ताज्या घडामोडी

येथील जयंत प्रिमियर कबड्डी लिगच्या पाचव्या दिवशी स्व.जगदीशआप्पा पाटील रायडर्स (कामेरी) विरुध्द आदिती पॅंथर्स (ओझर्डे) या संघातील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा

Spread the love

इस्लामपूर दि.२८ प्रतिनिधी
येथील जयंत प्रिमियर कबड्डी लिगच्या पाचव्या दिवशी स्व.जगदीशआप्पा पाटील रायडर्स (कामेरी) विरुध्द आदिती पॅंथर्स (ओझर्डे) या संघातील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. रायडर्सचा चढाईपटू वैभव वाघमोडे (कासेगाव) याने शेवटच्या दोन मिनिटात ७ गुणांची कमाई केल्याने रायडर्सने ६ गुणांनी आदितीला मात दिली. लीगच्या दुसऱ्या वर्षात स्व.जगदीशआप्पा पाटील रायडर्स हा विजेता,तर आदिती पॅंथर्स हा उप विजेता संघ ठरला. जय हनुमान पतसंस्था टायगर्स (इस्लामपूर)ने तिसरा,तर राजाराम बापू ईगल्स (कासेगाव) हा चौथा क्रमांक पटकाविला. पाचव्या दिवशी सायंकाळी ७ पासून मैदान क्रीडाप्रेमींनी खचाखच भरले होते. या दिवशीचे चारही सामने चित्तथरारक आणि रोमहर्षक झाले. यावेळी आकर्षक आतिषबाजी ही करण्यात आली.ना.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत स्पोर्ट्सने सलग दुसऱ्या वर्षी या लिगचे आयोजन केले होते.
राज्याचे जलसंपदा मंत्री,जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या हस्ते चार विजेत्या संघासह उत्कृष्ठ खेळाडूंना बक्षिस वितरण केले. लीगच्या माध्यमातून तालुक्यातील खेळाडूंना ‘प्रो कबड्डी’सारखा अनुभव मिळाल्याने भविष्यात अनेक खेळाडू चमकदार कामगिरी करतील. क्रिकेट व व्हॉलीबॉलच्याही लिग घेवून खेळाडूंना प्रोत्साहन देवू,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लिगचे मुख्य संयोजक,राष्ट्रीय कबड्डीपटू खंडेराव जाधव (नाना) यांनी स्पर्धेचे अतिशय नेटके संयोजन केल्याने त्यांचे कौतुक केले. माजी नगरसेवक खंडेराव जाधव (नाना) यांनी सलग दुसऱ्या वर्षी लिग यशस्वी करण्यात योगदान केलेल्या सर्वाचे आभार मानले.
पाचव्या दिवशी पहिला सामना रायडर्स कामेरी विरुध्द पॅंथर्स ओझर्डे यांच्यामध्ये झाला. रायडर्सने हा सामना १० गुणांनी जिंकून अंतिम फेरी गाठली. दुसरा सामना टायगर्स इस्लामपूर विरुध्द ईगल्स कासेगाव यांच्यात अगदी अटीतटीचा झाला. मध्यंतरी दोन्ही संघांचे ८-८ गुण होते. टायगर्सने शेवटी हा सामना २ गुणांनी जिंकला. ईगल्सच्या कन्हैया बोडरे (कासेगाव), सईद ढगे (वाळवा),विश्वजित चव्हाण (शिगाव) यांची झुंज निष्फळ ठरली. टायगर्स इस्लामपूर विरुध्द पॅंथर्स ओझर्डे यांच्यातील तिसरा सामना क्रीडा प्रेमींच्या काळजाचा ठोका चुकविणारा ठरला. हा सामना २२-२२ असा बरोबरीत सुटल्याने त्यांना ५-५ चढाई देण्यात आल्या. त्यामध्ये पॅंथर्सने ४ गुणांनी हा सामना जिंकून अंतिम फेरी गाठली. टायगर्सच्या अविनाश पाटील (कासेगाव),ओम भारते, ओंकार सपकाळ यांनी चमकदार खेळ केला.
अंतिम सामन्यात एकमेकाला भिडलेले रायडर्स (कामेरी) व पॅंथर्स (ओझर्डे) हे दोन्ही स्पर्धेतील तुल्यबळ संघ होते. पहिल्यापासून सामना अत्यंत चुरशीने सुरू होता. रायडर्स (कामेरी)चे चढाईपटू वैभव (वाघमोडे),शुभम पाटील (इस्लामपूर), क्षेत्ररक्षक दत्ता वगरे(कासेगाव),तर आदित्य (ओझर्डे)चे चढाईपटू अभिजित कांबळे (इस्लामपूर), सूरज माने (कासेगाव),अमित महाडिक (कासेगाव) व त्यांचे सहकारी एकमेकास निकराची झुंज देत होते. शेवटच्या २ मिनिटात ओझर्डे १५ गुण,कामेरी १४ गुण होते. कामेरी १ गुणाने पिछाडीवर होते. वैभव वाघमोडेने पहिल्या चढाईत ३ गडी बाद करून सुपर रेड केली आणि दुसऱ्या चढाईत २ गडी बाद करून लोण दिला. त्याच्या ७ गुणांच्या कमाई ने कामेरी ६ गुणांनी विजयी ठरला.
या स्पर्धेत रायडर्सचा वैभव वाघमोडे (कासेगाव) हा अष्ठपैलू खेळाडू,रायडर्सचाच दत्ता वगरे (कासेगाव) हा उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक,तर
आदितीचा अभिजित कांबळे (इस्लामपूर) हा उत्कृष्ठ चढाईपटू ठरला.
माजी नगराध्यक्ष अँड.चिमणभाऊ डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील,प्रांताधिकारी डॉ.संपतराव खिलारी, तहसिल दार प्रदीप उबाळे,पै.शिवाजी साळुंखे,पै.राजाराम माळी,देवराज पाटील, रणजित पाटील,पृथ्वीराज पाटील,रवी पाटील,पृथ्वी नाईक,विश्वप्रताप नाईक,अतुल लाहिगडे,सागर पाटील,संजय जाधव,अरुण भाऊ कांबळे,राष्ट्रीय खेळाडू संदीप कदम, सुनील कुंभार,रोझा किणीकर,रुपाली जाधव, जयश्री पाटील,शुभांगी शेळके यांच्यासह क्रीडा प्रेमींनी पाचव्या दिवशीच्या खेळाचा मनमुराद आनंद लुटला.
आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने (इस्लामपूर),राष्ट्रीय कबड्डीपटू विकास पाटील (कामेरी) यांनी तांत्रिक मुद्द्यांचे निराकरण केले. जिल्हा कबड्डी असोसिसिएशनच्या सांगली,कामेरी,वाळवा,व ऐतवडे खुर्द येथील पंचांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. जयंत स्पोर्ट्सचे अध्यक्ष सागर जाधव, प्रशिक्षक विजय देसाई (सोन्याबापू),उमेश रासनकर,शिवाजी पाटील तसेच जयंत स्पोर्ट्सच्या खेळाडू व कार्यकर्त्यांनी स्पर्धेचे अतिशय नेटके संयोजन केले.इस्लामपूर (निनाईनगर) येथील जयंत स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या ‘जयंत प्रिमियर कबड्डी लिग’मध्ये प्रथम विजेत्या स्व. जगदीशआप्पा पाटील रायडर्स या संघास बक्षिस वितरण करताना ना.जयंतराव पाटील. समवेत मुख्य संयोजक खंडेराव जाधव, रणजित पाटील,सागर जाधव व मान्यवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!