आरोग्य व शिक्षण

छत्रपती शिवाजी महाराजांसोबत पराक्रम गाजवता न आलेल्या मराठवाड्याच्या लोकांनी, ती कसर मुक्ती संग्रामाच्या वेळी भरून काढली – पंडित किरण परळीकर

Spread the love

तळेगाव : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच, कायम दुर्लक्षित राहिलेला, संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा मराठवाड्याचा प्रदेश आहे.१९४७ ला भारत स्वतंत्र झाला.पण निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त व्हायला मराठवाड्याला मात्र आणखी वाट पाहावी लागली. स्वामी रामानंद तीर्थ आणि सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी, तसेच वल्लभ भाई पटेल यांच्या कणखर नेतृत्वाने १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाच्या रजाकारी अत्याचारातून मराठवाडा स्वतंत्र झाला .भारतात विलीन झाला. या मुक्तिसंग्रामात शेकडो ज्ञात अज्ञात सैनिकांनी आत्मार्पण केले. त्यांना अभिवादन करण्यासाठी व स्वामी रामानंद तीर्थ यांचे स्मरण करण्यासाठी १७ सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.

डॉ. लता ,विठ्ठल भरड आणि प्रभाकर कुलकर्णी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. १७ सप्टेंबर रोजी वानप्रस्थाश्रम येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास पंडित किरण परळीकर प्रमुख वक्ते म्हणून तर पंडित सुरेश साखळकर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले. याप्रसंगी बोलताना पंडित किरण परळीकर यांनी त्यांना आणि त्यांच्या पूर्वजांना या मुक्तीसंग्रामात आलेले हृदयद्रावक अनुभव कथन केले. त्याच सोबत या मुक्तिसंग्रामातून आणि मराठवाड्याच्या इतिहासातून आजच्या पिढीने काय शिकावे हेही विदित केले.

पंडित किरण परळीकर यांचे अनुभव ऐकताना प्रेक्षक अक्षरशः दिग्मूढ झाले होते.

किरण परळीकर यांचे अनुभव आणि त्यांचा या विषयीचा अभ्यास, हा पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार असून, त्यांनी त्याबाबत एक लेख मालिका सुरू करावी. तसं केल्यास त्या लेखमालिकेचे प्रकाशनाचे तसेच त्याचे पुस्तक स्वरूपाच्या प्रकाशनाची जबाबदारी स्वतःहून स्वीकारत असल्याचे साप्ताहिक अंबरचे संपादक पंडित सुरेश साखळकर यांनी सांगितले.

अत्यंत भारावून टाकणाऱ्या या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे प्रास्ताविक डॉ. लता  यांनी करताना, मराठवाड्याला स्वतंत्र होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला असून अनेक ज्ञात अज्ञात हुतात्म्यांच्या प्रयासाने मिळालेल्या या स्वातंत्र्याची जाण प्रत्येकाला असावी आणि नवीन पिढीला आपला इतिहास कळावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  नंदिनी टाले यांनी केले. विठ्ठल भरड यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. तर माधव रामदासी यांनी आभार मानले.

चहापान आणि प्रसाद घेऊन जान्हवी इखे हिच्या सुश्राव्य वंदे मातरमच्या सुरेलआळवणीने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे संयोजन क्षिप्रसाधन भरड ह्यांनी केले .तर कार्यक्रमाला उर्मिला छाजेड व सुषमा ईखे यांचे विशेष सहाय्य लाभले.

डॉ. नीता मुरुगकर, एल आय सी विकास अधिकारी गुणवंत मारापले, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकृष्ण पुरंदरे, ख्यातनाम गायक पंडित विनोदभुषण आल्पे, सतीश भोपळे आदी मान्यवर याप्रसंगी आवर्जून उपस्थित होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!