी माझा संवाद झाला, त्यांचा परिचय झाला, त्यांची कार्य करण्याची पद्धत कळली आणि माझ्या अनुभवात भर पडली एवढेच नव्हे तर साहित्य, कला, संस्कृतीच्या समृद्ध अशा अनेक संस्थांचा मी सभासद झालो आणि मला सांगायला आनंद वाटतो की या सर्व संस्था माझ्या प्रेरणास्थान ठरल्या.
त्यामुळे मला सामाजिक कार्य करण्याची एक दिशा प्राप्त झाली आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याच समाधान प्राप्त झालं.
वैद्यकीय व्यवसाय करताना मित्रांनो परिस्थितीने गांजलेला असलेला एखादा रुग्ण माझ्या कडे येतो.यथा शक्ती मला मिळालेल्या ज्ञानाच्या माध्यमातून मी त्याचा रोगनिदान करतो.त्याला व्याधीमुक्त करण्याचा प्रयत्न करतो आणि तोच रुग्ण मला काम करण्याची प्रेरणा देऊन जातो.

त्याप्रमाणेच याच मोल पैशात किंवा शब्दात मी कधीच व्यक्त करू शकत नाही कारण, आपल्या आरंभ आणि अंत माहीत नसलेल्या प्रत्येकाच्या आयुष्याच्या या प्रवासात ही प्रेरणा स्थान फार मोठी आहेत.
मित्रांनो तितकीच आवश्यक आणि महत्त्वाची आहेत आणि म्हणूनच डोळसपणे ती आपण टिपली आणि अनुभवली पाहिजेत.एवढेच नव्हे तर  या अचाट प्रेरणा शक्तीच्या माध्यमातून आपण स्वतः सतत कार्यरत राहिले पाहिजे.
हीच आपल्या यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे यात शंका नाही.

लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!