क्रीडा व मनोरंजन

जसलोक हॉस्पिटल उपांत्य फेरीत   दिलीप करंगुटकर स्मृती क्रिकेट

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई, क्रिकेटप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना जसलोक हॉस्पिटलने कस्तुरबा हॉस्पिटलचा ६ विकेटने पराभव केला. सलामीवीर श्रीकांत दुधवडकर, अनिकेत खुटे व अष्टपैलू सचिन तोडणकर यांच्या धडाकेबाज खेळामुळे जसलोक हॉस्पिटलने क्रॉस मैदानात विजय साकारला. आक्रमक फलंदाज भूषण तांबे, दीपक लोहारे, डॉ. परमेश्वर मुंढे आदी खेळाडूंनी छान खेळ करूनही कस्तुरबा हॉस्पिटल संघाला पराभवास सामोरे जावे लागले. यावेळी जेजे हॉस्पिटलचे माजी कप्तान व अष्टपैलू क्रिकेटपटू भरत पेडणेकर यांचा विशेष गौरव माजी क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

भूषण तांबे (२७ चेंडूत २८ धावा), दीपक लोहारे (२१ चेंडूत २२ धावा), रोहन ख्रिस्तिअन (१६ चेंडूत १८ धावा), सुनील शिंदे (११ चेंडूत १८ धावा) यांनी दमदार फलंदाजी करूनही कस्तुरबा हॉस्पिटल क्रिकेट संघाने २० षटकात ८ बाद ११९ धावसंख्येपर्यंतच मजल मारली. सचिन तोडणकरने २४ धावांत ३ बळी घेतले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना सलामीवीर श्रीकांत दुधवडकर (१४ चेंडूत २५ धावा, ४ चौकार व १ षटकार), अनिकेत खुटे (२३ चेंडूत २८ धावा, ३ चौकार), सचिन तोडणकर (२१ चेंडूत ३० धावा, ५ चौकार) आदी जसलोक हॉस्पिटलच्या आघाडी फळीने उत्तम धावगती राखली. परिणामी जसलोक हॉस्पिटलने १४ षटकात ४ बाद १२० अशी विजयी धावसंख्या रचली. डॉ. परमेश्वर मुंढे व सुनील शिंदे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित स्पर्धेमधील उपांत्यपूर्व लढतीत सचिन तोडणकरने सामनावीर तर भूषण तांबेने कस्तुरबा हॉस्पिटल संघाचा उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकाविला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!