ताज्या घडामोडी

सेव्हन हिल्स हॉस्पिटल अंतिम फेरीत   दिलीप करंगुटकर स्मृती क्रिकेट

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई, सलामीवीर लव यादव (३९ चेंडूत ४३ धावा) व अमोल तोरस्कर (१८ चेंडूत २१ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे सेव्हन हिल्स हॉस्पिटल क्रिकेट संघाने बलाढ्य ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचे आव्हान ५ विकेट राखून संपुष्टात आणले आणि क्रिकेटप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. कप्तान प्रदीप क्षीरसागरची अर्धशतकासह अष्टपैलू खेळी मात्र ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा पराभव टाळू शकली नाही. यावेळी आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धेत शतकासह विक्रमी धावसंख्या नोंदविणारा जेजे हॉस्पिटलचा धडाकेबाज फलंदाज अनिल शेलार, फलंदाजीत सातत्य राखणारा जेजे हॉस्पिटलचा कर्णधार नरेश शिवतरकर, हिंदुजा हॉस्पिटलचा क्रिकेटपटू शशिकांत वैद्य व जेजे हॉस्पिटलचा आक्रमक सलामीवीर तसेच अष्टपैलू सुभाष शिवगण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

नाणेफेक जिंकून ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर प्रदीप क्षीरसागरच्या (५५ चेंडूत ५२ धावा, ४ चौकार) झंझावाती अर्धशतकाला रोहन महाडिकने ( १९ चेंडूत २९ धावा) उत्तम साथ दिल्यामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने २० षटकात ६ बाद १२५ धावांची मजल मारली. सुशांत गुरवने २ बळी घेतले. सलामीवीर लव यादव (४३ धावा) व अमोल तोरस्कर (२१ धावा) यांच्या दुसऱ्या विकेटसाठी ४२ धावांच्या भागीदारीमुळे सेव्हन हिल्स हॉस्पिटलने १९ व्या षटकाला विजयी धावसंख्येला ५ बाद १२६ धावा अशी गवसणी घातली. फिरकी गोलंदाज प्रदीप क्षीरसागरने २ बळी घेतले. लव यादवने सामनावीर तर अष्टपैलू प्रदीप क्षीरसागरने ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलच्या उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीकारला. अंतिम फेरीचा सामना क्रिकेटप्रेमी गोविंदराव मोहिते, दीपक पाटील, अभिजित घोष आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ६ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वा. क्रॉस मैदान येथे होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!