ताज्या घडामोडी

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहयोगी उपाध्यक्षपदी डॉ. चंद्रजित जाधव

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी: बाळ तोरसकर

मुंबई ८ डिसें. (क्री. प्र.): महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहयोगी उपाध्यक्षपदी खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव यांची निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात खो-खो पोचवण्यासाठी डॉ. जाधव यांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे. खो-खो मध्ये नाविन्यपुर्ण प्रयोग करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. क्रीडाक्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनकडून घेण्यात आली आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी पत्राद्वारे डॉ. जाधव यांची सहयोगी उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. उस्मानाबाद जिल्ह्यातून खो-खो प्रशिक्षक म्हणून त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील कारकिर्दीला आरंभ झाला. ते स्वतः खो-खोचे राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा २००९-२०१० चा शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार सुध्दा मिळाला आहे.

उस्मानाबाद येथील तेरणा महाविद्यालयात क्रीडा विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. राज्य खो-खो असोसिएशनच्या सचिवपदी काम करत असताना खो-खो खेळाला वलय मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका आहे. खो-खो सह बेसबॉल, स्क्वॅश रॅकेट, स्विमिंग या खेळाच्या जिल्हा संघटनांवर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तवरावर खेळले आहेत.

देशातील मानाचा अर्जुन पुरस्कार आणि महाराष्ट्रातील शिव छत्रपती पुरस्कारही त्यांच्या खेळाडूंनी मिळवला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय, राज्य स्पर्धांचे यशस्वीरित्या नियोजन केले जाते. क्रीडाक्षेत्रातील त्यांची कामगिरी बहारदार आहे. खो-खो चा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. डॉ. जाधव यांच्या निवडीनंतर खो-खो चे आधारस्तंभ विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अ‍ॅड. अरुण देशमुख, माजी सचिव संदिप तावडे यांच्यासह राज्य खो-खो असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!