ताज्या घडामोडी

सुगंध पेरणारा संपादक: श्री बालासाहेब फड

Spread the love

काही माणसं धान्य पेरतात आणि नंतर ते धान्यच कापतात, परंतु काही माणसं सुगंध पेरतात आणि त्यानंतर ते संपूर्ण आसमंत सुगंधित करतात आणि मग सर्वत्र सुगंधच सुगंध दरवळायला लागतो. अगदी असेच व्यक्तिमत्व म्हणजे परळी वैजनाथ जि.बीड येथून प्रकाशित होणारे दै.सोमेश्वर साथी या दैनिकाचे संपादक श्री बालासाहेब फड ! श्री फड हे मागील सत्तावीस वर्षांपासून अत्यंत खडतर परिस्थितीत आणि अनेक आव्हानांना धैर्याने तोंड देत सातत्याने “सा.परळी संदेश” आणि “दै.सोमेश्वर साथी” मोठ्या नेटाने चालवत आहेत. मौजे कन्हेरवाडी ता.परळी येथील रहिवाशी असलेले श्री बालासाहेब फड हे दै.सोमेश्वर साथी चालविण्यापूर्वी विविध सामाजिक संघटनात कार्यरत होते. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना लेखन आणि वाचनाची आवड असल्यामुळे त्यांना सातत्याने काहीतरी वेगळे करून दाखवण्याची जिद्द होती. नव्वदीच्या दशकांत श्री फड यांना आपलं एखादं दैनिक किंवा साप्ताहिक असावं असं वाटायला लागलं. त्या काळात वर्तमानपत्रांत किंवा साप्ताहिकात बातमी छापणे, एखादा फोटो येणे हा सर्वत्र चर्चेचा विषय व्हायचा आणि विशेष म्हणजे एखादा लेख किंवा अग्रलेख वर्तमानपत्रांत छापून येणे म्हणजे लेखकाच्या विद्वत्तेवर जणू तो शिक्काच असायचा ! बोटावर मोजण्या एवढे वर्तमानपत्रे आणि निवडक लिहिणारी माणसे हेच वर्तमानपत्रांचे विश्व होते. त्या काळात तालुक्यावरील एखाद्या बातमीदाराला किंवा वार्ताहर व्यक्तीला लोक विशेष सन्मान द्यायचे आणि तो आज पण आहे; मात्र आज संख्या भरपूर वाढली आहे, ही आनंदाची बाब आहे. ही सर्व परिस्थिती श्री फड यांनी हेरली आणि १९९५ साली “साप्ताहिक परळी संदेश” सुरु केले. त्याकाळात स्व.लोकेनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची साऊली म्हणून कार्यरत असलेले श्री धनंजय मुंडे साहेबांच्या हस्ते सा.परळी संदेश सुरु झाले आणि नंतर श्री बालासाहेब फड यांनी मागे वळून पहिलेच नाही.
आपल्या साप्ताहिकातून त्यांनी स्थानीक तसेच राज्य पातळीवरील बातम्या आणि काही लोकांचे लेखन प्रकाशित करायला सुरुवात केली. त्याचवेळी परळीमध्ये आणखी काही साप्ताहिकं सुरु झाली होती, मात्र श्री फड यांच्या सा.परळी संदेश ने जनमानसांत आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्याच काळांत स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले. हा परळी आणि पंचक्रोशीसाठी सुवर्ण काळ म्हणावा लागेल. त्या काळात श्री फड यांनी मुंडे साहेब आणि त्यांची कार्य शैली याविषयी जनमानसामध्ये लिहिण्याचा सुंदर प्रयत्न केल्याचे काही जुनी जाणती माणसं सांगत असतात. मात्र त्यांचे साप्ताहिक कोणत्याही राजकीय पक्षाशी कधीही बांधील राहिलेलं नव्हतं हे ही तेवढंच महत्वाचं आहे.
जवळपास वीस ते बावीस वर्षे सा.परळी संदेशचे काम करत असल्यामुळे श्री फड यांचा महाराष्ट्रभर मित्रपरिवार झाला. श्री फड यांच्या सोबत जवळपास मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात पत्रकार आणि संपादक मित्रांची मोठी फळी निर्माण झाली. दिवसेंदिवस दृकश्राव्य माध्यमांमध्ये क्रांती घडून येत होती. तेंव्हा वर्तमानपत्रांची संख्या अगदी बोटांवर मोजण्या एवढी होती. त्याच काळात श्री फड यांना मराठवाड्यातील मित्रपरिवाराकडून साप्ताहिकाबरोबरच एखादं दैनिक सुरु करण्याची मागणी होऊ लागली आणि श्री फड यांनाही आपण एखादं दैनिक सुरु करू शकतो याची खात्री पटायला लागली. याचाच परिपाक म्हणून त्यांनी २०१५ साली दै.