ताज्या घडामोडी

पत्रकारिता क्षेत्रातील कोहिनूर – श्री हेमंत वणजू

Spread the love

अष्टपैलू

पत्रकारिता, कला, क्रीडा, वक्तृत्व, उद्योग- व्यापार, राजकारण अशा विविध क्षेत्रांतले सखोल ज्ञान, ग्रहण करण्याची क्षमता आणि विविध क्षेत्रांना, त्यातल्या माणसांना परस्परांशी जोडण्याचं, त्यांच्याशी जोडून घेण्याचं हेमंतजींचे कौशल्य स्तिमित करणारे आहे.

या माणसाला अनेक विषयांत इतकी गती कशी असू शकते, याचं मला नेहमीच आश्चर्य वाटत आलं आहे.
हेमंतजींशी अगोदर असणार्‍या ओळखीचे रुपांतर एका अनवट प्रसंगामुळे मैत्रीत झाले. मग हळुहळु त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू समोर आले. पत्रकारिता क्षेत्रात येण्यापूर्वीच त्यानी साकल्याने विचार व अभ्यास केला. वेब- पोर्टलवर बातम्या देण्याचा रत्नागिरीकरांसाठी नाविन्यपूर्ण प्रयोग त्यानी 8 वर्षापासून राबवला आणि पुर्वतयारीमुळे तो यशस्वीही झाला. पत्रकारितेत जे जे आधुनिक, अभिनव आहे त्याचा अंगीकार करत रत्नागिरी खबरदारचा विस्तार देशाबाहेर केला. सोशल मीडियावर बातमीदारीची वेगवेगळी कवाडे त्यानी उघडली. विविध माध्यमातून बातमी लोकांसमोर घेऊन जाण्याचा प्रयत्न विलक्षण यशस्वी होताना दिसत आहे.
सामाजिक क्षेत्रात काम करत असताना फक्त मदत करण्याचा उथळपणा न दाखवता समोरच्या व्यक्तीची अडचण समजून घेऊन मदतीसह उपायही हेमंतजीनी शोधण्याचा प्रयत्न केला. कित्येक गरजूंना वेळेवर आणि गरजेनुसार मदत केल्यामुळे अनेकजण संकट मुक्त झाले आहेत. एखाद्याच्या मदतीसाठी आवाहन केले तर हेमंतजींच्या पारदर्शक व्यक्तिमत्त्वामुळे हजारो रत्नागिरीकरांनी त्यांना प्रतिसाद दिला आहे.
उद्योग- व्यापारात सतत काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याकडे त्यांचा कल असतो. व्यवसाय पारंपरिक पद्धतीने न करता त्याचे स्वरूप बदलले तर हमखास यश मिळते हेही त्यानी सिद्ध केले आहे. कोरोनाकाळात व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेच शिवाय माॅलसंस्कृतीमुळे ग्राहक दुरावण्याची शक्यता असताना रत्नागिरीतील व्यापारी महासंघाची सर्व टिम सोबत घेऊन अभिनव तसेच धाडसी योजना राबविली. तब्बल तीन महिने चाललेली बक्षीस योजना एकवाक्यता आणि विश्वासार्हता ठेवत यशस्वी करुन दाखवण्याची हातोटी त्यांनी दाखवली. या अनोख्या प्रयोगामुळे ग्राहक स्थानिक बाजारपेठेला परत एकदा कायमस्वरुपी जोडण्याचे यश व्यापारी महासंघ तसेच हेमंतजींच्या कल्पक मोहिमेमुळे प्रत्यक्षात उतरलेले दिसून आले.
मुर्ती कार्यशाळेत सुबक गणेशमुर्ती बनवणारे, अनेक कलांमध्ये व्यासंग असणारे, क्रिकेटच्या मैदानात बिनधास्त फटकेबाजी करणारे, अमोघ वक्तृत्वाचे वरदान मिळाल्याने निवेदन कौशल्याच्या बळावर लोकांना तीन- तीन तास खुर्चीवर खिळवून ठेवणारे, अनेक क्षेत्रात लीलया वावर असणारे, कोणत्याही कामाला योग्य तो न्याय देणारे हेमंतजी त्यांच्या अष्टपैलु व्यक्तिमत्त्वामुळे रत्नागिरीकरांना आपलेसे वाटतात. काम करत असलेल्या क्षेत्राचा मूलभूत विचार, सहकाऱ्यांशी उत्तम समन्वय, नवनवीन संकल्पना राबवण्याची उर्मी, सकारात्मक दृष्टिकोन यामुळे हेमंतजी सतत यशस्वी होताना दिसत आहेत. माझ्यासह सर्वांना भावणार्‍या अष्टपैलु हेमंतजींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!
– आनंद तापेकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!