ताज्या घडामोडी

मणदूर,धनगरवाडा,विनोबाग्राम येथील शेतकऱ्यांना शासकीय खर्चाने मोजणी करून जमिनीचे वाटप करणार – तहसीलदार गणेश शिंदे.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

मणदुर, धनगरवाडा, विनोबा ग्राम ता. शिराळा येथील शेतकऱ्यांना शासकीय खर्चाने मोजणी करून शेत जमिनीचे वाटप करणार असल्याची माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी येथील शेतकरी, ग्रामस्थ व माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांना दिली.
येथील ग्रामस्थांच्या अनेक दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या विषयावर देखील सकारात्मक चर्चा झाली. याबाबत उपस्थित ग्रामस्थांशी माहिती देताना तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले, येथील कुटुंबांना शासकीय खर्चाने मोजणी करून शेत जमिनीचे वाटप होईल. वाटपाच्या अनुषंगाने मोजणी करावयाची कामे या आठवडाभरात सुरू होतील. यासंबंधी योग्य ती कार्यवाही सुरू केली आहे. येथील शेतकरी गेल्या साठ-सत्तर वर्षापासून सदरची जमीन कसत आहेत. मोजणी विभागास सदर जमीन वाटपासंबंधीचे पत्र दिले असून याबाबत शेतकऱ्यांना जमीन वाटपाचे काम लवकरच पूर्ण होईल.
याचबरोबर मणदुर आणि परिसरातील शेतकऱ्यांना जंगली जनावरांचा फार मोठ्या प्रमाणावर उपद्रव होतो. पिकांचे नुकसान होते. याकरता संरक्षक भिंत घालून मिळावी अशी येथील शेतकऱ्यांची मागणी होती. त्या अनुषंगाने रणधीर नाईक यांच्या मध्यस्थीने पालकमंत्री जयंतराव पाटील, आमदार मानसिंगराव नाईक आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांनी जिल्हा नियोजन मंडळमधून निधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत वनविभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे संरक्षक भिंतीसाठी तातडीने प्रस्ताव तयार करून पाठवावा असे निर्देश देखील देण्यात आले आहेत. संरक्षक भिंत ज्या ठिकाणी बांधावयाची आहे त्या ठिकाणची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच २०२० – २१ साली लागोपाठच्या महापुरामुळे मणदुर आणि परिसरातील अनेक ठिकाणची सुमारे १०० एकर शेती वाहून गेली आहे. त्या ठिकाणची शेती दुरुस्ती, सपाटीकरण आणि बांध बंदिस्तीकरण करणे यासंबंधीचे अंदाजपत्रक आणि प्रस्ताव तयार करण्यासंबंधी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. यासंबंधी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून तातडीने अंदाजपत्रक व प्रस्ताव तयार करावेत अशा सूचना देखील दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक, बाबुराव डोईफोडे, धोंडीबा डोईफोडे, नथुराम डोईफोडे, रामचंद्र जाधव, मारुती गोरिवल आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!