ताज्या घडामोडी

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : परिवर्तनशील साहित्यिक …… श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर

Spread the love

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी म्हणायचे की, जगातील मार्क्सवाद हा कदाचित भाकरीचा प्रश्न सोडवीलही; पण माणूस म्हणून जगण्याचा प्रश्न शिल्लक राहतोच. आणि मला भाकरीपेक्षा इज्जत आणि स्वाभिमान प्यारा आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या विचाराने प्रेरित होऊन आपल्या साहित्यातून, ज्यांनी स्वाभिमान दर्शवताना सर्वसामान्य लोकांच्या जगण्याचे आणि वास्तवतेचे अस्तित्व दाखवून दिले. त्यासोबतच श्रीमंत आणि समाजातल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वर्गाकडून होणारी दीन – दलित – गोरगरीबांची पिळवणूक आणि अस्पृश्य बांधवाचे वर्णवर्चस्ववाद्याकडून होणारे धार्मिक, सामाजिक शोषण यावर आपल्या लेखणीच्या माध्यमातून कोरडे ओढणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती. या जयंतीनिमित्त त्यांच्या परिवर्तनशील विचारांना विनंती अभिवादन आणि सर्वांना खूप – खुप शुभेच्छा!
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म भाऊराव साठे आणि वालुबाई यांच्या पोटी १ ऑगष्ट १९२० या दिवशी सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात वाटेगाव या खेड्यात मातंग झाला. त्यांचे नाव मूळ नाव तुकाराम होते. त्यांना लहानपणापासूनच सर्वजण अण्णा याच नावाने बोलत असत. तेच नाव पुढे रूढ झाले. त्यांना लहानपणापासूनच दारिद्र्य, प्रचंड विषमता, अज्ञान, अंधश्रद्धा यांचा सहवास लाभला. त्यामुळे त्यातून त्यांना नवा संघर्षमय मार्ग मिळाला. एक दिवस पूर्ण आणि दुसऱ्या दिवशी अर्धा दिवस शाळेत गेलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी मोठया प्रमाणात साहित्याची निर्मिती केली. कामगार वर्गाचे नेतृत्व केले. शाहिरीच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रबोधन केले. सर्वसामान्य लोकांना मार्गदर्शन करताना त्यांना नवी दिशा आणि अनुभव दिला. शिक्षणातून मिळालेले ज्ञान जरी त्यांना मिळाले नाही की मिळू दिले नाही असे म्हणण्यापेक्षा; अनुभवातुन मिळालेल्या ज्ञानामुळे एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला एक मुलगा जगप्रसिद्ध कामगार नेता, प्रबोधन करणारा लोकशाहीर आणि लोकप्रिय साहित्यिक झाला.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून कादंबरी, कथा, नाटके, लावणी, वगनाट्य, गीते, चित्रपट लेखन, गाणी, पोवाडा, तमाशा इत्यादी साहित्य प्रकारातून समाजाची वेदना प्रकट केली. त्यांनी आपल्या गाण्यातून लावणी, पोवाडा, गण, निसर्गगीत, स्फूर्तिगीत, शेतकरीगीत, गौरवगीत, भावगीत, व्यक्तिगत गीत, गौळण, कामगारगीत अशा असंख्य प्रकारातून व्यथा मांडली. अण्णाभाऊच्या पूर्वी तमाशातून विविध पात्रे जी लोकांची फक्त मनोरंजन करायची. मात्र अण्णाभाऊनी तमाशात राष्ट्रपुरुषांचा इतिहास, कामगार वर्ग, शोषिक वर्गाची तळमळ, महिलांवरील अत्याचार इत्यादी दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे अल्पशिक्षित वा दीनदलित लोकांचे वास्तव जगणे समोर यायला सुरुवात झाली. तमाशाला सार्वत्रिक