क्रीडा व मनोरंजन

सेव्हन हिल्स हॉस्पिटल विजेता दिलीप करंगुटकर स्मृती क्रिकेट स्पर्धा

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

सुशांत गुरव व कृपाल पटेलच्या अष्टपैलू कामगिरीमुळे सेव्हन हिल्स हॉस्पिटलने बलाढ्य जसलोक हॉस्पिटलचा ६ विकेट राखून पराभव केला आणि क्रिकेटप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. प्रारंभ दमदार होऊनही जसलोक हॉस्पिटल संघाला आव्हानात्मक मोठी धावसंख्या उभारता न आल्यामुळे अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आयडियल ग्रुप व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित स्पर्धेमध्ये सुशांत गुरवने सर्वोत्तम क्रिकेटपटूचा, सचिन तोडणकरने उत्कृष्ट फलंदाजाचा तर सुभाष शिवगणने उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार आरएमएमएसचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, क्रिकेटप्रेमी राजेश तळेकर, संघटक डॉ. स्वप्नील निसाळ, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या  प्रमुख  उपस्थितीत स्विकारला.

क्रॉस मैदानात सेव्हन हिल्स हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून जसलोक हॉस्पिटल संघाला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर सचिन दुधवडकर (२४ चेंडूत २३ धावा, २ चौकार व १ षटकार) आणि श्रीकांत दुधवडकर (१२ चेंडूत १५ धावा, २ चौकार) यांनी पहिल्या विकेटसाठी ३४ धावांची भागीदारी करूनही जसलोक हॉस्पिटलने २० षटकात ९ बाद १०१ धावांपर्यंतच मजल मारली. अष्टपैलू  सुशांत गुरव (१० धावांत ४ बळी), कृपाल पटेल (१९ धावांत २ बळी), मनोज यादव (२० धावांत २ बळी) आदी सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना मोठी खेळी करू दिली नाही.

विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना सलामीवीर कृपाल पटेल (४५ चेंडूत ३१ धावा, २ चौकार) व सुशांत गुरव (३२ चेंडूत नाबाद ४५ धावा, २ षटकार) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. परिणामी सेव्हन हिल्स हॉस्पिटल संघाने १८ व्या षटकाला ४ बाद १०३ धावा फटकावून अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केला. प्रवीण मोरजकरने २३ धावांत २ बळी घेतले. स्पर्धेमध्ये जेजे हॉस्पिटल व ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघांनी उपांत्य उपविजेतेपद पटकाविले. सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे परिसर व कौंटी क्रिकेट क्लबचे स्पर्धेला सहकार्य लाभले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!