आरोग्य व शिक्षण

समाज व्यवस्थेनेच आम्हाला भिक मागण्यासाठी प्रवृत्त केलं – भारतीय निवडणूक आयोगाचे राजदूत गौरी सावंत

Spread the love

चिंचवड : चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये तृतीयपंथी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनाचे औचित्य साधून तृतीय पंथीय समाजाला त्याच्या न्याय, हक्क, प्रतिष्ठा, नागरी हक्काबद्दल विद्यार्थी, शिक्षक एकूणच समाजात जागरूक निर्माण व्हावी. यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री सावंत यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरती संस्थापक डॉ. दीपक शहा, संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्रा. गुरुराज डांगरे, प्रा. मनीष पाटणकर उपस्थित होते.

भारतीय निवडणूक आयोगाचे राजदूत गौरी सावंत पुढे म्हणाले, तुम्ही विद्यार्थी आहात उद्या भविष्यात तुम्ही अधिकारी, शिक्षक व्हाल उद्या तुमची लग्न झाल्यावर तुमची मुले तृतीयपंथीय होणार नाही असे मला कोणी लिहून देईल का? असा सवाल करून आज समाज आम्हाला स्वीकारायला का तयार नाही, समाज तृतीय पंथी तिरस्कार का करतात. ही गोष्ट माझ्या सारख्याला सततच खटकते. आम्ही तुम्हाला दिलेले पैसे चालतात, पण तृतीयपंथीय चालत नाही. आज मला जग ओळखू लागले, पण देशातील तृतीयपंथीयांची ओळख काय भारतीय संविधानाने सर्वांना समानतेचे हक्क दिले आहे. पण आमचेच जन्मदाते आम्हाला समाजाबाहेर ठेवतात ही परिस्थिती कोण बदलणार असा खडा सवाल करीत समाज व्यवस्थेला का मान्य नाही. शेवटी आम्ही सुद्धा माणूस आहोत. कोरोना प्रादुर्भाव काळात सेक्स वर्कर्स व त्यांच्या मुलांकडे सुशिक्षित समाजाने देखील पाहिले नाही. त्यांना हवी तेवढी मदत मिळाली नाही. आम्ही सुद्धा भारतीयच आहोत. आपण 21 व्या शतकात चाललोय मात्र; समाज कोठे चालला आहे? तुम्ही चांगल्या घरातील असाल तुम्ही युवा आहात शिकुन मोठे व्हाल, पण प्रथम प्रत्येकाने माणूस झाले पाहिजे. तुम्हाला जसा त्रास होतो तसा आम्हाला देखील त्रास होतो. यासाठीच कोर्टात याचिका दाखल केली आहे. आम्हाला उदरनिर्वाह हा महत्वाचे नसून संविधानानुसार मला व तृतीयपंथीय बांधवांना आमची ओळख हवी आहे. लोकलमध्ये, बसमध्ये कोठेही गेलो तर, शेजारी कोणी बसत देखील नाही. चित्र बदलणार कधी येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी साक्षर होणे गरजेचे असले तरी, प्रथम आपल्याला माणूस जीवंत ठेवला पाहिजे. कारण हे जीवन एकदाच आहे. समाजानेच आम्हाला भिक मागण्यासाठी प्रवृत्त केले आहे. आमच्या तृतीयपंथीय बांधवातही शिकलेले आहेत. आम्हाला समाजाने सन्मान, नोकरी दिली नाही. कारण सुसंस्कृत समाजाने बरोबरीचे समजलेच नाही. आमची चूक काय याचा आपण विचार करणार की नाही, असा खडा सवाल उपस्थितांना केला. पण मला खात्री आहे. माझा संविधान, न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. एक दिवस असा येईल, आम्ही देखील तुमच्या बाजूला बसू समाजाच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या विकासाचे वाटेकरू होवू, हा बदल नक्कीच होईल तो युवा पिढीच आणेल, असा विश्वास व्यक्त केला यावेळी जवळपास सभागृहासमोर तृतीयपंथीय अभ्यासक मार्गदर्शन करीत असलेला कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या प्रथमच अनुभवास आला. श्री सावंत यांच्या वास्तव भाषणाने अनेक विद्यार्थ्यांना अश्रु अनावर झाले. त्यांनीदेखील अनेक प्रश्ने विचारली, त्याचे समर्पक उत्तरे श्री सावंत यांनी दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दिपक शहा म्हणाले, आज समाज व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्नाची पराकाष्टा करणारे राजदूत गौरी सावंत यांनी मनातील खदखद व्यक्त करून आपल्या भावना पोटतीडळीने मांडल्या त्यात त्याची काहीच चूक नाही. समाजात जरी काही जण तिरस्कार करीत असले, तरी आमच्या संस्थेत शिकलेले तृतीयपंथीय यांना नोकरी देवून त्यांना त्याचा उदरनिर्वाह सन्मानाने करता येईल. त्याचा स्विकार कमला शिक्षण संकुल संस्थेत केला जाईल, अशा ग्वाही देताच सभागृहातील उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापकांनी त्याच्या घोषणेचे भरभरून टाळ्या वाजवून स्वागत केले. राजदूत गौरी सावंत यांनी देखील त्यांचे आभार मानले पुढे डॉ. दीपक शहा म्हणाले. आम्ही लायन्स क्लबच्या वतीने अनेक लोकापयोगी उपक्रमे राबवित आहोत. आज समाजात बदल घडत चालला आहे. माणूस म्हणून, माणूस जातीला मदत करणे हा मनुष्याचा स्थायी भाव आहे. तुमच्या मनात प्रेम देण्याची भाव निर्माण झालाच पाहिजे. ही वृत्ती प्रत्येकात आली पाहिजे. रस्त्यावरील भिकारीला परिस्थितीने तशी वेळ आणली असली तरी माणूसकी जपलीच पाहिजे. सेक्स वर्करच्या मुलींच्या प्रति आपले काहीच कर्तव्य नाही का? एखादी संस्था असल्यास त्याच्या मदतीसाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही डॉ. दीपक शहा यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉ. सचिन बोरगावे यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. सुरभी रोडी यांनी तर सूत्रसंचालन आभार डॉ. महिमा सिंग यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!