स्वरूप देण्यात महत्वाची भूमिका अण्णाभाऊनी बजावली. शिक्षण कमी असले तरीही अण्णाभाऊ यांच्यात अफाट जिद्द आणि प्रामाणिकतेचा ध्यास होता. त्यासोबतच समाजातील शोषण करणारे शोषिक लोकांना वाचण्याचा अभ्यास होता. याच अभ्यासापोटी त्यांनी समाजातील अनेक प्रकारची अनेक स्वरूपाची माणसे वाचली. त्यामुळेच त्यांनी याच माणसामध्ये आपल्या उघड्या डोळ्यांनी समाजातील चालीरीती, प्रथा – परंपरा, बेकारी, बेरोजगारी, राजकारण, तिरस्कार, तुच्छता पाहिली. ह्या सर्व बाबी त्यांनी आपल्या लेखणीतून साहित्यात उतरवली. ते झपाट्याने लिहीत गेले आणि त्यांचा साहित्यिक प्रवास हा मोठ्या प्रमाणात होत गेला. त्यांच्या याच वास्तववादी लेखणीने साकारलेला प्रत्येक कथेचा नायक आजही समाजातील सर्वसामान्य लोकांना आपलीच भूमिकाच साकारतोय असे वाटते. काही प्रमाणात त्यांच्या काळात हे वाटणे अगदी योग्यच होते. कारण त्या प्रमाणात समाजात घडामोडी घडत होत्या. जे – जे अण्णाभाऊनी किंवा त्यांच्या जवळच्यांनी वा समाजाने भोगले वा अनुभवले ते – ते अण्णाभाऊनी आपल्या लेखणीत साकारले. त्यांच्या अनेक कथांवर आणि कांदबऱ्या वर चित्रपट निघाले. त्या चित्रपटांनी गर्दी खेचली, पुरस्कार मिळवले. परंतु सारस्वतांच्या नजरेत मात्र हा लोकांच्या प्रबोधनासाठी लेखणी खर्च करणारा हा साहित्यिक उपेक्षित आणि एका ठरावीक वर्गापूरताच मर्यादित राहिला किंवा त्यांना ठेवण्यात आले. तरीही अण्णाभाऊनी जाणीवपूर्वक या बाबी साहित्याच्या माध्यमातून समोर आल्या.
साहित्याच्या बरोबर अण्णाभाऊनी आपल्या तमाशा वा लावणीतून पुन्हा एकदा विघातक समाज व्यवस्थेवर प्रहार करायला सुरुवात केली. त्यांच्या शब्दांची धार एवढी तीव्र होती की, मंत्र्यांचा दौरा या नाट्यावर तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी बंदी घातली. नुसतीच बंदी घातली नाही तर अण्णाभाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली. जेव्हा ते तुरुंगातून बाहेर आले. तेंव्हा त्यानी पुन्हा एकदा या मुजोरीवर प्रहार केले. ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली, त्यामध्ये आपला ताफा घेऊन अण्णाभाऊ अग्रेसर होते. त्यांची या चळवळीतील …
माझी मैना गावाकडे पाहिली,
माझ्या जीवाची होतीया काहिली
ही लावणी आजही अनेकांच्या मनाचा ठाव घेते. एवढेच कशाला त्यांनी कामगार वर्गाला जागृत करण्यासाठी आणि त्यांच्यावरील झालेला अन्याय दर्शविण्यासाठी अनेक विषयांवर पोवाडे रचले. लाल बावटा या कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी सरकारला नामोहरम करतानाच लोकांच्या मनात क्रांतीची बीजे रोवण्यास मदत केली. त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर अनेकवेळा खुप मोठया प्रसंगांना तोंड द्यावे लागले. परिणामी तत्कालीन नोंदीचा विचार केला तर आपल्या लक्षात येते की, त्यांच्या याच पोवाड्यामुळे अनेक कामगारांना स्फुर्ती मिळाल्याची नोंद मिळते. म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे योगदान नकीयच लक्षणीय ठरले. त्यांच्या महाराष्ट्राची परंपरा, मुंबईतील गिरणी कामगार, अंमळनेरचा हुतात्मा, बर्लिनचा पोवाडा, स्टालिनग्राडचा पोवाडा या व अशा अनेक पोवाड्यातुन त्यांनी विविध विषयांचे वास्तववादी चित्र मांडले.

