ताज्या घडामोडी

मास परळ श्री मानकरी ठरला सागर कातुर्डे -जिल्हा स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करून दीपक चौहान यांनी दिली मनीष आडविलकरला अनोखी गुरूदक्षिणा

Spread the love

सागरने पटकावली बुलेट तर फिटनेसच्या यतीश ठाकरेला आयफोन

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई : “मास परळ श्री”चे दिमाखदार आयोजन पाहिल्यानंतर प्रत्येक क्रीडाप्रेमीच्या मुखात एकच वाक्य होतं, शरीरसौष्ठवाच्या इतिहासात असा दिवस या आधी उगवलाच नव्हता. “मास परळ श्री 2022” या जिल्हा पातळीवरील स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसे अभूतपूर्व आयोजन आणि मुंबई शरीरसौष्ठवाची श्रीमंती दाखविणारे पीळदार ग्लॅमर पाहून सारेच थक्क झाले. एकापेक्षा एक सरस असलेल्या स्पर्धेत भारत श्री विजेत्या तळवलकर्स जिमच्या सागर कातुर्डेने आपल्या लौकिकास कामगिरी करीत “मास परळ श्री” स्पर्धेचे जेतेपद पटकावले. पुरूषांच्या फिजीक फिटनेस दोन गटांमध्ये अंकित चव्हाण आणि यतीश ठाकरे यांनी बाजी मारली तर अंगावर शहारे आणणाऱ्या दिव्यांगाच्या गटात महबूब शेख पहिला आला.

शिष्याने दिली गुरूला भव्य स्पर्धा आयोजित करून दक्षिणा

चार वर्षांपूर्वी परळच्या शरीरसौष्ठवपटूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू मनीष आडविलकरने सुरू केलेल्या परळ श्रीने यंदा आयोजनाचे शिखरच गाठले. गेली दोन वर्षे करोनामुळे एकही भव्य दिव्य स्पर्धा आयोजित करता आली नव्हती. पण यावेळी काहीही झाले तरी परळ श्रीचे आयोजन करायचेच, या ध्येयाने पछाडलेल्या मनीषने तीन हजार आसनक्षमतेच्या षण्मुखानंद सभागृहात आयोजन करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आपण आज जे काही आहोत, ते फक्त आणि फक्त शरीरसौष्ठवामुळेच. आपण या खेळाचे खूप देणं लागतो, या प्रामाणिक भावनेपोटी स्थानिक खेळाडूंवर पुरस्कारांचा वर्षाव करण्यासाठी मनीषने परळ श्री सुरू केली होती तर मनीष आडविलकर यांना गुरूदक्षिणा देण्यासाठी दीपक चौहान यांनी यंदाच्या परळ श्रीच्या भव्य दिव्य आयोजनाची सर्व जबाबदारी स्वत:च्या स्टार कनेक्ट एंटरटेनमेंट कंपनीच्या माध्यमातून उचलली. 140 किलो वजनाच्या दीपक चौहान यांना फिटनेसचे धडे देत मनीषने 90 किलोंवर आणले होते. त्यामुळे दीपक यांनी यापुढे होणारी परळ श्री राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाची असेल, असे वचन मनीषला दिले. त्यांनी ते वचन पूर्ण केले. आजची स्पर्धा पाहिल्यावर मनीष आणि दीपकचे खेळाडू, संघटक आणि क्रीडाप्रेमींनी भरभरून कौतुक केले आणि अशाच आयोजनासाठी शुभेच्छाही दिल्या.

त्यामुळे यंदाच्या परळ श्री मध्ये मनीषचे शरीरसौष्ठवप्रेम आणि दीपक यांची गुरूदक्षिणा पाहून सारेच भारावले. विजेत्याला अडीच लाखांची रॉयल एनफिल्ड, चार गटातील खेळाडूंना सहा लाखांची रोख बक्षीसे आणि स्पर्धा स्थानिक असूनही षण्मुखानंद सभागृहात केलेले आयोजन डोळ्याचे पारणे फेडलेलेच ठरले. स्पर्धेच्या चार गटात अडीचशे पेक्षा अधिक स्पर्धकांच्या सहभागामुळे धारावीच्या क्रीडा संकुलात आयोजित प्राथमिक चाचणीतून 70 खेळाडूंची निवड करण्यासाठी पंचांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली. शरीरसौष्ठवाच्या मुख्य गटात 20 खेळाडूंना रोख पुरस्कार असल्यामुळे 30 खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती तर फिजीक फिटनेसच्या दोन्ही गटांसाठी 35 खेळाडू निश्चित करण्यात आले होते. दिव्यांगाच्या गटातही अनपेक्षितपणे 14 खेळाडू सहभागी झाले होते. त्यापैकी 6 खेळाडू अंतिम फेरीसाठी निवडले गेले.

