महाराष्ट्रसामाजिक

माझा काय गुन्हा..

लालपरीचे आंदोलकांना पत्र..

Spread the love

माझा काय गुन्हा.
                        लालपरीचे आंदोलकांना पत्र.

आवाज न्यूज : विशेष लेख, ८ सप्टेंबर.

प्रिय आंदोलक,
जळजळीत नमस्कार ,मी एस टी , मामाच्या गावाला जाताना तुला घेऊन जाणारी , तू माझ्या खिडकीतून पहिल्यांदा मामाचा गाव पहायचा , माझ्याच सोबत अनेक सासूरवासिन आणि माहेरवासिन ये जा करतात , पन्नासिक वर्षे झाली मी म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांची वारी घडवताना रात्रपाट एक करते . खेड्या पाड्यात आदळआपट करत गावाकडे येते , गावाकडली माणसे तालुक्याच्या गावाला घेऊन यायचे ती मीच , गावकोसाला काटकोनात गुर म्हशी ढोरातून रस्ता काढत मी २०२३ पर्यंत पोहोचली . पहिले गावात जायचे तेव्हा गावच पाटील सरपंच नारळाच्या दोन भांगा माझ्या दोन्ही बाजूला लावायची , टावेल टोपी करून डायवर कंडडाक्टर सजवले जायचे. तुमच्यातली मीच शहरात आणली आणि स्थिरावली देखील , तू तेव्हा लहान होतास , मी गावाकडे आले की तू धावत यायचा अन मला बघत रहायचा, तुझ्या शाळेतली बाई मास्तर जेव्हा माझ्यात निघायचे तेव्हा तू टाटा करायचा. ये गाडी आली का बघून यायला बाई तुलाच निवडायच्या, आज हि तुझ्या आईला ५० टक्के सवलत देऊन मीच भार वाहते, हात दाखवला की मीच उभी राहते, खाजगी गाड्या ना खेड्यात जातात ना कमी पैश्यात नेतात,म्हणून माझ आणि महाराष्ट्रच एक नात राहिलेल आहे . महाराष्ट्राची वाहिनी म्हणून एसटी. सुरक्षित आणि किफायती प्रवास सनवार आणि वारी सगळी मीच वाहत आले. आजवर रस्ते खराब असले तरी तुम्ही काही कमी केले नाही मात्र अलीकडच्या काळात तुमच तिकडे बिघडते आणि तुम्ही माझ्याच जवळ येता हे काही बरोबर नाही. तुमच्या मनगटात बळ असेल तर जिथून भेटणार तिथे धडका की मला जाळून काय मिळते, आरक्षण देणारे मंत्री संत्री त्यांच्यातर पुढे पुढे करता, परवा माझ्या दोन बहिणी शहागड मध्ये जाळल्या. तुझ्या पेकाटात दम आहे तर मंत्र्याच्या गाडी समोर उभा राहून दाखव, काहीही झाल की एसटीच दिसते, का सोप आहे ना, अरे राजा तू ज्या एस टी ला जाळतो काचा फोडतो ती तुमचीच आहे, तुमच्याच बापाची आणि तुमच्या मायांना ५० टक्क्यात प्रवास करणारी.

तुझी लाज आणि कीव वाटते , मर्द आहेस का तू , अरे पळपुटा आणि पुरता भित्रा आहेस, अगदी बुळगा, नमर्दा हिम्मत असेल तर जिथे आरक्षण अडकले ते तुला माहित नाही का, नेत्याचे चोचले चाटणारा तू , तिथे तर नेत्याला वाचवतो आणि इथे मला जाळतो, का? मुकी …..हाक ना बोंब. सोपच आहे तिकडे काही झकमारी झाली की फोडलीच एस टी. कोर्टात अभ्यासू पद्धतीने मांडावे आरक्षण मिळवावे, नेते कामाला लावतात आणि तुम्ही मूर्ख निघाले मला जाळायला, आरक्षण आंदोलनात मला जाळले यावरच बोलत नाही, अश्या अनेक आंदोलनात माझी आहुती दिली जाते . खाजगी वाहने बरे धावतात त्यांना कुणी काही बोलत नाही, मला बंद केल्याने उलट खाजगी वाहने लुट करतात, भाडे वाढवून घेतात, त्यामुळे तुंम्ही तुमचे आंदोलन करत जा , माझ्याकडे काही येत जाऊ नका कारण यात माझे कमी आणि तुमचेच नुकसान आहे, आता त्या दिवशी शहागड ला गाड्या जाळल्या नसत्या तर प्रवाश्यांचे हाल झाले नसते , श्रावण गिरी नावाचे लेखक सूत्रसंचालक एकदम गोड माणूस खाजगी वाहनाच्या खाली येऊन दगावला , हे पाप कुणाचे माझे का तुमचे , मारला कि नाही तुम्ही श्रावन गिरी .
त्यामुळे कृपा करून आंदोलन नक्की करा, मागण्या मंजूर करून घ्या मात्र मला जाळून स्वत:ची धग आणि आग विझवून घेऊ नका , जिथे लढायचे तिथे कुर्निसात आणि माझ्या मुक्या जीवावर चढाई हे बरोबर नाही .
कळावे
तुमचीच
“लालपरी”
===================
बाळासाहेब घाडगे. पत्रकार कोळगांव..  सौजन्य. लोकाशा .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!