सर्वसामान्य लोकांना आणि त्यांच्या समस्यांना आपल्या लेखनात स्थान दिल्याने त्यांचा वाचक वर्ग मोठया प्रमाणावर वाढला. म्हणूनच खुळंवाडी, बरबाद्या, कंजारी, कृष्णाकाठच्या कथा, चिरागनगरची भूतं इत्यादी १९ कथासंग्रह त्यांनी लिहिले. त्यात बरबाद्या, भोमक्‍या, स्मशानातील सोनं, सापळा, उपकाराची फेड, विठू महार, वळण, तमाशा, मरीआईचा गाडा या कथांमधून त्यांनी समाजात असणाऱ्या विषमतेवर आणि घडणाऱ्या घडामोडीवर भाष्य केले. आम्ही शाळेत असताना त्यांच्या स्मशानातील सोन्याने तर अक्षरशः भारावून टाकले होते. एवढेच नव्हे तर त्यावेळी सर्वच विद्यार्थ्यांना या कथेने भुकेने काय परिस्थिती ओढवू शकते याची जाणीव करून दिली. म्हणून भुकेल्या पोटाने अनेक क्रांत्या होतात याची आठण त्यांची ही कथा वाचताना होती. एवढी प्रचंड ताकद त्यांच्या लेखणीत होती.
त्यांच्या लेखणीचं अजून एक वैशिष्ट्य सांगण्यासारखे आहे किंवा ते याठिकाणी नमूद करण्यासारखे आहे. ते म्हणजे त्यांच्या साहित्यात त्यांनी कधीही स्त्री चारित्र्यावर अन्याय केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांना कदाचित आदर्श मानत असल्याने त्यांनी स्त्रीला सदैव अन्यायाच्या विरोधात दाखवले. दुर्गा, खेळखंडोबा, तरस, तीन भाकरी, माहेरची वाट, चंदा या व अशा अनेक कथांमधून त्यांनी स्त्रियांच्या विविध वेदनांना समाजासमोर मांडत आपल्या अभ्यासु वृत्तीने सर्वसामान्य लोकांच्या मनात या वेदनाच्या विरोधात चीड उभी करतात. पितृसत्ताक असलेल्या आपल्या देशात स्त्रीला कसं जगावं लागत आहे ते समरस होऊन अण्णाभाऊनी चित्रित केलंय. अशा माध्यमातून त्यांनी स्त्रीचे शिलत्व आणि स्वाभिमान जागृत केला. त्यासोबतच वारणेचा वाघ, फकिरा, वैजयंता, वारणेच्या खोऱ्यात, माकडीचा माळ, रानबोका यासारख्या साहित्यकृतीतून त्यांनी स्त्रीचे ग्रामीण जीवन रेखाटताना स्त्रीला नायकत्व दिले आहे. थोडक्यात अण्णाभाऊनी देखील स्त्री पात्राचा समावेश केला. मात्र त्यात सुद्धा त्यांनी स्त्रीला दुय्यम न समजता या ताकदीच्या भूमिका दिल्या. कोणत्याही प्रकारची टीका वा टिप्पणी न करता त्यांनी आपल्या साहित्यातून या गोरगरीब जनतेचे जगणे मांडले. त्यामुळे काळाच्या ओघातही अण्णाभाऊनी हे चिरंतन ठरतात. मराठी साहित्य प्रकारातील अण्णाभाऊ हे एकमेव साहित्यिक असावेत ज्यांच्या अनेक कथा, कादंबऱ्या ह्या इतर अनेक भाषेत अनुवादित झाल्या. त्यामागे नक्कीच त्यांनी त्या त्या कथानकाला शोभेसे उभे केलेले म्हणी, विचार, वाक्ये, शब्द, उपहास, निर्भीडता, सुसूत्रता इत्यादी बाबीमुळे इतर भाषांमध्ये त्यांचे साहित्य अनुवादित झाले. यामागे हे व अनेक कारणे असतीलही. मात्र अण्णाभाऊ स्वतः सांगायचे की, या वास्तववादी लेखनामागे आपण जे जीवन जगतो, त्याच जगण्यामध्ये आपल्या अनेक पिढ्यांचे जगणे गेले व जात आहे, त्या जीवनाचा आपण रोज अनुभव घेत आहोत, आपणच नव्हे तर समाजातील मोठा वर्ग आणि बहुसंख्य जनता ह्या जगण्याचा एक भाग म्हणून जगत आहे. अशा जनतेचे जगणे, त्यांचा जीवनाच्या वाटेवरील संघर्ष त्यांच्या याच संघर्षातून उदयाला आलेले नवीन विचार समोर येतात ते सर्व आपण आपल्या लिखाणातून मांडावे यासाठी मी आजपर्यंत सतत लिखाण करत आलो आहे. मला वाटते की, अण्णाभाऊनी या विचाराला कधीही बगल दिली नाही वा सर्वच स्तरातील लोकांना आवडेल म्हणून लिखाण केले नाही. तर त्यांनी जो वसा घेतला, तोच वसा कायम ठेवत लिखाण केले. म्हणून कदाचित त्यांचे लेखन हे वास्तववादी ठरले. म्हणूनच अण्णाभाऊ हे लोकशाहीर आणि प्रबोधनात्मक लिखाण करणारे साहित्यिक ठरतात. काहीजणांनी त्यांच्या लेखणीवर आक्षेप घेतला असला तरीही त्यांच्या लेखनाने नक्कीच समाजाचा एक भाग भरून टाकला हे मात्र नक्की.
