क्रीडा व मनोरंजन

शिक्षण विभाग आयोजित समूह नृत्यांमध्ये आगरनरळ केंद्राने बहारदार व लक्षवेधी आदिवासी नृत्य सादर करुन पटकावला द्वितीय क्रमांक

Spread the love

संतोष पवार/जाकादेवी

-रत्नागिरी तालुक्यातील कवी केशवसुत मालगुंड येथील स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या लोकधारेवर आधारित समूह नृत्यामध्ये आगरनरळ केंद्रातील शिक्षकांनी आकर्षक वेशभूषेसह साकारलेल्या बहारदार आदिवासी नृत्याला साहित्यप्रेमींसह रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

या नृत्याने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला.
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक येथे रत्नागिरी तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग व कवी केशवसुत स्मारक समिती यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या लोकधारेवर आयोजित समूह नृत्य प्रकारामध्ये आगरनरळ केंद्राने आदिवासी नृत्य सादर करून तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावल्याने या केंद्राचे संपूर्ण तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
२७ फेब्रुवारी हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांचा जयंतीदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी कविवर्य केशवसुत स्मारकामध्ये अनेक भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या सत्रात रत्नागिरी तालुक्यातील सुमारे २० केंद्रांनी महाराष्ट्राच्या लोकधारेवर आधारित मनोवेधक समूह नृत्य सादर केली. रत्नागिरी तालुक्यातून अनेक केंद्राने या स्पर्धेमध्ये अतिशय उत्साहाने सहभाग घेतला.भारतीय संस्कृती, पारंपारिक सण, उत्सव, पोवाडे , महापुरुषांची गौरव गाथा अशा अनेक विषयांवर वैविध्यपूर्ण नृत्य सादर केली.शिक्षकांची समुह नृत्य- पाहण्यासाठी साहित्यप्रेमींसह रसिक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.आगरनरळ केंद्राने आदिवासी नृत्याचा आविष्कार सादर करुन उपस्थित प्रेक्षकांची मनं वेधून घेत या आदिवासी नृत्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. समूह नृत्य सादरीकरणासाठी आगरनरळ केंद्राच्या एकजुटीचे दर्शन अनेकांना पाहायला मिळाले.या नृत्य प्रकारामध्ये शिक्षक कलाकारांनी आपली कला प्रदर्शित केली.यामध्ये प्रकाश पवार, राजीव दर्डी, संदीप शितप, सुरेश सुर्वे, जितेंद्र लोगडे, एकनाथ महाकाळ,विराज कोवळे, सुभाष तांबे, सुहास पवार,मुग्धा गार्डी,समिक्षा पवार, महादेवी शिंदे, कल्पना दडस, सुनयना कांबळे, सायली वासावे,आदींचा समावेश होता. नृत्यासाठी दिग्दर्शक म्हणून सचिन अजगोलकर यांचे मार्गदर्शन मोलाचे लाभले. आगरनरळ केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश कळंबटे यांची शिक्षकांना प्रेरणा मिळाली.या सर्व कलाकारांना रत्नागिरी पंचायत समिती शिक्षण विभाग व कवी केशवसुत स्मारक समिती यांच्यावतीने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने व गजानन उर्फ आबा पाटील यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!