ताज्या घडामोडी

एम एस सी आय टी व डीएसएम ची सक्ती नको * अध्यापक संघाची उपसंचालक बैठकीमध्ये मागणी * आमदार आसगावकर यांची उपस्थिती

Spread the love

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ व शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांची नुकतीच बैठक संपन्न झाले असून या बैठकीमध्ये वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पूर्वअट नसल्याने एम एस सी आय टी ची सक्ती करण्यात येऊ नये तसेच ज्यांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी आहे अशा नवनियुक्त मुख्याध्यापकांना डीएसएम ची सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. या दोन्ही मागण्यासंदर्भात शिक्षण आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी स्पष्ट केले. यावेळी पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर,रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील ,कायदेविषयक सल्लागार आत्माराम मिस्त्री , सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक संघाचे अध्यक्ष अजय शिंदे , कोल्हापूर शहर अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेश वरक, सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले व अन्य अधिकारी उपस्थित होते.
सभेला उपस्थितांचे स्वागत शिक्षण सहसंचालक सुभाष चौगुले यांनी केले व शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी सभेचे प्रास्ताविक करून सभेला सुरुवात झाली. पवित्र पोर्टल अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना शालार्थ आयडी तात्काळ देण्यात यावा व त्यांचा पगार तात्काळ सुरू करण्यात यावा, 2005 पूर्वीच्या अंशतः अनुदानित तुकडीवर असणाऱ्या शिक्षकांचा सहाव्या वेतन आयोगाचा फरकाचा हप्ता लवकरात लवकर जमा करण्यात यावा, सहावी ते आठवीच्या पदवीधर शिक्षकांना बीएड वेतनश्रेणी तात्काळ लागू करण्यात यावी, शिक्षकांसाठी कॅशलेस मेडिक्लेम सुविधा सुरू करण्यात यावी, प्रत्येक शिक्षणाधिकारी कार्यालयांमध्ये सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांपासून शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना बंधनकारक करण्यात यावी, कार्यालयांमध्ये इनवर्ड होणारी सर्व प्रकारची प्रकरण त्याच क्रमाने निकालात काढण्यात यावीत, रत्नागिरी वेतन पथक विभाग माध्यमिक कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याने त्याचा कामकाजावर प्रतिकूल परिणाम होत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्या , ज्या माध्यमिक शाळांना नवीन नियमाप्रमाणे मुख्याध्यापक पद मंजूर नाही त्या शाळांसाठी सहीचे अधिकार कायमस्वरूपी देण्यात यावेत हे धोरणात्मक प्रश्न अध्यापक संघाच्या वतीने बैठकीमध्ये मांडण्यात आले.या सर्व मागण्यांबाबत उचित कार्यवाही तात्काळ करण्याचे आश्वासन उपसंचालक महेश चोथे यांनी दिले. यावेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्याकडे जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी केली. आमदार जयंत आसगावकर यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. सभेला उपस्थितांचे आभार अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी मानले यावेळी त्यांनी आमदार जयंत आसगावकर यांचे विशेष आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!