ताज्या घडामोडी

हळदीकुंकू आणि आपण

Spread the love

पायात जोडवी नाही, अंघोळ करताना मंगळसूत्र काढलेय आणि ते घालायचे विसरलेय, टिकलीही नाही माझ्या कपाळी, अन् बांगड्याही नाही.’ असं अनेकदा घडत. पण तेव्हा प्रत्येकीच्या घरात काय प्रतिक्रिया उमटते.? पहा बरं आठवून. मी माझे सांगते. माझाही प्रवास लग्नानंतर हळदीकुंकू ते हळदीकुंकवापलीकडे असा झालाय. तसं तर आमचे कुटुंब या सर्व गोष्टी मानत नाही तरीही.. या सर्वांची सर्वांना इतकी सवय होऊन गेलेली असते की पहाणारालाच ते काहीतरी चुकीचे घडलेय असे वाटते.
ॲाफिसला जाताना एक दिवस टिकली विसरली की काय गोंधळ होतो आपला. काहीतरी खूप मोठी चूक आपण आयुष्यात केली असे आपल्यालाच वाटते. जर घरातून बाहेर पडताना कुणाच्या लक्षात आलं तर पटकन सांगितले जाते.. टिकली राहिलीय. प्रत्येक घरातच बाईकडे सर्वांचंच लक्ष. काय तर तिने आपल्या हिंदू धर्माप्रमाणे सौभाग्यालंकार घातलेत का .? ते घालायलाच हवेत हे अलिखित बंधन..! हल्लीच्या मुली हे सारं रोज वापरतातच असे नाही मग त्यांना बरेच टोमणेही ऐकावे लागतात व काही ठिकाणी मानसिक त्रासही.
नवरा असलेल्या प्रत्येक बाईने हे सारं केलंच पाहिजे हे एकीकडे आणि दुसरीकडे नवरा गेलेल्या प्रत्येक बाईने हे सारं नाकारलं पाहिजे. कोणी ठरवले हे..? आणि आपण ते का ऐकायचे.? हा प्रश्न आमच्या अनेक भगिनींना पडत नाही व पडलाच तर कोणाकडेही विचारायचे धाडस नाही. आणि प्रवाहाविरूध्द जायचे मानसिक धैर्य त्या एकवटत नाहीत असे चित्र अनेक ठिकाणी दिसते.
आणि मग जेथे सवाष्ण, हळदीकुंकू, शुभकार्याचा विषय येतो तेथे नवरा नसलेल्या स्त्रीला नाकारण्याची प्रक्रिया होते. ती स्वतःहूनही तेथे जात नाही. ती स्वतःला कम नशीबी समजते. आपण या आनंदापासून वंचित आहोत ही भावना तिच्या मनात घर करून रहाते. अशा आपल्या महिला भगिनींना आपण समप्रवाहात आणायला हवे. त्यांचे प्रबोधन करायला हवे. हा विषय नेहमीच संक्रांत, गौरीपूजन, मंगळागौर पूजन, लग्न प्रसंगी ऐरणीवर येतो.
‘लोक काय म्हणतील’ हा आपल्या मनाला लागलेला रोग आहे. तो वेळीच समूळ नष्ट केला तर सारं सहज सोपं होऊन जातं. यासाठी फक्त एकदा एक पाऊल पुढे टाकायला लागते. मग लोकच आपलं कौतुक करतील. आणि नावंच ठेवली तर ती मागे ठेवतील. सावित्रीबाईंनी आपल्या शिक्षणासाठी, आपल्याला सक्षम करण्यासाठी अंगावर शेणगोळे पेलले, प्रस्थापितांचा त्रास सहन केला, प्रसंगी घर सोडावे लागले तरीही ज्योतिबांसह सोडले पण शिक्षणाची कास सोडली नाही. आणि आपण आजही २०० वर्षांनीही व्यवस्थेला, रूढी-परंपरेला काहीच प्रश्न विचारणार नाही का.? किती मानसिक गुलामीत राहाणार आपण ?
‘मला जे पटतं ते मी करणार, मी हळदी कुंकू व सौभाग्यालंकार घातल्याने वाईट काहीच घडणार नाही. वाईट घडायचे ते घडून गेलेय. माझा नवरा गेला तर त्याला मी कारणीभूत नव्हते. मग त्याची शिक्षा मला का?’ हा प्रश्न विचारण्याचे धाडस आपण आपल्यात कधी येणार ? या विषयाला अनेक कंगोरे आहेत पण आज फक्त हळदीकुंकू या विषयाला धरून थोडं बोलूयात.
यानिमित्ताने मला आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधायचे आहे. आपलं कोणतही जवळचं माणूस गेलं तरीही ते आपल्या अंतापर्यंत आपल्याच जवळ असतं. माणूस शरीराने जातो. मनाने तो आपल्यातच असतो. आणि एखाद्या बाईचा पती गेल्यानं ती जशी आहे तशीच त्याच्या आठवणीत जगली तर इतरांना वाईट वाटायचे काय कारण .? हे म्हणताना मला हेही सांगायचंय की आज अनेक स्त्रीया पतीच्या मृत्यूनंतर त्याच वेळी सौभाग्यालंकार काढणे नाकारत आहेत. त्यांना काही कुटुंबातून पाठिंबाही मिळत आहे. काही जण विरोध करत आहेत पण त्यांच्या मुली-सुना आज त्या आयांच्या पाठीशी उभ्या राहात आहेत ही सकारात्मक गोष्ट आज घडू लागली आहे. पती निधनानंतर अनेक महिला आज विविध प्रसंगी नटणं मुरडणं, दागदागिने घालत आहेत. कमी वयात विधवा झालेल्या महिला भगिनी त्यांची अपुरी राहिलेली हौस त्या पूर्ण करू इच्छित आहेत पण त्याचबरोबर काही स्त्रीया मात्र विविध प्रसंगी हळदी कुंकू मात्र नाकारताना दिसतात. यात बहुजन महिलांचा समावेश जास्त आहे. ब्राह्मण व काही परिवर्तनीय बदल स्वीकारलेल्या घरात बरेच बदल होत आहेत. बहुजन सामान्य स्त्रीमधे मात्र बदल होणे अपेक्षित आहे. अशा महिलांचे खास हळदीकुंकू कार्यक्रम काही काळ मोठ्या प्रमाणात झाले तर काही वर्षांनी यात सहजतां येईल.
चला तर मग आपण या पहिल्या सणाच्या निमित्ताने ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ असे केवळ न म्हणता, सर्वजणी मिळून ठरवूयात की ‘मी महिलांमधे कोणताच भेदभाव करणार नाही. भगिनीभाव निर्माण करेन. जात-पात-धर्मापलीकडे जाऊन विचार करायचा प्रयत्न तर करेनच पण सवाष्ण, विधवा, परितक्त्या, घटस्फोटित असे काहीही मनात न आणता सर्वांना हळदीकुंकू व संक्रांतीचे वाण देईन. ही सुरूवात मी माझ्यापासून करेन. प्रत्येकीच्या पाठीशी मी ठामपणे उभी राहीन’ चला
तर मग शुक्रवारी4 तारखेला बिरोबा मंदिर ब्रम्हनाळ येथे ठीक 3:30ला
हळदी कुंकू कार्यक्रमासाठी सर्व महिलांनी उपस्थित रहा
माया गडदे -पाटील
9860399301
जनक्रांती अध्यक्ष

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!