सोमेश्वर साथी हे दैनिक सुरु केले. श्री फड यांना साप्ताहिक चालवायचा अनुभव गाठीशी असल्याकारणाने दैनिक चालवायला एवढी कसरत करावी लागली नाही. सुरुवातीला थोडी आव्हाने होती परंतु हळूहळू ती आव्हाने त्यांनी लीलया पेलली आणि बघता बघता दै.सोमेश्वर साथीने सात वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला !
आज घडीला श्री बालासाहेब फड संपादक असलेल्या दै.सोमेश्वर साथी दैनिकाचे लाखो वाचक असून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर या दैनिकाचे नाव सर्वपरीचीत आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्हे आणि तालुक्यात दै.सोमेश्वर साथीचे वार्ताहर व बातमीदार असून श्री फड हे सर्वच क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य देतात. त्यांच्या दैनिकात महाराष्ट्रातील अनेक नामवंत लेखक स्तंभ लेखन करतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे विविध मंत्री सुद्धा दै.सोमेश्वर साथी मध्ये लिहायला उत्सुक असतात. अनेक वर्तमानपत्रं अग्रलेख किंवा वैचारिक लेखनास प्राधान्य देत नाहीत, परंतु श्री बालासाहेब फड यांचा विचारवंत-चिंतकाचा पिंड असल्यामुळे ते आवर्जून आपल्या दैनिकांत अग्रलेखाला प्राधान्य देतात. या दैनिकाचा महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात वाचक वर्ग असून या दैनिकात मुंबई, ठाणे, पुणे, गडचिरोली, नागपूर, जळगाव, जालना, औरंगाबाद, नांदेड, किनवट अशा सर्वच भागातील नवलेखक विविध प्रासंगिक विषयांवर आपले चिंतन मांडत असतात. सर्वच नवोदित लेखकांना श्री फड यांनी दै.सोमेश्वर साथीच्या माध्यमातून उत्तम आणि दर्जेदार व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. त्यामुळे नवीन लेखकांना लिहायला हत्तीचे बळ मिळते आहे.
आज श्री बालासाहेब फड यांचा वाढदिवस असून या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम वाचक, हितचिंतक, स्तंभ लेखक, वार्ताहर, बातमीदार आणि संपादक मित्र परिवाराच्या वतीने श्री फड यांना वाढदिवसानिमित्त अभिष्ठचिंतन ! आज श्री फड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना दीर्घायुष्य लाभो त्याच बरोबर वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी निर्भीडपणे आणि कुणाच्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी पडून कार्य न करता निर्भीडपणे श्री बाळशास्त्री जांभेकरांचा वसा आणि वारसा चालवावा ! तसेच नवोदित लेखकांना आत्ता जसे प्राध्यान्य देत आहेत त्याचप्रमाणे संधी देऊन त्यांना लिहिते करण्याचे पुण्यकर्म करत राहावे ! श्री सोमेश्वर साथी चालवण्यासाठी त्यांचे तमाम वाचक, लेखक, हितचिंतक त्यांच्या सोबत असून त्यांना दीर्घायूष्यासाठी आम्ही अभिष्टचिंतन करत आहोत ! हे कार्य करणे म्हणजेच सुगंध पेरणे होय ! त्यांच्या हातून उत्तरोत्तर आणखी सुगंध पेरणी होत राहो आणि अक्षर-वाङ्मय नित्य नित्य बहरत राहो ! असे हे सुंगंध पेरणारे आमचे संपादक मित्र श्री बालासाहेब फड यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि हा शब्द प्रपंच इथेच थांबवतो ! जय हिंद ! जय भारत ! जय महाराष्ट्र !
प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068
(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!