सागर कातुर्डेच्या सौष्ठवाला तोड नाही

गेल्या महिन्यात भारत श्रीचा बहुमान पटकावणाऱया सागर कातुर्डेच्या तोडीचा एकही खेळाडू स्पर्धेत नव्हता. मात्र मुंबईच्या शरीरसौष्ठव जगताची श्रीमंती दाखविणारी सुजन पिळणकर, भास्कर जाधव, चेतन नाईक, प्रतिक पांचाळ, रोहन गुरव, सुशांत रांजणकर, गणेश पेडामकर असे अनेक खेळाडू या स्पर्धेत उतरले होते. फुल फार्मात असलेला सागर जेतेपद जिंकल्यावर आयोजक मनीष आडविलकर ,स्टार कनेक्टचे सर्वेसर्वा दीपक चौहान, विजेत्याला रॉयल एनफिल्ड देणारे दिनेश पुजारी, मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर ,सरचिटणीस राजेश सावंत, सुनील शेगडे आणि प्रभाकर कदम यांच्या उपस्थितीत बुलेटवर स्वार झाला. फिजीकल फिटनेसच्या गटात चॅम्पियन ठरलेल्या यतीश ठाकरेला अभिनेता साहिल खानने आयफोन प्रो हा महागडा मोबाईल पुरस्कार म्हणून दिला.

दिव्यांगांच्या शरीरसौष्ठवाला प्रेक्षकांची मानवंदना

दिव्यांग शरीरसौष्ठवपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित गटात सहा खेळाडूंचा सहभाग होता. त्यांचे स्टेजवर आगमन होताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात स्वागत केले. दिव्यांगावर मात करून त्या सहाही खेळाडूंनी कमावलेले शरीर पाहून उपस्थित भारावले. या गटात महबूब शेख अव्वल आला. रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या देव मिश्राने व्यक्त केलेल्या भावना ऐकून सारेच हेलावले. अशा या जिद्दी खेळाडूंच्या प्रयत्नांना उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून मानवंदना केली.

मास परळ श्री 2022 चा निकाल

टॉप टेन शरीरसौष्ठव स्पर्धा – 1. सागर कातुर्डे (तळवलकर्स जिम), 2. सुजन पिळणकर (एस.पी. फिटनेस), 3.चेतन नाईक (मसल पॉवर), 4. निलेश दगडे (परब फिटनेस), 5. भास्कर कांबळी (ग्रेस जिम), 6. रोहन गुरव (बाल मित्र जिम), 7. प्रतिक पांचाळ (परब फिटनेस), 8. सुशांत रांजणकर (आर.एम.भट जिम), 9. आशिष लोखंडे (रिसेट जिम), 10. गणेश पेडामकर (एस.एफ. फिटनेस).

टॉप टेन मेन्स फिजीक (165 सेमी)- 1. अंकित चव्हाण (रिगस जिम), 2. अजयकुमार गुप्ता (मुंजा फिटनेस), 3. करण लाड (बिलीव्ह जिम), 4. अश्विन तुपे (महाराजा जिम), 5. मॉण्टु मौर्य (रीड कल्चर जिम), 6.निलेश गिरी (आर.के. फिटनेस), 7. अजय भोईर (द मसल युनिट), 8. डेन्झिल डिसोझा ( डेन फिटनेस), 9. अनिल केळकर ( सर्वेश्वर जिम), 10. अर्जुन बांदिवडेकर ( स्वेट इट आऊट).

टॉप टेन मेन्स फिजीक (165 सेमी. वरील)-1. यतीश ठाकरे ( फिटनेस एम्पायर), 2. अली अब्बास शौकती (प्रबोधनकार), 3. सागर मकवाना ( 19 अवर्स जिम). 4. गौरव यादव ( प्रबोधनकार), 5. प्रथमेश बागायतकर ( परब फिटनेस), 6. अनिल शिलम (ट्रान्सफॉर्मर जिम), 7. जगदीश कदम (बळीराम जिम), 8. प्रसाद मांगले (फिटनेस फॅक्टरी), 9. मितेश ठक्कर (माँसाहेब जिम), 10. मारी शामू (स्लीम ऍण्ड टोन).

टॉप सिक्स दिव्यांग शरीरसौष्ठव स्पर्धा

1. महबूब शेख, 2. मयूर देवरे , 3. प्रथमेश भोसले, 4. सचिन गिरी, 5. प्रतिक मोहिते, 6. देव मिश्रा).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!