क्रीडा व मनोरंजन

एमआरआरकेएस चषक क्रिकेट नानावटी हॉस्पिटल अंतिम फेरीत

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ-‘एमआरआरकेएस’ रौप्य महोत्सवी चषक आंतर  हॉस्पिटल  टी-२० क्रिकेट स्पर्धेत नानावटी हॉस्पिटलने कस्तुरबा हॉस्पिटलचा ८० धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अर्धशतकवीर दिनेश पवारची (५० चेंडूत ६१ धावा, ३ षटकार व ४ चौकार) धडाकेबाज फलंदाजी व प्रफुल तांबेची (१५ धावांत ४ बळी) अचूक गोलंदाजी, यामुळे नानावटी हॉस्पिटलने मोठा विजय संपादन केला. महेश संगर (२८ चेंडूत २५ धावा, ३ चौकार) व डॉ. परमेश्वर मुंढे (१३ धावांत ३ बळी) यांनी कस्तुरबा हॉस्पिटलतर्फे छान लढत दिली. कामगार नेते सचिनभाऊ अहिर व एमआरआरकेएसचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप यांनी स्पर्धेचे शिवाजी पार्क मैदानात आयोजन केले आहे.

नाणेफेक जिंकून नानावटी हॉस्पिटलसाठी दिलेला फलंदाजीचा निर्णय कस्तुरबा हॉस्पिटल संघाला लाभदायक ठरला नाही. दिनेश पवारची (५० चेंडूत ६१ धावा) फटकेबाजी रोखण्यात कस्तुरबा हॉस्पिटलचे गोलंदाज अपयशी ठरले. दिनेश पवारला किशोर कुयेस्कर (२३ चेंडूत २४ धावा), ओंकार जाधव (१५ चेंडूत १८ धावा) यांनी उत्तम साथ दिली. परिणामी नानावटी हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ५ बाद १४१ धावा फटकाविल्या. डॉ.परमेश्वर मुंढेच्या  (१३ धावांत ३ बळी) फिरकी गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना जखडून ठेवले. विजयी लक्ष्याच्या मोठ्या आव्हानाखाली महेश संगरचा ( २८ चेंडूत २५ धावा) अपवाद वगळता कस्तुरबा हॉस्पिटलची फलंदाजी बहरली नाही. फिरकी गोलंदाज प्रफुल तांबे (१५ धावांत ४ बळी), मध्यमगती गोलंदाज प्रतिक पाताडे (८ धावांत २ बळी), डावखुरा फिरकी गोलंदाज फरहान काझी (१० धावांत २ बळी), फिरकी गोलंदाज ओंकार जाधव (१४ धावांत १ बळी) यांनी अचूक मारा करीत कस्तुरबा हॉस्पिटलचा डाव १८.४ षटकात ६१ धावांत गुंडाळला आणि नानावटी हॉस्पिटल संघाला ८० धावांनी विजय मिळवून दिला. दिनेश पवारने सामनावीर तर अष्टपैलू डॉ. परमेश्वर मुंढेने कस्तुरबा हॉस्पिटलच्या उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष संजय कदम, अमरहिंद मंडळाचे प्रमुख कार्यवाह दीपक पडते, विलास डांगे, डॉ. नितीन रेगे, मारुती शिंत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्विकारला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!