आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

कलापिनी महिला मंचचा महिला दिन उत्साहात…….

कलापिनी महिला मंच ' तर्फे दि. ४ मार्च रोजी ' महिला दिन ' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तळेगावातील स्त्री वर्गाला एक स्वतंत्र व्यासपीठ मिळावं, त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळावं या उद्देश्याने ह्या महिला मंच ची स्थापना झाली आहे.

Spread the love

कलापिनी महिला मंचचा महिला दिन उत्साहात साजरा Kalapini Mahila Manch celebrated Women’s Day with enthusiasm…….

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ८ मार्च.

‘ कलापिनी महिला मंच ‘ तर्फे दि. ४ मार्च रोजी ‘ महिला दिन ‘ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तळेगावातील स्त्री वर्गाला एक स्वतंत्र व्यासपीठ मिळावं, त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळावं या उद्देश्याने ह्या महिला मंच ची स्थापना झाली आहे.प्रवेशद्वारात काढलेल्या रांगोळीने आत शिरता शिरता लक्ष वेधून घेतले. फुलाच्या सात पाकळ्यात स्त्रियांचे सात अंगभूत गुण, प्रेम, माया, हुशारी, प्रामाणिकपणा, धैर्य, विश्वास आणि संयम, प्रतीत केले होते. स्टेज वर कल्पकतेने केलेलं स्त्रीचे कट आऊट, त्याला नेसवलेली धारवाडी खणाची साडी याचे श्रेय सुप्रियाताई खानोलकर व दीपाली जोशी यांना जाते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्योतीताई गोखले यांनी मोजकं पण अर्थपूर्ण रीतीने केलं.

 

राखी भालेराव यांनी जय शारदे वागिश्वरी या स्तवनावर मोहक नृत्य करून कार्यक्रमाची सुरुवात केली. नंतर अरुणाताई कुलकर्णी यांनी गणेश वंदना सादर केली. प्रेमाताई अगरवाल यांच एक मजेशीर गाणं, रश्मीताई पांढरे व संपदाताई नातू यांनी संवादातून सादर केलेलं हास्य योगाचं महत्त्व, मीरा कोन्नुर यांचं गाणं, गौरी पाटणकर यांनी स्वतः रचलेली चार चौघी ही कविता, विजयाताई कुलकर्णी यांचं ‘स्त्री ‘ या विषयी च मनोगत, सगळंच खूप लक्षणीय होतं. अंजलीताई सहस्रबुद्धे आणि केतकी लिमयेनी सादर केलेल्या प्रहसनाला प्रेक्षकांकडून हशा आणि टाळ्या मिळाल्या.
ज्योती ढमाले यांचं ‘ सुया घ्या, दाभण घ्या ‘ अशी आरोळी ठोकत झालेलं आगमन अगदी नाट्यपूर्ण होतं. या गाण्यातून त्यांनी सादर केलेलं समाज प्रबोधन, खास करून स्त्रियांसाठी, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.

या नंतर सादर झाला तो स्त्रियांच्या अगदी आवडीचा विषय. आभूषणे, अगदी साडी पासून ते नथीपर्यंत. स्त्रियांना असलेली सर्व अभूषणांची आवड खूप कल्पकतेने सांगतानाच त्याविषयीची शास्त्रीय माहिती, त्या अभूषणाचे स्त्रीला होणारे शारीरिक फायदे देखील सांगितले. अनघा कुलकर्णी ह्यांची संकल्पना होती, आणि ‘परिपूर्ण ती ‘ असं या सादरीकरणाचे नावही साजेसे होते. कार्यक्रमात शेवटी योगिता पन्हाळे आणि त्यांच्या दोन मुलींनी अतिशय सुंदर नृत्य सादर केले.

 

या कार्यक्रमात सगळ्यात गमतीचा भाग होता तो विद्या अडसुळे आणि अनघा कुलकर्णी यांनी मधे मधे घेतलेल्या खेळांचा,त्याला सर्व महिलांनी समरसून दाद दिली.
महिला मंच च्या या कार्यक्रमाला तळेगाव येथील नामवंत समाज सेविका अर्चना ताई काटे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विद्या अडसुळे यांनी काटेताई यांची ओळख करून दिली आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. काटे ताईंनी त्यांच्या छोट्याश्या भाषणात त्यांनी त्यांच्या समाज सेवेची सुरुवात कशी केली हे सांगितले. अडलेल्या गर्भार बाईचं बाळंतपण ते रेल्वेच्या जिन्यावर बेशुद्ध होऊन पडलेल्या अनोळखी माणसाला हॉस्पिटल मध्ये पोचवणे, असे काही काळजाला भिडणारे अनुभव काटे ताईंनी सांगितले. ‘ कमी तिथे आम्ही ‘ हे त्यांचं ब्रीदवाक्य असावं बहुतेक.

कलापिनीच्या कार्याध्यक्षा अंजलीताई सहस्रबुद्धे यांनी महिला मंच चे उद्दिष्ट आणि पुढील वर्षाचे उपक्रम याबद्दल माहिती दिली. ज्योती ताईंनी त्यांच्या निवेदनाचा शेवट ‘ स्त्री ‘ ने तिच्यातील ‘ स्व ‘ ला ओळखावे, अशा आशयाची कविता वाचून केला.
महिलांनी आयोजित केलेला, महिलांनी, महिलांसाठी सादर केलेला हा एक अनोखा कार्यक्रम महिलांची अस्मिता जागृत करणारा होता..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!