क्रीडा व मनोरंजन

किशोर-किशोरी मुंबई जिल्हा निमंत्रित खो-खो स्पर्धा 2021-22 किशोरीं मध्ये ओम साईश्वरला तर किशोरां मध्ये विद्यार्थीला विजेतेपद

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई, (क्री. प्र.) : मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने परळच्या युवक क्रीडा मंडळाने स्व. साहेब नाईक स्मृती चषक किशोर-किशोरी मुंबई जिल्हा निमंत्रित खो-खो स्पर्धा 2021-22 चे आयोजन नरेपार्क क्रीडांगणावर आयोजित केले होते. या स्पर्धेत किशोरींमध्ये अंतिम सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने तर किशोरांमध्ये विद्यार्थी क्रीडा केंद्राने विजय मिळवत स्व. साहेब नाईक स्मृती चषकावर नाव कोरले.

आज झालेल्या किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने शिवनेरी सेवा मंडळाचा (०३-०४-०७-०४) १०-०८ असा २ गुणांनी पराभव केला ओम साईश्वर तर्फे कादंबरी तेरवणकरने २:००, १:३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ खेळाडू बाद केला. आर्या जाधवने १:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ खेळाडू बाद केले तर काजल मोरेने आक्रमणात ५ खेळाडू बाद केले शिवनेरीतर्फे मुस्कान शेखने ३:००, १:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ खेळाडू बाद केला शर्वी नडेने १:३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ४ खेळाडू बाद केले.

किशोर गटाच्या अंतिम सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने ओम साईश्वर सेवा मंडळ (अ) संघाचा (०४-०५-०८-०५) १२-१० असा २ गुणांनी पराभव केला. विद्यार्थीतर्फे सुबोध पाटीलने १:३०, १:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ गडी बाद केले, शुभम घाडीगावकरने २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ बडी बाद केला ओमकार जाधवने आक्रमणात ३ गडी बाद करून चांगला खेळ केला. ओम साईश्वर तर्फे सुजल शिंत्रे (४:२०, २:२० मि. संरक्षण), सुजल गुरव (२:५० मि. संरक्षण व १ गडी) व सार्थक माडये (३ गडी) यांनी जोरदार लढत दिली मात्र ते आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही.

किशोरी गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात सरस्वती मंदिर हायस्कूलने अमर हिंद मंडळाचा (१०-०३-०२) १०-०५ असा १ डाव व ५ गुणांनी पराभव केला तर किशोर गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात अमर हिंद मंडळाने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचा (०८-०७-०६-०२) १४-०९ असा ५ गुणांनी पराभव केला.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुढील प्रमाणे आहेत.

किशोरी गट : सर्वोत्कृष्ट संरक्षक – मुस्कान शेख (शिवनेरी), सर्वोत्कृष्ट आक्रमक – काजल मोरे (ओम साईश्वर), सर्वोत्कृष्ट अष्टपैलू – कादंबरी तेरवणकर (ओम साईश्वर)

किशोर गट : सर्वोत्कृष्ट संरक्षक – सुजल शिंत्रे (ओम साईश्वर), सर्वोत्कृष्ट आक्रमक – ओमकार जाधव (विद्यार्थी), सर्वोत्कृष्ट अष्टपैलू – सुबोध पाटील (विद्यार्थी)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!