लेखाच्या शेवटी मला त्यांच्या रशियातील प्रवासाचा प्रसंग आठवतो. ते ज्यावेळी रशियात गेले त्यावेळी तेथील लोकांची प्रगल्भता आणि तेथील सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध असलेल्या सोयी यासह तेथील अनेक गोष्टी माझा रशियाचा प्रवास यामध्ये सविस्तर मांडल्या आहेत. भारत आणि रशिया यांची तुलना करताना ते नक्कीच भारताने देखील रशियाचा विकासात्मक आणि कामगारांच्या हिताच्या धोरणांचा अवलंब करावा अशी अपेक्षा व्यक्त करतात. त्यासोबतच भारतीय नागरिकांनी देखील रशियन नागरिकासारखी जाणीव स्वतःमध्ये निर्माण करण्याची गरज असल्याचे मत नोंदवतात.

अशा या लोकोत्तर लोकशाहिराची आज शतकमहोत्सवी जयंती आहे. त्यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचविलेल्या
जग बदल घालून घाव,
मज सांगून गेले भीमराव
वा दाखवलेल्या मार्गावरून चालताना कधीही आदर्शाशी वा मार्गदर्शकाशी प्रतारणा केली नाही. त्यांचा हाच गुण आज सर्वांनी घेणे गरजेचे आहे. ज्यावेळी ते रशियात गेले त्यावेळी त्यांनी तेथील रस्त्यांची कामे पाहून असेच रस्ते आपल्या देशात होतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र त्यांचे हे स्वप्न देशात साकार होईल तेंव्हा होईल. मात्र काही गावात अख्खे रस्तेच गायब होताना दिसत आहेत. त्यांच्या साहित्यातून समाजातील वाईट गोष्टींवर त्यांनी सतत प्रहार केला. समाजात, देशात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात असो अगदी छोट्याशा गावात पर्यायाने गावातील व्यवस्था म्हणजेच ग्रामपंचायतसारख्या पंचायत राज व्यवस्थेतील महत्वाच्या घटकामध्ये देखील होणाऱ्या भ्रष्टाचारावर त्यांनी पोवाडे, गाणी, चित्रपट, तमाशा यातून आसूड ओढले आहेत. त्यासोबतच भ्रष्ट, लबाड आणि दलालांनी चांगल्या व्यवस्थेचा स्वतःच्या स्वार्थासाठी लुटणारा काळा बाजार भरवला आहे. त्यावर ते त्यांच्या काळा बाजार या पोवाड्यात ते परखडपणे म्हणतात..
काळ्या बाजाराचा रोग आला।
मागं लागला गोरगरिबाला।
सुखाचा घास मिळंना झाला।
एक मात्र खरे, त्यांनी ज्या परिस्थितीत लोकांच्या समस्यांना आपल्या साहित्यातून मांडत, या माध्यमातूनही देशसेवा करता येते हे सप्रमाण सिद्ध केले आणि देशसेवा करण्याची नवी दिशा दाखवली. त्याचप्रमाणे आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात प्रत्येकाने आपापल्या नैतिकतेला स्मरून कार्य करणे गरजेचे आहे.
पुन्हा एकदा त्यांच्या याच परिवर्तनशील विचारांना मनःपूर्वक अभिवादन आणि सर्वांनाच खुप खुप शुभेच्छा!
©® श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर,
मु. पो. वाटद खंडाळा,
ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३.
संपर्क – ९७६४८८६३३०/ ९०२१७८५८७४.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!