ताज्या घडामोडी

सेव्हन हिल्स हॉस्पिटल उपांत्य फेरीत दिलीप करंगुटकर स्मृती क्रिकेट

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई, सेव्हन हिल्स हॉस्पिटल क्रिकेट संघाने सायन हॉस्पिटलवर एका विकेटने सनसनाटी विजय मिळवून क्रिकेटप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या विजयाचे शिल्पकार अष्टपैलू सुशांत गुरव, इब्राहीम शेख, रोहित सोमर्डे, सुरज घोलप, अफजल शेख आदी ठरले.  सलामीवीर अलंकार पवार व अष्टपैलू संतोष खताते यांनी विजया समीप नेऊनही सायन हॉस्पिटल संघाला हार पत्करावी लागली. जेजे हॉस्पिटलचे माजी कर्णधार चंद्रकांत नाईक व सायन हॉस्पिटलचे माजी कप्तान अविनाश दुधाणे यांचा स्पर्धेनिमित्त विशेष गौरव माजी क्रिकेटपटू व प्रशिक्षक दीपक पाटील, क्रिकेट संघटक अभिजित घोष, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

क्रॉस मैदान येथे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित स्पर्धेमध्ये सेव्हन हिल्स हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून सायन हॉस्पिटल संघाला प्रथम फलंदाजी दिली.

सलामीवीर अलंकार पवार (२४ चेंडूत ४७ धावा, ६ चौकार व १ षटकार) व संतोष खताते (१५ चेंडूत १२ धावा, १ चौकार) यांनी अर्धशतकी धावांची दमदार सलामी दिली. परंतु त्यानंतर गोलंदाजीत सूर सापडलेल्या सुशांत गुरव (८ धावांत ५ बळी) व स्वप्नील शिंदे (४ धावांत २ बळी) यांनी सायन हॉस्पिटलचा डाव १५.३ षटकात सर्वबाद ९६ धावसंख्येवर रोखला. विजयी लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करतांना सेव्हन  हिल्स हॉस्पिटलच्या फलंदाजांची दमछाक झाली. सुशांत गुरव (१८ चेंडूत २० धावा, ३ चौकार), इब्राहीम शेख (१६ चेंडूत १८ धावा, २ चौकार), सुरज घोलप (१० चेंडूत १३ धावा, २ चौकार) यांनी डाव सावरून देखील संतोष खताते (२४ धावांत ३ बळी), अमोल कुंजीर (२६ धावांत ३ बळी), सुबोध म्हात्रे (२५ धावांत २ बळी) यांच्या गोलंदाजीने १६ व्या षटकाला सेव्हन हिल्स हॉस्पिटलची ९ बाद ८४ धावा अशी बिकट अवस्था केली. तरीही न डगमगता तळाचे फलंदाज रोहित सोमार्डे (१४ चेंडूत नाबाद १४ धावा, १ चौकार) व अफजल शेख (४ चेंडूत नाबाद ९ धावा, २ चौकार) यांनी दहाव्या विकेटसाठी १४ धावांची अभेद्य भागीदारी करून सेव्हन हिल्स हॉस्पिटल संघाला १७.४ षटकात ९ बाद ९८ अशी विजयी धावसंख्या रचून दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!